वनामकृविच्या वतीने आयोजित सोयाबीन लागवड ऑनलाईन कार्यशाळेत प्रतिपादन
मराठवाडयात सोयाबीन लागवडी खालील क्षेत्रात वाढ होत असुन सोयाबीन केवळ तेलबिया पिक म्हणुनच नव्हे तर प्रथिनाचे चांगले स्त्रोत असणार पिक आहे. याचा मानवाच्या व पशु आहारात उपयोग केल्यास कुपोषणाची समस्या कमी करता येईल. सोयाबीन पासुन विविध उपपदार्थ तयार केल्यास निश्चितच शेतक-यांना त्यांचापासुन आर्थिक लाभ होऊ शकतो. सोयाबीन पिकामुळे जमिनीचा पोत सुध्दा सुधारतो, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालय, नाहेप प्रकल्प व महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग यांचे संयुक्त विद्यमाने राज्याचे कृषिमंत्री मा ना श्री दादाजी भुसे साहेबांच्या सुचनेनुसार दिनांक २ जुन रोजी आयोजित सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिया ऑनलाईन विशेष कार्यशाळेत अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणुन अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ विलास भाले, राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ के पी विश्वनाथा, इंदौर येथील अखिल भारतीय सोयाबीन संस्थेचे संचालक डॉ व्ही एस भाटीया, पोकराचे प्रकल्प व्यवस्थापन कक्षाचे कृषि विद्यावेत्ता श्री विजय कोळेकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, औरंगाबाद विभागाचे कृषि सहसंचालक डॉ डी एल जाधव, लातुर विभागाचे कृषि सहसंचालक डॉ टी एन जगताप, परभणी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ संतोष आळसे आदींची प्रमुख सहभाग होता.
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्हणाले की, राज्याचे कृषिमंत्री मा ना श्री दादाजी भुसे साहेबांच्या मार्गदर्शनानुसार कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर सोयाबीन ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असुन शेतकरी बांधवाना कृषि विद्यापीठ शास्त्रज्ञाचे तंत्रज्ञानात्मक पाठबळ ऑनलाईन व मोबाईलच्या माध्यमातुन सातत्यांने राहणार आहे.
मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ विलास भाले म्हणाले की, बदलत्या हवामानाचा सोयाबीन पिकांस मोठा फटका बसत असुन मागील काही वर्षात सोयाबीन उत्पादनात घट होतांना दिसत आहे. गेल्या वर्षी सोयाबीन काढणीच्या वेळी आलेल्या पाऊसामुळे मोठे नुकसान झाले. यामुळे पिक पध्दतीत केवळ कापुस व सोयाबीन पिकावरच भर न देता, ज्वारी, बाजरी, तुर आदी पिकांचा समावेश पिक पध्दती करावा. ज्वारीला आज बाजरात चांगला भाव मिळत असुन कडबाचा उपयोग जनावरासाठी होऊ शकतो.
कुलगुरू मा डॉ के पी विश्वनाथा मार्गदर्शनात म्हणाले की, सोयाबीन बियाणे नाचुक असल्यामुळे बियाणांची उगवणक्षमता तपासुन घरचे बियाण्याचा शेतक-यांनी वापर करावा. सोयाबीनकडे केवळ तेलबिया म्हणुन न पाहता मानवास व जनावरांना प्रथिनांचे स्त्रोत असलेले पोषक खाद्य म्हणुन वापर वाढवावा लागेल.
श्री विजय कोळेकर यांनी शेतकरी युवकांनी व महिलांनी सोयाबीन प्रक्रिया उद्योगाकडे वळण्याचा सल्ला दिला. औरंगाबाद विभागाचे कृषि सहसंचालक डॉ डी एल जाधव व लातुर विभागाचे कृषि सहसंचालक डॉ टी एन जगताप यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ देवराव देवसरकर यांनी केले. सुत्रसंचालन डॉ प्रविण कापसे यांनी केले तर आभार डॉ प्रशांत देशमुख यांनी मानले. झुम मिटिंग सॉफ्टवेअर व विद्यापीठाच्या युटयुब चॅनेलच्या माध्यमातुन शेतकरी, कृषि अधिकारी, कर्मचारी व कृषि विस्तारक मोठया संख्येने सहभागी झाले होते.
तांत्रिक सत्रात सोयाबीन पिकांचे विविध वाण यावर डॉ एस पी म्हेत्रे, सोयाबीन लागवडीवर डॉ यु एन आळसे, बीबीएफ तंत्राने सोयाबीन लागवडीवर डॉ स्मिता सोळंकी, सोयाबीन बीजप्रक्रियावर डॉ ए एल धमक, सोयाबीन बियाणे उगवणक्षमता तपासणीवर डॉ किशोर झाडे, सोयाबीन पिकांतील एकात्मिक कीड व्यवस्थापन डॉ पी आर झंवर, सोयाबीनवरील रोग व्यवस्थापन डॉ के टी आपेट, सोयाबीन पिकाचे काढणी पश्चात तंत्रज्ञान व मुल्यवर्धन यावर डॉ स्मिता खोडके आदीना मार्गदर्शन केले. तसेच विद्यापीठ शास्त्रज्ञांनी शेतक-यांच्या शेती विषयक प्रश्नांना उत्तरे दिली. सदरिल ऑनलाईन कार्यशाळा यशस्वीतेसाठी नाहेप प्रकल्पाचे मुख्य अन्वेषक डॉ गोपाल शिंदे, डॉ शाम गरूड, डॉ संतोष फुलारी, डॉ संतोष कदम, डॉ अविनाश काकडे, डॉ रश्मी बांगळे आदींचे तांत्रिक सहाय्य लाभले.