माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते वितरण; पाण्याचा कार्यक्षम वापर व शाश्वत शेतीवर भर
हवामान बदलाच्या वाढत्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर
कोरडवाहू शेती अधिक सक्षम, शाश्वत आणि हवामानास अनुकूल करण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा
कार्यक्षम वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी
विद्यापीठ, परभणी येथील अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती
संशोधन प्रकल्पांतर्गत राबविण्यात येत असलेल्या हवामान बदलानुरूप उपक्रमामध्ये
निवड झालेल्या शेतकरी प्रतिनिधींना
दिनांक २८ ऑगस्ट २०२६ रोजी तुषार सिंचन संचांचे वितरण माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय कृषी
अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे माजी सहाय्यक संचालक डॉ. एस. भास्कर उपस्थित होते. यावेळी
विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. भगवान आसेवार, संचालक शिक्षण
डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता,
डॉ. प्रवीण वैद्य, कृषिविद्या विभागाचे
विभागप्रमुख डॉ. विलास खर्गखराटे, अ.भा.स. कोरडवाहू शेती
संशोधन प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे, तसेच
विविध विभागांचे विभागप्रमुख, प्रभारी अधिकारी, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, शेतकरी
आणि विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि म्हणाले की, शेतकरी हाच खरा शास्त्रज्ञ असून, शेतकऱ्यांच्या गरजा
आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन संशोधन होणे आवश्यक आहे.” हवामान बदलाच्या
पार्श्वभूमीवर कमी खर्चाच्या, स्थानिक परिस्थितीला अनुकूल
आणि शेतकऱ्यांना सहज स्वीकारता येतील अशा तंत्रज्ञानांच्या विकासावर भर देणे
गरजेचे आहे.
विकसित तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार करण्यासाठी
‘शेतकरी ते शेतकरी’ संवाद वाढविणे आवश्यक असून, तंत्रज्ञानाच्या प्रसारामध्ये शेतकरी
दूत आणि कृषी मित्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अशा व्यक्तींचा सन्मान करून
त्यांना प्रोत्साहन दिल्यास तंत्रज्ञानाचा प्रसार अधिक प्रभावीपणे होऊ शकतो,
असेही त्यांनी नमूद केले. नैसर्गिक साधनसंपत्तीचा कार्यक्षम आणि
काटेकोर वापर ही काळाची गरज असून, पुढील पिढ्यांसाठी
नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले. उपलब्ध संसाधनांचा काटेकोर वापर हाच शाश्वत शेतीचा
आधार असल्याचे स्पष्ट करून, गरजेनुसार खतांचा वापर, शेततळे व इतर उपलब्ध जलस्रोतांतील पाण्याचा कार्यक्षम वापर, सौरऊर्जेचा अवलंब आणि आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी
केले. विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘त्रिशूल’ तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब
करावा, असेही त्यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे डॉ. एस. भास्कर यांनी हवामान बदल ही
व्यापक आणि बहुआयामी संकल्पना असल्याचे सांगून, त्याच्या परिणामांना सामोरे
जाण्यासाठी दीर्घकालीन तसेच अल्पकालीन उपाययोजनांचा समन्वयाने अवलंब करणे आवश्यक
असल्याचे स्पष्ट केले. शेती आणि शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान, आवश्यक सुविधा आणि प्रभावी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी
व्यक्त केली.
संचालक संशोधन डॉ. भगवान आसेवार यांनी मृदा व
जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित केले. कोरडवाहू शेतीमध्ये उपलब्ध पाण्याचा प्रत्येक
थेंब कार्यक्षमतेने वापरणे आवश्यक असून, जलसंधारणासोबतच आधुनिक सिंचन
पद्धतींचा अवलंब केल्यास पाण्याची उत्पादकता वाढविता येईल, असे
त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अ.भा.स. कोरडवाहू शेती
संशोधन प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांनी हवामान बदलानुरूप
उपक्रमाची उद्दिष्टे, शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना तसेच तंत्रज्ञानाच्या
प्रात्यक्षिकाधारित प्रसाराबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कापूस
संशोधन केंद्राच्या प्रभारी अधिकारी डॉ. मेघा जगताप यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. प्रशांत जाधव यांनी केले.
हवामान बदलानुरूप उपक्रमांतर्गत परभणी तालुक्यातील
सोन्ना आणि बाभुळगाव येथील अनुसूचित प्रवर्गातील निवड झालेल्या शेतकऱ्यांना
मान्यवरांच्या हस्ते तुषार सिंचन संचांचे वितरण करण्यात आले. यामध्ये श्री. दिलीप
टोंगराज, श्री. ज्ञानोबा पारधे, श्री. अन्सीराम वाव्हळे,
श्री. आवडाजी गमे, श्री. अशोक कांबळे, श्री. सुधाकर वाव्हळे, श्री. गौतम वाव्हळे, श्री. मधुकर वाव्हळे, श्री. रामकिशन वाव्हळे,
श्री. लक्ष्मण उबाळे आणि श्री. तुळशीराम टोंगराज यांचा समावेश होता.
कार्यक्रमानंतर शेतकरी प्रतिनिधींनी अखिल भारतीय
समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन व बीजोत्पादन प्रक्षेत्रास भेट देऊन शास्त्रज्ञांशी
संवाद साधला. यावेळी पावसाच्या खंडाच्या काळात पिकांची उत्पादकता टिकवून
ठेवण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजना, पिकांची पाण्याची गरज, उपलब्ध ओलाव्याचे व्यवस्थापन, तुषार सिंचनाचा
कार्यक्षम वापर, मृदा व जलसंधारण तसेच हवामान बदलाच्या
परिस्थितीत घ्यावयाची काळजी याबाबत डॉ. आनंद गोरे, डॉ. मधुकर
मोरे, डॉ. पपीता गौरखेडे, श्री. सुरेश
खटिंग आणि श्री. रिठे यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली.
हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाताना ‘पाणी वाचवा,
संसाधने जपा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करा’ या त्रिसूत्रीच्या
माध्यमातून कोरडवाहू शेती अधिक सक्षम करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.


.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)
