Wednesday, January 1, 2014

ग्रामीण बालकाचे बुध्‍यांक व वाढांक पडताळणी शिबीराचे आयोजन

मार्गदर्शन करतांना प्र विशाला पटणम 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतंर्गत असलेल्‍या गृह विज्ञान महाविद्यालयाच्‍या मानव विकास व कौटुंबिक अभ्‍यास विभागातील बि.एस्‍सी तृतीय वर्षाच्‍या विद्यार्थींनीनी ग्रामीण बालकाचे बुध्‍यांक व वाढांक पडताळणी शिबीराचे आयोजन सगरोळी येथील कृषि विज्ञान केंद्रा मार्फत आयोजीत कृषि तंत्रज्ञान महोत्‍सवात करण्‍यात आले होते. ग्रामीण भागातील 45 शालेय विद्यार्थीनी आणि 20 अनाथ बालीकांचे बुध्‍यांक व वाढांक पडताळून करून त्‍याआधारे त्‍यांना योग्‍य मार्गदर्शन करण्‍यात आले. सदरित कार्यक्रमात गृह विज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्ठाता प्रा विशाला पटनम यांनी ग्रामीण महिला व पुरुषांना कौटुंबिक आर्थिक आणि जीवनमान दर्जा उंचावण्‍यासाठी स्‍त्री-सक्षमीकरणाची अत्‍यंत गरज असल्‍याचे महत्‍व पटवून दिले. पुढे त्‍या म्‍हणाल्‍या, ग्रामीण बालकांच्‍या सर्वांगीण विकासासाठी गरोदर अवस्‍थेपासून ते बालकांच्‍या सुरूवातीचे आठ वर्ष वयापर्यंत होणारे 80 टक्‍के बौध्‍दीक विकासा होतो, त्‍यासाठी योग्‍य अन्‍न व पोषण, आरोग्‍य व योग्‍य बाल शिक्षणाची व कुटूंबामध्‍ये उत्‍तेजनात्‍मक वातावरणाची गरज असते परंतु ग्रामीण भागामध्‍ये या सर्व गोष्‍टीकडे अतिशय दुर्लक्ष होत असते व यामुळे जवळपास 90 टक्‍के बालके विविधस्‍तराच्‍या कुपोषणाला बळी पडून त्‍यांच्‍या सर्वांगीण विकासात अडथळा निर्माण होतो. तसेच त्‍यांनी बालकांच्‍या सर्वांगीण विकासामध्‍ये कुटूंबियांच्‍या जबाबदारीची जाणीव करुन दिली. शिबीरामध्‍ये मानव विकास व कौटुंबिक अभ्‍यास विभागातील विविध पुस्‍तकांचे प्रदर्शन मांडण्‍यात आले होते, सदरील पुस्‍तकांच्‍या विक्रीला पालकांनी मोठा प्रतिसाद दिला. ह्या ग्रामीण बाल पडताळणी शिबीरात उत्‍कृष्‍ट विकास झालेल्‍या 15 बालके व विद्यार्थ्‍यांचा आणि पालक व आजी आजोबा यांचा उत्‍कृष्‍ट पाल्‍य व  उत्‍कृष्‍ट पालक पुरस्‍काराने प्रा. विशाला पटनम यांच्‍या हस्‍ते प्रमाणपत्रे देऊन गौरवण्‍यात आले. सदरिल शिबीरामध्‍ये सहभागी गृह विज्ञान विद्यार्थीनींना प्रत्‍यक्षा अनुभावामुळे त्‍यांच्‍या ज्ञान व कौशल्‍यात अधिक भर पडणार आहे. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी विषयतज्ञ प्रा विशाला पटणम व प्रा. रमन्‍ना देसेट्टी यांच्‍या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्‍या विद्यार्थीनी रोहीणी, स्‍वाती, प्रियंका, संध्‍या, निशीगंधा, अंकीता व ज्‍योती यांनी परिश्रम घेतले.



