Sunday, December 18, 2022

राणीसावरगांव येथे भाडेतत्वावर कृषि अवजारे सेवा केंद्राचे उदघाटन व पशुपालकांचा मेळावेचे आयोजन

वनामकृवितील पशुशक्‍तीचा योग्य वापर योजने अंतर्गत बैलचलित सुधारीत अवजारांचा समावेश असलेल्‍या भाडेतत्वावर कृषि अवजारे सेवा केंद्राची उभारणी व शेतकरी पशुपालक मेळाव्याचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प पशुशक्‍तीचा योग्य वापर योजना आणि राणी सावरगांव येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा यांचे संयुक्त विद्यामाने वनामकृवि विकसित बैलचलित अवजारांचा समावेश असलेले भाडेतत्वावर कृषि अवजारे सेवा केंद्राचे (कस्टम हायरिंग सेंटर) उदघाटन व शेतकरी पशुपालक मेळाव्‍याचे दिनांक २० डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता राणीसावरगांव (ता. गंगाखेड जि. परभणी) येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज गोशाळात आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमासाठी अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि राहणार असुन उदघाटक म्‍हणुन परभणी जिल्हाधिकारी मा श्रीमती आंचल गोयल यांची उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख अतिथी म्‍हणुन अहमदाबाद येथील बंसी गिर गोशाळाचे अध्यक्ष मा. गोपालभाई सुतारीया उपस्थित राहणार असुन मुंबई येथील ग्लोबल विकास ट्रस्टचे मुख्यसंचालक मा. श्री मयंक गांधी, भारतीय जीव पशु कल्याण व राष्‍ट्रीय पंचगव्य अनुसंधान समितीचे सदस्य श्री. सुनिल मानसिंहका, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कृषि सहसंचालक श्री साहेबराव दिवेकर, जिल्‍हा ग्रामीणी विकास यंत्रणाच्‍या प्रकल्‍प संचालिका श्रीमती रश्‍मी खांडेकर, प्राचार्य डॉ उदय खोडके, विभाग प्रमुख डॉ गजेंद्र लोंढे आदीची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

सदर उभारण्‍यात येणा-या भाडेतत्वावर कृषि अवजारे सेवा केंद्रात विद्यापीठ विकसित बैलचलित बहुविध पेरणी यंत्र, धसकटे गोळा करणे अवजार, तिहेरी कोळपे, बैलचलित सरी पाडणे यंत्र, ऊसाला माती लावणे अवजार, हळदीला माती लावणे अवजार, हळद काढणी अवजार, एक बैलाची अवजारे, कापसातील कोळपणी व खत देणे अवजार, बैलचलित सोलार तणनाशक व किटकनाशक फवारणी यंत्र, अजारी पशुधन उभा करणे यंत्र इत्यादी विविध अवजारे उपलब्‍ध करण्‍यात येणार असुन ही अवजारे परिसरातील शेतकरी बांधवांना भाडेतत्‍वावर वापराकरिता राणीसावरगांव येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याप्रसंगी उपलब्ध अवजारांचे प्रात्यक्षिके प्रत्यक्ष शेतावर दाखवण्यात येणार आहे.

याप्रसंगी आयोजित तांत्रिक सत्रामध्ये विविध विषयावर तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहे, यात गोशाळेवर निर्मित गोखुर खत, गोकृपाअमृत, दषपर्णी अर्क निर्मिती व वापर, सेंद्रीय शेतीमध्ये विकसित बैलचलित अवजारांच्या वापर, कृषि यांत्रिकीकरण व मुल्यवर्धन, आधुनिक पध्दतीने पशुपालन व आरोग्य व्यवस्थापन, गो आधारीत शेती इत्यादी विषयावर सखोल तज्ञ मार्गदर्शन करणार असुन शेतकरी बांधवाचे अनुभव कथन होणार आहे. तरि सदर कार्यक्रमास परिसरातील शेतकरी बांधव व पशुपालकांनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन आयोजक वनामकृविच्‍या पशयोवा योजनेच्‍या संशोधन अभियंता डॉ. स्मिता सोलंकी व श्री. छत्रपती शिवाजी महाराज गोशाळाचे संचालक श्री. शिवप्रसाद कोरे यांनी केले आहे.

