विद्यापीठाने शिफारस केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करावा... विस्तार शिक्षण संचालक मा डॉ. भगवान आसेवार
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि
महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी शास्त्रज्ञ
कृषि संवादाचा आठरावा भाग ३१ ऑक्टोबर रोजी ऑनलाईन संपन्न झाला. हा संवाद कार्यक्रम
कीटकशास्त्र विभागातील क्रॉपसॅप प्रकल्पाच्या अंतर्गत घेण्यात आला. यामध्ये
शेतकऱ्यांना विविध शेती विषयक तांत्रिक माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभात विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि
यांनी संदेशाद्वारे
शेतकरी बांधवांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रमास प्रोत्साहन दिले.
अध्यक्षीय समारोपात विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी गहू पिकाच्या
उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या हवामानाचा महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित केला.
त्यांनी सांगितले की गहू पिकासाठी कमीत कमी ९० दिवस थंड हवामानाची गरज असते.
शेतकऱ्यांनी गहू लागवडीसाठी विद्यापीठाने शिफारस केलेल्या तंत्रज्ञानाचा अचूक वापर
करावा, असे त्यांनी नमूद केले.
तांत्रिक सत्रात हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी पुढील
आठवड्यातील हवामानाच्या स्थितीबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. त्यांनी हवामानाचा
अचूक अंदाज घेत, पिकांची योग्य काळजी घेण्याचे आणि शेती
मशागत कशी करावी याचे मार्गदर्शन केले. याशिवाय विजेचा धोका लक्षात घेऊन
शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये दामिनी ॲप डाऊनलोड करून विजेची माहिती मिळवावी, असेही आवाहन त्यांनी केले.
गहू उत्पादनातील तंत्रज्ञानाबाबत, कीटकशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस एम उमाटे यांनी गहू लागवडीसाठी
योग्य जमीन, मशागत, वाणांची निवड, बियाण्यांची उपलब्धता, पेरणी पद्धती, सिंचन आणि खत व्यवस्थापन यावर सविस्तर
मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात जैन इरिगेशनचे डॉ. बी. डी. जडे यांनी मराठवाड्यातील
हवामानाची आणि त्याचा गहू पिकावर होणाऱ्या परिणामांची माहिती दिली. या वेळी
शेतकऱ्यांनी गहू पिकासंदर्भात विविध प्रश्न विचारले. उपस्थित विद्यापीठाच्या
शास्त्रज्ञांनी या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे प्रश्न सोडवण्यास
मदत झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनंत लाड यांनी केले, तर आभार विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम
नेहरकर यांनी मानले. कार्यक्रमात मुख्य
विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांच्यासह मराठवाड्यातील आठही
जिल्ह्यांतील कृषी विभागाचे अधिकारी, विद्यार्थी, कृषि विज्ञान केंद्राचे समन्वयक आणि
शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.