Friday, August 28, 2020

वनामकृवित ३० एकर प्रक्षेत्रावर बहुवर्षीक व हंगामी सव्वीस प्रकाराच्‍या चारापिकांची लागवड

नेपियर चारापिकाचे ठोंब विक्रीसाठी उपलब्‍ध


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील संकरित गो पैदास प्रकल्‍पाच्‍या वतीने कुलगुरू मा डॉ अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली बहुवर्षीक व हंगामी चारा पिकांचे ३० एकर प्रक्षेत्र विकसित करण्‍यात आले आहे. यात सव्वीस प्रकाराचे एकदल व व्दिदल चारापिकांचा समावेश आहेत. सद्यस्थितीत शेतकरी पशुपालकांना नाममात्र दरामध्‍ये नेपियर जातीच्‍या विविध वाणांचे ठोंब विक्रीसाठी उपलब्‍ध आहेत, अशी माहिती प्रकल्‍पाचे प्रभारी अधिकारी डॉ दिनेशसिंह चौहान यांनी दिली.

सदरिल नेपियर या एकदल चारापिकाच्‍या राहुरी येथील महात्‍मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेला गुणवंत, मध्‍यप्रदेशातील झांशी येथील कृषि विद्यापीठाचा आयजीएफआरआय-७, तामिळनाडु राज्‍यातील कोईंबतुर येथील कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्‍या सीओबीएन-५ या वाणाची लागवड करण्‍यात आली आहे. या वाणांमध्‍ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असुन कुसळाचे प्रमाण कमी आहे. जनावरांना पचनास हे गवत चांगले असुन पशुपालक शेतक-यांनी या गवताच्‍या वाणांची लागवड केल्‍यास पशुधनास सकस आहार उपलब्‍ध होऊ शकतो. या गवताची लागवड करण्‍यासाठी प्रक्षेत्रावरील ठोंब प्रति नग एक रूपया या नाममात्र दरांने शेतक-यांकरिता विक्रिसाठी उपलब्‍ध आहे. अधिक माहिती साठी डॉ दिनेशसिंह चौहान यांच्‍याशी मोबाईल क्रमांक ९४२३१७१७१५ यावर संपर्क साधावा.