Saturday, December 17, 2022

देशविदेशातील नामांकित संस्थेशी परभणी कृषी विद्यापीठाचा जास्‍तीत जास्‍त संबंध जोडण्‍याचा प्रयत्‍न ..... कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि

वनामकृवि शास्‍त्रज्ञ व प्राध्‍यापकांशी अमेरिकेतील शास्‍त्रज्ञ वरीष्‍ठ प्राध्‍यापक डॉ धर्मेद्र सारस्‍वत यांनी साधला संवाद

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ व प्राध्‍यापकांशी अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातील कृषि आणि जीवशास्‍त्रीय अभियांत्रिकीचे शास्‍त्रज्ञ वरीष्‍ठ प्राध्‍यापक डॉ धर्मेद्र सारस्‍वत यांनी दिनांक १२ डिसेंबर रोजी संवाद साधला. संवाद कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे होते तर अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातील कृषि आणि जीवशास्‍त्रीय अभियांत्रिकीचे वरीष्‍ठ प्राध्‍यापक डॉ धर्मेद्र सारस्‍वत, आयआयटी मुंबईचे प्रा. ईश्‍वर राजशेखर, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य (कृषी महाविद्यालय) डॉ सय्यद ईस्‍माईल, प्राचार्य (कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय) डॉ उदय खोडके, प्राचार्य (अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालय) डॉ राजेश्‍वर क्षीरसागर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय मार्गदर्शनात कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि म्‍हणाले की, देश-विदेशातील कृषि क्षेत्राशी संबंधित नामांकित संस्‍थेतील शास्‍त्रज्ञ व प्राध्‍यापक आणि परभणी कृषी विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, प्राध्‍यापक व विद्यार्थी यांचात कृषि संशोधनाबाबत सातत्‍याने विचारांची देवाणघेवाण होणे आवश्‍यक आहे, यामुळे विद्यापीठातील संशोधनास दिशा मिळेल. याकरिता परभणी कृषी विद्यापीठ देश-विदेशातील विविध नामांकित संस्‍थेशी सामंजस्‍य करार करून प्रशिक्षणाच्‍या माध्‍यमातुन विविध विषयात शास्‍त्रज्ञ व विद्यार्थी यांच्‍या कौशल्‍य विकासावर भर दिला जात आहे. तसेच दुस-या बाजुने विद्यापीठ शास्‍त्रज्ञ शेतकरी बांधवाशी जास्‍तीत जास्‍त संवाद साधत आहेत. 

अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठाचे वरीष्‍ठ प्राध्‍यापक डॉ धर्मेद्र सारस्‍वत म्‍हणाले की, अनेक भारतीय शास्‍त्रज्ञ विदेशात कृषी संशोधनात योगदान देत आहेत. भारतीय शेती पुढे अनेक आव्‍हाने आहेत, अमेरिकेतील व इतर देशातील कृषी संशोधन क्षेत्रातील ज्ञान व तंत्रज्ञान भारतीय शेतीस उपयुक्‍त ठरू शकते. याकरिता देशविदेशातील संशोधन संस्‍थेशी परभणी कृ‍षी विद्यापीठाची नाळ जोडण्‍याची आवश्‍यकता असल्‍याचे सांगुन त्‍यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन भारतात आणि विशेषतः महाराष्‍ट्रात कश्या प्रकारे राबविता येईल यावर मार्गदर्शन केले.

