वनामकृवित ‘हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन’ विषयावर अभिनव व्याख्यान
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन गरजेचे : डॉ. एस. भास्कर
नैसर्गिक संसाधनांचे
संवर्धन हे शाश्वत कृषी विकासाचे मूलभूत अंग असून, भविष्यातील हवामान
बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, संसाधन संवर्धन आणि हवामान-अनुकूल कृषी पद्धती यांचा प्रभावी समन्वय
करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले.
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ,
परभणी येथील कृषिशास्त्र विभाग आणि इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रोनॉमी,
परभणी चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हवामान बदलाच्या
पार्श्वभूमीवर नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन’ या विषयावर दिनांक २८ ऑगस्ट २०२६
रोजी आयोजित अभिनव व्याख्यानात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
प्रमुख पाहुणे तथा
वक्ते म्हणून भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR), नवी दिल्लीचे माजी
सहायक महासंचालक (कृषिशास्त्र, कृषिवनशास्त्र व हवामान बदल)
डॉ. एस. भास्कर उपस्थित होते. व्यासपीठावर विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. भगवान
आसेवार, संचालक शिक्षण डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य आणि कृषिशास्त्र विभागाचे
विभागप्रमुख डॉ. विलास खर्गखराटे आदी मान्यवर उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना
डॉ. एस. भास्कर म्हणाले की,
हवामान बदलाचे वाढते परिणाम लक्षात घेता मृदा, पाणी आणि इतर नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन व कार्यक्षम वापर करून शाश्वत
शेतीला चालना देणे आवश्यक आहे. यासाठी हवामान-स्मार्ट कृषी तंत्रज्ञान तसेच संसाधन
संवर्धनाच्या पद्धतींचा प्रभावी अवलंब करणे काळाची गरज आहे. त्यांनी हवामान
बदलामुळे शेतीसमोर निर्माण होणाऱ्या विविध आव्हानांचा आढावा घेतला. तसेच मृदा व
जलसंधारण, नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर, संसाधनांची उत्पादकता वाढविणे आणि बदलत्या हवामानाशी जुळवून घेणाऱ्या कृषी
पद्धतींचा अवलंब याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. हवामान-स्मार्ट व शाश्वत
शेतीसाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि संसाधन संवर्धन यांचा
समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमास
विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,
विद्यार्थी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे हे
अभिनव व्याख्यान ज्ञानवर्धक आणि संवादात्मक ठरले.
कार्यक्रमाच्या
प्रारंभी कृषिशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. विलास खर्गखराटे यांनी उपस्थित
मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन डॉ. मेघा जगताप यांनी केले. शेवटी कृषिशास्त्र विभागाचे सहाय्यक
प्राध्यापक डॉ. पी. बी. जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
हवामान बदलाच्या
पार्श्वभूमीवर नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन आणि हवामान-अनुकूल शेतीबाबत
वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी हे अभिनव व्याख्यान महत्त्वपूर्ण ठरले.




.jpeg)
.jpeg)