Monday, December 30, 2013

महिला शेतकरी मेळावाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या विस्‍तार शिक्षण संचालनालय, महा‍राष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग व गृह विज्ञान महाविद्यालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने क्रांतिज्‍योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्‍त दिनांक 3 जानेवारी, 2014 शुक्रवार रोजी सकाळी 11.00 वाजता कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात महिला शेतकरी मेळावा आयोजित करण्‍यात आला असुन मेळाव्‍याचे उदघाटन महा‍राष्‍ट्र राज्‍याचे कृषि आयुक्‍त मा डॉ उमाकांत दांगट यांच्‍या हस्‍ते होणार असुन अध्‍यक्षस्‍थानी विद्यापीठाचे मा कुलगूरू श्री संजीव जयस्‍वाल राहणार आहेत. विशेष अतिथी म्‍हणुन बारामती येथील कृषि विकास प्रतिष्‍ठाणाच्‍या विश्‍वस्‍त तथा भिमथडीच्‍या संयोजिका मा श्रीमती सुनंदाताई राजेंद्र पवार तर शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, लातुर येथील महिला उद्योजिका श्रीमती आशाताई भिसे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. मेळाव्‍यात विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ शेतकरी महिलांना मार्गदर्शन करणार असुन कृषि प्रदर्शनीचे आयोजन देखिल करण्‍यात आले आहे. मेळाव्‍यास महिला शेतकरी, शेतकरी बांधवानी व उद्योजकांनी मोठया संख्‍येने उपस्थित राहण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, गृह विज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्ठाता प्रा विशाला पटनम व मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ राकेश अहिरे यांनी केले आहे.  

Sunday, December 29, 2013

विविध पिक वाणांच्‍या बीज शुध्‍दतेकरिता प्रयत्‍न करणे गरजेचे... विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्‍या वनस्‍पती रोगशास्‍त्र विभाग व नवी दिल्‍ली येथील भारतीय वनस्‍पती रोगशास्‍त्र संस्‍था यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजीत अन्‍नसुरक्षे करिता पिकांवरील रोगांचे निदान व एकात्मिक व्‍यवस्‍थापन या विषयावरील दोन दिवशीय राष्‍ट्रीय परिसंवादाचा समारोपात मार्गदर्शन करतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, व्‍यासपीठावर डॉ. डि. बी. देवसरकर, डॉ. व्हि. व्हि. दातार,  डॉ. के. के. झोटे , डॉ डी एन धुतराज, डॉ ए पी सुर्यवंशी, डॉ एम ए पाटील आदी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्‍या वनस्‍पती रोगशास्‍त्र विभाग व नवी दिल्‍ली येथील भारतीय वनस्‍पती रोगशास्‍त्र संस्‍था यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजीत अन्‍नसुरक्षे करिता पिकांवरील रोगांचे निदान व एकात्मिक व्‍यवस्‍थापन या विषयावरील दोन दिवशीय राष्‍ट्रीय परिसंवादाचा समारोप दिनांक 28 डिसेंबर 2013 रोजी झाला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. डि. बी. देवसरकर उपस्थित होते. भारतीय कृषि संशोधन संस्‍थेच्‍या विभागीय केंद्राचे प्रमुख डॉ. व्हि. व्हि. दातार, सोलापुर येथील डाळींब संशोधन केंद्राचे माजी संचालक डॉ. व्‍ही. टी. जाधव, भारतीय कृषि संशोधन संस्‍थेच्‍या विभागीय केंद्राचे प्रमुख माजी प्रमुख डॉ. के. के. झोटे , बदनापुर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डी एन धुतराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
समारोपीय भाषणात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, विद्यापीठाने विकसित केलेली विषाणुजन्‍य रोगांना प्रतीकारक भेंडीची परभणी क्रांती हे वाण विदेशात ही घेतले जाते, परंतु अशुध्‍द बियाणामुळे यावर ही विषाणुजन्‍य रोगांचा प्रार्दुभाव आढळुन येत आहे. याकरिता विद्यापीठाने विकसित केलेल्‍या विविध पिकांच्‍या रोग व कीड प्रतीकारक वाणांच्‍या बीज शुध्‍दते करिता पिक पैदासकार व पीक रोगशास्‍त्रज्ञानी प्रयत्‍न करणे गरजेचे आहे. या दोन दिवशीय राष्ट्रिय परिसंवादामुळे सहभागी युवा शास्‍त्रज्ञांना संशोधनात कार्य करण्‍यास प्रेरणा मिळेल, तसेच परिसंवादातील शिफारशींचा भावी संशोधन कार्यक्रम आखण्‍यास निश्चितच मदत होईल, अशी अपेक्षा यावेळी त्‍यांनी व्‍यक्‍त केली.
या परिसंवादातील चार तांत्रिक सत्रात साधारणता 50 शास्‍त्रज्ञांनी संशोधन लेखांचे सादरीकरण केले. या सादरीकरणातील शिफारशी संबंधीत तांत्रिक सत्रातील अध्‍यक्ष डॉ के के झोटे, डॉ आर सी गुप्‍ता, डॉ एम ए पाटील, डॉ पी जी बोरकर व डॉ गाडे यांनी समारोप कार्यक्रमात सादर केल्‍या, याचा अहवाल भारतीय वनस्‍पती रोगशास्‍त्र संस्‍थेच्‍या वार्षिक बैठकीत मांडण्‍यात येणार आहेत. तसेच डॉ. व्हि. व्हि. दातार यांनी प्रा एम जे नरसिंहम मेरिट अवार्डासाठी श्री डी पी कुलधर व श्रीमती प्रतिभा निकम या पिक रोग शास्‍त्राज्ञांचे नामांकनासाठी नाव घोषीत केले. सहभागी शास्‍त्रज्ञापैकी निलंगा येथील डॉ भगवान वाघमारे, दापोली येथील डॉ मकरंत जोशी व गुजरातमधील डॉ वनिता सोळुंके यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ ए पी सुर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ नंदु भुते यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ एस एल बडगुजर यांनी केले. कार्यक्रमास वनस्‍पती रोग शास्‍त्रज्ञ, प्राध्‍यापक, विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी डॉ के टी आपेट, प्रा आर डब्‍लु देशमुख, डॉ जे पी जगताप, डॉ व्‍ही एम घोळवे, डॉ के डी नवगीरे, डॉ डी जी हिंगोले, डॉ पी एच घंटेप्रा आर व्‍ही देशमुख, डॉ रवि चव्‍हाण तसेच विविध समित्‍याच्‍या सदस्‍यांनी परीश्रम घेतले. 
राष्ट्रिय परिसंवादात सहभागी युवा शास्‍त्रज्ञ 

