वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या वतीने सोयाबीन पीक खत व्यवस्थापन याविषयावर यू ट्यूब लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 11 जुन रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी बी. देवसरकर, विस्तार कृषिविद्यावेत्ता डॉ. यू.एन. आळसे, सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ प्रा. डी. डी. पटाईत आदींनी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले.
मार्गदर्शनात विस्तार
शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर म्हणाले की, सोयाबीन हे जागतिक पातळीवर
आधुनिक शेतीमधील महत्वाचे तेलबिया व शेंगवर्गीय पीक असुन
सोयाबीन मध्ये ४० टक्के प्रथिने आणि १९ टक्के तेल असते. एकूण
तेल उत्पादनापैकी जवळजवळ ५८ टक्के सोयाबीन
तेलाचा वाटा आहे. तर एकूण प्रथिनांपैकीं जवळजवळ ६० टक्के प्रथिने सोयाबीन पासून उपलब्ध होतात. अलीकडे
सोयाबीन लागवड फार मोठ्या प्रमाणावर वाढत असुन त्यापासून साधारणपणे
५ दशलक्ष टन इतकं उत्पादन मिळत. कमी खर्चात जास्तीतजास्त उत्पादन देणारे नगदी पीक
म्हणून सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली आहे.
खत व्यस्थापनासंदर्भात मार्गदर्शन करताना विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. यू. एन. आळसे म्हणाले की, सोयाबीन पिकास हेक्टरी ३० किलो नत्र, ६० कि. स्फुरद, ३० किलो पालाश अधिक २० किलो गंधक पेरणीवेळी द्यावे. जमिनीत जस्त या अन्नद्रव्याची कमतरता असल्यास २५ किलो झिंक सल्फेट पेरणीच्यावेळी द्यावे. उत्पादन वाढीच्या दृष्टीने हेक्टरी १० किलो बोरॅक्स पेरणीच्यावेळी द्यावे. किड व्यवस्थापनाबाबत प्रा.डी.डी.पटाईत म्हणाले की, खोडकिडी, पाने खाणाऱ्या अळ्या, हुमणी कीड तसेच रोग व्यवस्थापन यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे .
कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फाउन्डेशन परभणी जिल्हा व्यवस्थापक विलास सवाणे , बुलढाणा जिल्हा व्यवस्थापक शुभम लाखकर, औरंगाबाद जिल्हा व्यवस्थापक मनोज काळे, रामाजी राऊत आदींनी केले. कार्यक्रमामध्ये संपूर्ण मराठवड्यातील जिल्हयातील शेतकरी बांधवांनी सहभागी होऊन सोयाबीन लागवडीबाबत प्रश्न विचारले .