संशोधन क्षेत्रात आयआयटी मुंबई जास्‍तीत जास्‍त तळागाळातील संस्‍था व व्‍यक्‍तीशी संबंध जोडण्‍याचा प्रयत्‍न करित असल्‍याचे आयआयटी मुंबईचे प्रा. ईश्‍वर राजशेखर यांनी सांगितले. कार्यक्रमात विविध महाविद्यालयातील पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रमातील विद्यार्थी संशोधनावर सविस्‍तर चर्चा करण्‍यात आली, याबाबत सुधारणेबाबत मार्गदर्शन करण्‍यात आले. याप्रसंगी डॉ धर्मेद्र सारस्‍वत व प्रा. ईश्‍वर राजशेखर यांनी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयास भेट देऊन प्रयोगशाळा अद्यावत करणे आणि नवीन विषयावर संशोधन करण्याच्या सूचना दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक व प्रमुख पाहुण्‍याचा परिचय प्राचार्य डॉ उदय खोडके यांनी करून दिला तर सुत्रसंचालन डॉ सचिन मोरे यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.



Friday, December 16, 2022

वनामकृवितील कापुस विशेषज्ञ डॉ. बेग यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कृषि संशोधक पुरस्काराने सन्‍माननित

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राचे कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर समद बेग यांना महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्‍या वतीने राज्‍यस्‍तरीय ‘उत्कृष्ट कृषि संशोधक पुरस्कार’ राज्याचे कृषिमंत्री मा. ना. श्री. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते दिनांक १४ डिसेंबर रोजी देण्यात आला. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठात पार पडलेलेल्या ५० व्या संयुक्त कृषि संशोधन व विकास समिती बैठकीच्‍या उदघाटन प्रसंगी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी दापोली येथील डॉबासाकोकृविचे कुलगुरू मा. डॉ. संजय सावंत, वनामकृविचे कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि, राहुरी येथील मफुकृ‍विचे कुलगुरू मा. डॉ. प्रशांतकुमार पाटील, अकोला येथील डॉपंदेकृविचे कुलगुरू मा. डॉ. शरद गडाख, महाराष्‍ट्र शासनाचे प्रधान सचिव (कृषि) मा. श्री. एकनाथजी डवले, कृषी परिषदेचे महासंचालक मा. श्री. रावसाहेब भागडे, संशोधन संचालक डॉ. हरिहर कौसडीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. कृषि संशोधनातील भरीव अश्‍या योगदानाबद्दल डॉ. खिजर समद बेग यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पुरस्‍काराबद्दल कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि, संचालक संशोधक डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर आदीसह कृषि विद्यापीठाचे अधिकारी, शास्त्रज्ञ व कर्मचारी यांनी डॉ बेग यांचे अभिनंदन केले आहे.

