Wednesday, June 17, 2020

हवामान बदलानुरूप शेती तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ....... डॉ एस भास्कर


सद्यस्थितीतील कोरडवाहू शेती बदलत्‍या हवामानास अनुकूल आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून त्याद्वारे उत्पादनात वाढ करता येते. संपूर्ण देशात आधुनिक कोरडवाहू तंत्रज्ञान विकसित केलेले आहे, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महासंचालक डॉ एस. भास्कर यांनी केले आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प अंतर्गत कार्यक्रम दिनांक 11 ते 15 जून  दरम्‍यान आयोजित हवामान बदलानुरूप पर्जन्य आधारित शेती या विषयावर एक आठवड्याचे ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण हे होते तर प्रमुख अतिथी म्‍हणुन केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था,  हैदराबाद संचालक डॉ. जी  रवींद्र चारी हे होते. शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ उदय खोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी विकसित कोरडवाहू तंत्रज्ञानाचा आढावा घेऊन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न वाढवावे असे आवाहन केले. तर डॉ. जी रवींद्र चारी यांनी पावसाच्या पाण्याचे संधारण तसेच पुनर्वापर आणि कोरडवाहू एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन केले.

प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कृषी विद्या विभागाचे प्रमुख डॉ भगवान आसेवार व कृषी अभियंता डॉ मदन पेंडके यांनी केले होते. प्रशिक्षण कार्यक्रमात ऑस्ट्रेलिया, मलेशिया, नायजेरिया, नेपाळ, म्यानमार, अल्जेरिया आदीसह देशातील 452 प्रशिक्षणार्थीनी सहभाग घेतला. प्रशिक्षणात देशातील नामवंत संस्थेतील शास्त्रज्ञ व संशोधक डॉ रवी पाटील, डॉ चीन्नामूथु, डॉ गोपीनाथ, डॉ के व्ही राव, डॉ मुदलागिरीआप्पा, डॉ उदय खोडके, डॉ सय्यद इस्माईल, डॉ मदन पेंडके, डॉ भगवान आसेवार, डॉ विजय कोळेकर आदींनी मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणाचा उद्घाटन समारंभ दि.11 जून रोजी राष्ट्रीय पर्जन्य क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अशोक दलवाई आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महासंचालक डॉ ए. के व्यास यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

कार्यक्रमात डॉ उदय खोडके यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाची रूपरेषा मांडली तर नाहेप प्रकल्पाचे मुख्य अन्‍वेषक डॉ गोपाळ शिंदे यांनी प्रकल्पाच्या कार्याविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ भगवान आसेवार यांनी केले तर आभार डॉ मदन पेंडके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ अनिकेत वाईकर,  इंजि.सचिन कराड, डॉ स्वाती मुंडे, इंजि.अपूर्वा वाईकर आदींनी परिश्रम घेतले.