Sunday, August 2, 2020

कापूस पिकातील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करणे गरजेचे ……..डॉ.डी.बी.देवसरकर

वनामकृवि व रिलायन्स फाउंडेशन विद्यमाने आयोजित यू ट्यूब लाईव्ह कार्यक्रमात प्रतिपादन 

सध्यास्थितित कपाशी पीक हे वाढीच्या अवस्थेमध्ये असून त्यावर वेगवेगळ्या रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होताना दिसून येत आहे अश्या परिस्थितीत पिक संरक्षणाचे उपाय करणे गरजेचे असुन या उद्देशाने आज वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी बांधवांकरिता दिनांक ३१ जुलै रोजी यू ट्यूब लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून विस्तार शिक्षण संचालक डॉ.डी.बी.देवसरकर, कृषि माहिती तंत्रज्ञान केंद्राचे व्यवस्थापक डॉ. यू. एन. आळसे, किटकशास्त्रज्ञ प्रा.डी.डी.पटाईत आदींनी मार्गदर्शन केले.

यावेळी मार्गदर्शनात विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर म्हणाले की, कपाशीच्या शेतामध्ये एकरी दोन या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचे कामगंध सापळे लावावेत, कामगंध सापळ्यातील पतंगच्या संख्येवर निरीक्षण ठेवून प्रत्येक दिवशी आठ ते दहा पतंग एका कामगंध सापळ्यात सतत तीन दिवस येत असल्यास तात्काळ पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी घ्यावी. शेतामध्ये वेळोवेळी निरीक्षण करून गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या दिसून आल्यास त्या जमा करून नष्ट कराव्यात. कामगंध सापळ्यात अडकलेले पतंग जमा करून नष्ट करावेत. आता व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यास बोंडअळी तिचा जीवनक्रम पूर्ण करून परत बोंडे लागल्यानंतर पुढच्या पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात अंडी दिल्यामुळे तिचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढू शकतो.  प्रत्येक गावात अशा पद्धतीचे कामगंध सापळे लावून मोठ्या प्रमाणात जमा झालेले पतंग नष्ट केल्यास हंगामात प्रचंड मोठ्या प्रमाणात कापसाचे पीक बोंडअळी पासून नुकसान होण्यापासून वाचवता येईल.

तांत्रिक सत्रात डॉ. यू. एन. आळसे यांनी कपाशी पिकाला खत व्यवस्थापना संदर्भात मार्गदर्शन करून उत्तन्न वाढीसाठी शिफारशीत खत व्यवस्थापन करण्याचे आवाहन केले तर प्रा.डी.डी.पटाईत यांनी कपाशी पिकावर येणार्‍या विविध रसशोषक किडी व गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन कसे करावे या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी सहभागी शेतकरी बांधवाच्‍या प्रश्नांना विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ.यू.एन.आळसे व किटकशास्त्रज्ञ प्रा.डी.डी.पटाईत यांनी उत्तरे दिली. सदरिल कार्यक्रमात मराठवाडा विभागातील सर्वच जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फाऊंडेशनचे परभणी जिल्हा व्यवस्थापक विलास सवाणे यांनी केले तर कार्यक्रमास सहाय्यक रामजी राऊत श्री. शुभम लाखकर यांनी सहकार्य केले.