डॉ. खिजर बेग यांचे संशोधन कार्य  

डॉ. बेग मागील १९ वर्षांपासून कृषि संशोधनात कार्यरत असुन सोयाबीन व कापूस पिकातील एकूण १६ वाणांच्या विकासामध्ये सहभाग आहे. सोयाबीन पिकातील एमएयुएस १५८, एमएयुएस १६२, एमएयुएस ६१२ व एमएयुएस ७२५ हे ४ वाण त्यांनी विकसित केले असुन एमएयुएस १६२ हा कम्बाईन हार्वेस्टरद्वारे कापणी-मळणी साठी उपयुक्‍त असणारा राज्यातील पहिला वाण आहे. खोडमाशीसाठी सहनशील वाण असणारा एमएयुएस १५८, बदलत्या हवामानात तग धरणारा एमएयुएस ६१२ वाण विकसित करण्‍यात त्‍यांचा मोलाचा वाटा आहे. देशी कापूस पिकाचे ८ व अमेरिकन कपाशीचे ४ वाण विकसित करण्यात त्‍यांचा महत्वाचा सहभाग असुन देशी कपाशीची गुणवत्ता - धाग्याची लांबी देशामध्ये सर्वात जास्त असणारा पीए ८१२ हा वाण विकसित करण्यात आला आहे. महाबीजच्या सहकार्याद्वारे एनएचएच ४४ (बीजी २) हा सार्वजनिक क्षेत्रातील पहिला बीटी कापूस संकरित वाण विकासात त्‍यांचे योगदान आहे. कापूस व सोयाबीन पिकातील उत्पादन व संरक्षण तंत्रज्ञानाच्या १२ शिफारशी देण्यात त्यांचा सहभाग आहे. विविध नियतकालिकांमध्ये त्यांचे ५२ शास्त्रीय लेख, परिसंवादामध्ये ६१ सारांश लेख, कृषि विस्ताराची ६ पुस्तके व १०० पेक्षा अधिक लेख त्यांनी लिहिले आहेत. विविध ७ संशोधन प्रकल्पामध्ये त्यांचा सहभाग असुन १० पदव्युत्तर व आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना मुख्य मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले आहे. यापूर्वी राज्यस्तरीय वसंतराव नाईक पुरस्कार, राधाकिशन शांती मल्होत्रा पुरस्कार, राष्ट्रीय स्तरावरील प्रोफेशनल एक्सलेन्स अवार्ड आदी सहा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सद्या विद्यापीठाच्‍या सहयोगी संचालक (बियाणे) या पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत असून या काळात १५० पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक संस्था यांच्याशी बियाणे उत्पादनाचे करार केले आहेत. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी विशेष जनजागृती मोहीम, विद्यापीठ बीजोत्पादन व महसूलात वाढ ही त्यांचे विशेष उल्लेखनीय कार्य आहेत.

कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि यांचा शेतकरी बांधवानी केला अनोखा सत्‍कार

अमेरिकेतील फ्लोरिडो विद्यापीठात मुख्‍यालय असलेल्‍या कृषी आणि जैवप्रणाली अभियांत्रिकी आंतरराष्ट्रीय अकादमी या अग्रगण्‍य वैज्ञानिक संस्‍थेचे फेलो म्‍हणुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांची निवड झाली, त्‍यानिमित्‍त जपान नुकतेच पार पडलेल्‍या विसावी सीआयजीआर जागतिक परिषदेत त्‍यांना फेलो म्‍हणुन सन्‍माननित करण्‍यात आले. सदर आंतरराष्‍ट्रीय फेलो करिता निवडी झाल्‍याबद्दल परभणी जिल्‍हयातील शेतकरी बांधवांच्‍या वतीने कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांचा दिनांक १२ डिसेंबर रोजी अनोखा सत्‍कार केला. परभणी जिल्‍हयातील भाजीपाला शेतकरी गट आणि गोशाळा चालक यांनी स्‍वत:च्‍या शेतातील उत्‍पादित शेतमाल वस्‍तुंची भेट दिली, यात सेंद्रीय भाजीपाल्‍याने सजविलेली डाल देऊन सत्‍कार केला तसेच नैसर्गिक शेतीतील जीवामृत, गांडुळ खत, सेंद्रीय बटाटा चिप्‍स, मध, गिर गाईचं तुप, लाकडी घाण्याचे तेल, जिवामृत, सिताफळ, गोवरी आदी स्‍वत:च्‍या शेतीतील ब्रॅड शेतमाल वस्‍तु भेट देऊन आगळावेगळा सत्‍कार करण्‍यात आला.