Friday, December 27, 2013

अन्‍नसुरक्षेचे उदिष्‍ट साध्‍य करण्‍यासाठी जैवतंत्रज्ञानाची भुमिका महत्‍वाची...मा. डॉ. चारुदत्‍त मायी

मार्गदर्शन करतांना  आंतरराष्‍ट्रीय नामांकित शास्‍त्रज्ञ तथा नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि शास्‍त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्‍यक्ष डॉ. चारुदत्‍त मायी
राष्ट्रिय परिसंवादेचे उदघाटन प्रसंगी दिपप्रज्‍वलन करतांना आंतरराष्‍ट्रीय नामांकित शास्‍त्रज्ञ तथा नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि शास्‍त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्‍यक्ष डॉ. चारुदत्‍त मायी, विद्यापीठाचे प्रभारी कुलगूरू तथा शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) डॉ. विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण आदी
अध्‍यक्षीय भाषण करतांना प्रभारी कुलगूरू तथा शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) डॉ. विश्‍वास शिंदे
      देशातील एकुण 11.6 दशलक्ष हेक्‍टर कापुस क्षेत्रापैकी 10.4 दशलक्ष हेक्‍टर क्षेत्रावर बीटी कापसाचे तंत्रज्ञान पोहचले आहे. भविष्‍यात देशाने निश्‍चीत केलेले अन्‍न सुरक्षेचे उदिष्‍ट साध्‍य करण्‍यासाठी जैवतंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन आंतरराष्‍ट्रीय नामांकित शास्‍त्रज्ञ तथा नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि शास्‍त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्‍यक्ष डॉ. चारुदत्‍त मायी यांनी केले. ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्‍या वनस्‍पती रोगशास्‍त्र विभाग व नवी दिल्‍ली येथील भारतीय वनस्‍पती रोगशास्‍त्र संस्‍था (Indian Phytopathological Society, IARI, New Delhi) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजीत ‘अन्‍नसुरक्षे करिता पिकांवरील रोगांचे निदान व एकात्मिक व्‍यवस्‍थापन’ या विषयावरील राष्‍ट्रीय परिसंवादाचे (पश्चिम क्षेत्रीय) उदघाटनाप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विद्यापीठाचे प्रभारी कुलगूरू तथा शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) डॉ. विश्‍वास शिंदे होते तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, हैद्राबाद येथील राष्‍ट्रीय वनस्‍पती आरोग्‍य व्यवस्‍थापन संस्‍थेचे संचालक डॉ. ए. यु. एकबोटे, भारतीय कृषि संशोधन संस्‍थेच्‍या विभागीय केंद्राचे प्रमुख डॉ. व्हि. व्हि. दातार, सोलापुर येथील डाळींब संशोधन केंद्राचे माजी संचालक डॉ. व्‍ही. टी. जाधव, भारतीय कृषि संशोधन संस्‍थेच्‍या विभागीय केंद्राचे प्रमुख माजी प्रमुख डॉ. के. के. झोटे, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. डि. बी. देवसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
