परभणी कृषि विद्यापीठाची हरित विद्यापीठाकडे वाटचाल....कुलगुरू मा डॉ अशोक ढवण
वनामकृवित वटवृक्षाची लागवड करून साजरा करण्यात आला जागतिक पर्यावरण दिन
पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने आपण ऐतिहासिक वळणावर असुन पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. निसर्गातील जैवविविधता जोपासण्यासाठी पशु, पक्षी, जीवाणु, मधमाश्या आदींचे महत्व असुन वड, पिंपळ, उंबर आदीवर यांचे आश्रयस्थान आहे, ही बाब डोळयासमोर ठेवुन भारतीय संस्कृतीतही वटपोर्णिमेस वडाच्या झाडाची पुजा करतो तसेच पिंपळ, उंबर यासही मोठे महत्व आहे. पर्यावरण साखळीत याचे महत्त्व लक्षात घेऊन विद्यापीठ परिसरात वड, पिंपळ, उंबर आदी सारखी वृक्ष लागवडीवरही भर देण्यात येत आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वतीने दिनांक 5 जुन रोजी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्या हस्ते वट वृक्षाचे लागवड करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, परभणी वनविभागाचे विभागीय वनअधिकारी श्री व्ही एन सातपुते, सामाजिक वनीकरणाचे विभागीय वनअधिकारी श्री पी सी वाकचौरे, वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती पी सी पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री गणेश गिरी, वनपाल श्री के एस भंडारे, वनरक्षक श्रीमती एस जी नरवाडे, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सय्यद इस्माईल, सामाजिक विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ जयश्री झेंड, विद्यार्थ्यी कल्याण अधिकारी डॉ महेश देशमुख, प्रा डॉ हिराकांत काळपांडे आदीची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, केवळ वृक्ष लागवड करून चालणार नसुन त्या वृक्षाची काळजीपुर्वक जोपासणा करणे, त्यास योग्य आकार देणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी विद्यापीठात परभणी मुख्यालयी पन्नास हजार वृक्ष व मराठवाडयातील विद्यापीठांतर्गत प्रक्षेत्रावर अडीच लाख वृक्ष लागवडच केली नसुन जवळपास नव्वद टक्के वृक्ष जोपासण्यात आली. या तीन लाख वृक्षाची यावर्षीच्या उन्हाळयात करोना रोगाच्या प्रा़दुर्भावाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊनच्या काळात जोपासना करणेही शक्य झाले. सर्वांच्या प्रयत्नांनी विद्यापीठाची हरित विद्यापीठाकडे वाटचाल चालु असुन यात वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यी आदीसह सामान्य नागरिकांचेही मोलाचे योगदान आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ हिराकांत काळपांडे यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ फरिया खान यांनी मानले. यावेळी कोरोनाच्या प्रादुर्भावात सोशल डिस्टसिंगचे भान ठेऊन मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ स्वाती झाडे, डॉ जयकुमार देशमुख, डॉ चौव्हाण, डॉ आशाताई देशमुख आदीसह विद्यार्थ्यी कल्याण अधिकारी कार्यालयातील कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.