      डॉ मायी पुढे म्‍हणाले की, सन 2002 पर्यतंच्‍या दोन दशकात कापसाचे उत्‍पादन 14 ते 15 दशलक्ष गाठीपर्यंत स्थिरावले होते ते आता 35 दशलक्ष पर्यंत पोहचले आहे. तसेच 2003 साली कापसाची निर्यात नगण्‍य होती, ती आज 10 दशलक्ष गाठीपर्यत पोहचली आहे. सध्‍या देशामध्‍ये बिटी कापसाप्रमाणेच जैवतंत्रज्ञानावर आधारीत विविध पिकांतील साधारणत: 10 प्रकारचे वाण तयार असुन मान्‍यतेची वाट पहात आहेत. यामध्‍ये भरपुर जीवनसत्‍व अ युक्‍त भातामधील गोल्‍डन राईस, बिटी वांगे, बिटी मका, जास्‍त प्रथिनयुक्‍त बटाटेचे वाण आदिंचा समावेश होतो. शेतक-यांना कीड व रोग व्‍यवस्‍थापनावर मोठा खर्च करावा लागतो, रोग व कीड प्रतीकारक वाण निर्मीतीमुळे शेतक-यांना कमी उत्‍पादन खर्चात जास्‍त उत्‍पन्‍न मिळु शकते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ मार्फत संशोधीत केलेले तुर, हरभरा, मुग आदीच्‍या रोग प्रतीकारक वाण देशातच नाही तर विदेशात ही वापरले जातात. कृषि पदविधरांनी कृषिच्‍या मुलभूत संशोधनात योगदान देणे आवश्‍यक असुन राष्ट्रिय पातळीवरील कृषि क्षेत्रातील संशोधकांच्‍या पदाकरीत प्रयत्‍न करण्‍याचा सल्‍लाही या‍वेळी त्‍यांनी कृषि पदविधरांना दिला.
      अध्‍यक्षीय भाषणात प्रभारी कुलगूरू तथा शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) डॉ. विश्‍वास शिंदे म्‍हणाले की, अन्‍न सुरक्षा व पिकांचे रोग व्‍यवस्‍थापन यात निकडचा संबंध आहे. दरवर्षी पिकांमध्‍ये रोग व कीडी मुळे 37 ते 40 टक्‍के नुकसान होते, त्‍याची अंदाजे किंमत 2 अब्‍ज अमेरिकन डॉलर होते. 2050 सालीच्‍या देशाची लोकसंख्‍येला अन्‍न पुरवण्‍यासाठी शेतीचे उत्‍पादन दुप्‍पट करावे लागेल. यासाठी पिक रोगशास्‍त्र व कीडशास्‍त्राचे योगदान मोलाचे ठरणार आहे. विशेषता जैवीक व अजैवीक ताण, हवामान बदल, नैसर्गीक संसाधनाची कमतरता, काढणी पश्‍चात अन्‍नधान्‍याची होणारी हानी यामुळे अन्‍न सुरक्षेचे उदिदष्‍ट गाठण्‍यास अडचणी निर्माण होऊ शकतात. त्‍यादृष्टिने हा राष्ट्रिय परिसंवाद अत्‍यंत महत्‍वाचा आहे.
        परिसंवादास महाराष्‍ट्र, गुजरात आणि गोवा या तीन राज्‍यांतुन वनस्‍पती रोग शास्‍त्रज्ञ, प्राध्‍यापक, विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बदनापुर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डी एन धुतराज यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ विना भालेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ ए पी सुर्यवंशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी डॉ के टी आपेट, प्रा आर डब्‍लु देशमुख, डॉ जे पी जगताप, डॉ व्‍ही एम घोळवे, डॉ के डी नवगीरे, डॉ डी जी हिंगोले, डॉ पी एच घंटे, डॉ एस एल बडगुज, प्रा आर व्‍ही देशमुख, तसेच विविध समित्‍याच्‍या सदस्‍यानी परीश्रम घेतले. 


Thursday, December 26, 2013

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ स्‍पर्धामंचाच्‍या संकल्‍प व्‍याख्‍यानमालेचे शेवटचे पुष्‍प


कार्यक्रमाचे उदघाटन करतांना गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ विलास पाटील, कृषि उपसंचालक श्रीमती रक्‍क्षा शिंदे, उपजिल्‍हाधिकारी श्री जनार्धन विधाते, कॅप्‍टन बालाजी सुर्यवंशी, डॉ अभय पडिले, डॉ एच व्‍ही काळपांडे, श्री अमोल राठोड, शिवाजी येवतीकर आदी
मार्गदर्शन करतांना गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ विलास पाटील
कृषि उपसंचालक श्रीमती रक्‍क्षा शिंदे
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ स्‍पर्धामंचाच्‍या 2013 यावर्षातील संकल्‍प व्‍याख्‍यानमालेचे शेवटच्‍या पुष्‍पात  दि 25 डिसेंबर 2013 रोजी कृषि उपसंचालक श्रीमती रक्‍क्षा शिंदे, उपजिल्‍हाधिकारी श्री जनार्धन विधाते, भारतीय सेनेतील कॅप्‍टन बालाजी सुर्यवंशी, तालुका कृषि अधिकारी डॉ अभय पडिले यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्‍य अध्‍यक्षस्‍थानी गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ विलास पाटील होते तर व्‍यासपीठावर ज्‍वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ एच व्‍ही काळपांडे, मंचाचे अध्‍यक्ष अमोल राठोड, उपाध्‍यक्ष शिवाजी येवतीकर, विद्यार्थीनी अध्‍यक्ष कु स्‍वाती कदम, उपाध्‍यक्ष कु प्रियांका शिंदे उपस्थित होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ  स्‍पर्धामंच विद्यापीठातील विद्यार्थी व विद्यार्थीनी मार्फत स्‍पर्धापरीक्षेच्‍या तयारीसाठी मार्गदर्शन वर्ग, वाचनालय, ग्रंथालय, चाचणी परिक्षा असे विविध उपक्रम राबविले जातात त्‍या अंतर्गत या व्‍याख्‍यानमालेचे आयोजन कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात करण्‍यात आले होते.
कृषि उपसंचालक श्रीमती रक्‍क्षा शिंदे मार्गदर्शन करतांना म्‍हणाल्‍या कि, स्‍पर्धा परीक्षात यशासाठी तसेच नौकरी करीयर मध्‍ये चांगले काम करण्‍यासाठी मुलींनी निर्णय क्षमता विकसित करणे आवश्‍यक आहे. कष्‍ट, जिकाटी व वेळेचे नियोजन हेच यशाचे गमक आहे. इंग्‍लीश व मराठी वृत्‍तपत्राचे नियमीत वाचन करण्‍याचा सल्‍लाही त्‍यांनी दिला. श्री जनार्धन विधाते यांची यावर्षी उपजिल्‍हाधिकारी यापदावर नियूक्‍ती झाली असून सध्‍या ते मंडल कृषि अधिकारी यापदावर कार्यरत आहेत. ते आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, मी सर्वसामान्‍य कुटुंबातुन दहावी व बारावीत जेमतेम मार्क घेउन ऊर्त्‍तीण झालो तरी आत्‍मविश्‍वास व सकारात्‍मक दृष्टिकोनाच्‍या आधारे उपजिल्‍हाधिकारी होऊ शकलो. विद्यापीठातील चार वर्षीचा शैक्षणिक काळ तुम्‍हाच्‍या आयुष्‍याची दिशा ठरविणार असुन या काळात तुम्‍ही वाईट गोष्‍टीपासुन दुर रहावे. भारतीय सेनेतील कॅप्‍टन बालाजी सुर्यवंशी आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, माझी भारतीय सेनेत निवड झाली यांचे श्रेय मी कृषि महाविद्यालयाला देतो. कृषि पदवीधरांनी राज्‍याच्‍या व देशाच्‍या कृषि क्षेत्रात योगदान देण्‍याची गरज आहे. जीवनात यशस्‍वी होण्‍यासाठी नियमित वाचन महत्‍वाचे आहे. वाचन करून विचार मंथन केल्‍यास विविध विषयावर स्‍वत:च्‍या व्‍यापक दृष्टिकोन विकसित होतो. अध्‍यक्षीय भाषणात सहयोगी अधिष्‍ठाता डॉ विलास पाटील म्‍हणाले की, विद्यार्थ्‍याचा स्‍पर्धामंचाचे विविध उपक्रम हे अत्‍यंत चांगले असुन यामुळे अनेक विद्यार्थ्‍या घडत आहेत. विद्यार्थ्‍याची जिद्द व शंभर टक्के प्रयत्‍न हेच परिक्षात यश मिळवुन देतात. या प्रसंगी डॉ अभय पडिले व डॉ एच व्‍ही काळपांडे यांनीही मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे  प्रास्‍ताविक नितिन लिंगायत यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री सुनिल भालेकर यांनी तर आभार प्रदर्शन देवानंद शेटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुजित सानप, संदिप पवार, सतीश काकडे, गोपाल गजानन, अरूण सिरसाट, स्‍वाती खाडे, पल्‍लवी पवार व मंचाच्‍या सदस्‍यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठया संख्‍येने उपस्थित होते तसेच मान्‍यवरांनी विद्यार्थीशी थेट संवाद साधुन स्‍पर्ध परिक्षेबाबत शंकाचे समाधान केले.
उपजिल्‍हाधिकारी श्री जनार्धन विधाते

कॅप्‍टन बालाजी सुर्यवंशी
डॉ एच व्‍ही काळपांडे
डॉ अभय पडिले

क्षणचित्रे 2013

Friday, December 20, 2013

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे राष्‍ट्रीय परिसंवादाचे आयोजन


     वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्‍या वनस्‍पती रोगशास्‍त्र विभाग व नवी दिल्‍ली येथील भारतीय वनस्‍पती रोगशास्‍त्र संस्‍था (Indian Phytopathological Society, IARI, New Delhi) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने पिकांवरील रोग : निदान, एकात्मिक व्‍यवस्‍थापन आणि अन्‍नसुरक्षा या विषयावर राष्‍ट्रीय परिसंवादाचे (पश्चिम क्षेत्रीय) आयोजन कृषि महाविद्यालय, परभणी येथे दि. 27 व 28 डिसेंबर, 2013 रोजी करण्‍यात आले आहे.
    परिसंवादाचे उद्घाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि‍ विद्यापीठाचे मा. कुलगुरू मा. श्री संजीव जयस्‍वाल (भाप्रसे) यांच्‍या हस्‍ते होणार असुन प्रमुख पाहुणे म्‍हणुन आंतरराष्‍ट्रीय नामांकित शास्‍त्रज्ञ तथा भारतीय कृषि शास्‍त्रज्ञ निवड मंडळ, नवी दिल्‍ली चे माजी अध्‍यक्ष डॉ. चारुदत्‍त मायी हे उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) डॉ. विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर व कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. बालासाहेब भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
      सदरील परिसंवादात पुणे येथील भारतीय कृषि संशोधन संस्‍थेच्‍या विभागीय केंद्राचे प्रमुख डॉ. व्हि. व्हि. दातार, नवी दिल्ली येथील वनस्‍पती रोगशास्‍त्र विभागाच्‍या प्रमुख शास्‍त्रज्ञा डॉ. प्रतिभा शर्मा, सोलापुर येथील डाळींब संशोधन केंद्राच्‍या प्रमुख शास्‍त्रज्ञा डॉ. ज्‍योत्‍स्‍ना शर्मा, खांडवा (इंदौर) येथील सोयाबीन संशोधन केंद्राचे प्रमुख शास्‍त्रज्ञ डॉ. जी. के. गुप्‍ता, हैद्राबाद येथील राष्‍ट्रीय वनस्‍पती आरोग्‍य व्‍यवस्‍थापन संस्‍थेचे डॉ.ए.यु.एकबोटे, सोलापुर येथील डाळींब संशोधन केंद्राचे माजी संचालक डॉ. व्‍ही. टी. जाधव, भारतीय कृषि संशोधन संस्‍थेच्‍या विभागीय केंद्राचे प्रमुख माजी प्रमुख डॉ. के. के. झोटे, महाबळेश्‍वर येथील गहू गेरवा संशोधन केंद्राचे माजी प्रमुख शास्‍त्रज्ञ डॉ. बी. पी. कुरुंदकर इत्‍यादी शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच महाराष्‍ट्र, गुजरात आणि गोवा या तीन राज्‍यांतुन वनस्‍पती रोग शास्‍त्रज्ञ, प्राध्‍यापक, विद्यार्थी या परिसंवादामध्‍ये सहभागी होणार आहेत. परिसंवादाच्‍या यशस्‍वीतेसाठी विविध समित्‍यांचे गठण करण्‍यात आले आहे. कृषि क्षेत्रातील शास्‍त्रज्ञ, प्राध्‍यापकवृंद आणि विद्यार्थ्‍यांनी परिसंवादास उपस्थित राहण्‍याचे आवाहन परिसंवादाचे आयोजन सचिव व विभाग प्रमुख डॉ. ए. पी. सुर्यवंशी यांनी केले आहे.