शेतकरी बांधवानी केलेल्‍या सत्‍कार व प्रेमाबद्दल आभार व्‍यक्‍त करतांना कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, शेतकरी हाच देशाच्‍या अर्थव्‍यवस्‍थेचा कणा आहे. शेतकरी आहे, तर कृषि विद्यापीठ आहे, शेतकरी आहे, तर देशाची अन्‍न सुरक्षा आहे, शेतकरी आहे तरच देशाची सुरक्षा आहे. शेतकरी बांधवांनी कोणाच्‍याही वाढदिवस, सत्‍कार समारंभा प्रसंगी आपआपल्‍या शेतातील उत्‍पादित शेतमालाची भेट दयावी, यामुळे आपल्‍या शेतमालाची ब्रॅडिंग तयार होण्‍यास मदत होईल. शेतीत रासायनिक घटकांवरील अवलंबत्‍व कमी करून नैसर्गिक घटकांचा वापर वाढीवर भर दयावा. कृषि शास्‍त्रज्ञाकरिता शेतकरी बांधवाचे प्रेम हे पुरस्‍कारापेक्षाही मोठा गौरव असल्‍याचे मत व्‍यक्‍त करून शेतकरी बांधवाच्‍या प्रत्‍यक्ष शेतास भेट देऊन संवाद साधु असे आश्‍वासन त्‍यांनी दिले.  

यावेळी डॉ.गजानन गडदे, डॉ.दिगंबर पटाईत, श्री बालाजी डोईजड, शेतकरी श्री पंडितराव थोरात, श्री जनार्धन आवरगंड, श्री प्रकाश हारकळ, श्री रमेश राऊत, श्री शिवाजी घुले, श्री संभाजी गायकवाड, श्री सुदाम माने, श्री रमेश चौधरी, श्री चापके विठ्ठल, श्री अशोक खिल्लारे, श्री बाळासाहेब घाटोळ, श्री विशाल जावळे, श्री रामेश्वर साबळे, श्री पारनेरे आदी उपस्थित होते.




Wednesday, December 14, 2022

मौजे दैठणा व मौजे रूमना येथे माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम

कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्‍या शास्‍त्रज्ञांचा शेतकऱ्यांशी संवाद

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्‍या वतीने माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमाअंतर्गत प्राध्‍यापक व शास्त्रज्ञ यांच्‍या पथकांनी परभणी तालुक्यातील दैठणा व गंगाखेड तालुक्यातील रूमना या गावास भेटी देऊन गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. पथकात महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ उदय खोडके, डॉ पंडित मुंडे, प्रा. दत्ता पाटील,  श्री लक्ष्मीकांत राऊतमारे यांचा समावेश होता. यावेळी शास्‍त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देऊन गट चर्चा,  शिवार फेरी व मार्गदर्शन केले. विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांच्‍या मार्गदर्शनानुसार दर महिन्यात सदरील उपक्रम राबविण्‍यात येत आहे. 

यावेळी मार्गदर्शनात डॉ. खोडके म्‍हणले की, शेतकरी बांधवांनी मुलस्थानी स्थानी जलसंधारण, सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर, फळबागांसाठी नवीन लागवड पद्धती, हरित गृहातील शेती गटाद्वारे किमान प्रक्रिया व विक्री व्यवस्था यावर भर दयावा. शेती मधील नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. निविष्ठा वरील खर्च कमी करावा व शेतील्तील उत्पन्न वाढवावे असा सल्ला दिला. कृषी क्षेत्रासाठीच्या शासनाच्या उपलब्ध विविध योजनाची माहिती दिली.

डॉ. मुंढे यांनी ट्रक्टर व औजाराद्वारे शेतीतील यांत्रिकीकरण करून वेळ, मजूर आणि श्रम यांची कशी बचत करता येते याविषयीची माहिती दिली. यावेळी मौजे दैठणा येथील शेतकरी श्री मुरली इंगळे यांचे शेतावर पोवेर टिलर यांचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. शेतकऱ्यांशी झालेल्या चर्चे मध्ये श्री मुरली इंगळे यांचे कडील फळबाग लागवड, फळ तोडणी व विक्री व्यवस्था, गांडूळ खत निर्मिती, सेंद्रिय निविष्ठांचा वापार, कृषी औजारे, सिंचन व्यवस्थापन या विषयावर चर्चा करण्यात आली.श्री दत्ता कच्‍छवे यांचेशी निविष्ठा विक्री व शेती व्यवस्थापण तर श्री विष्णू गरुड यांचे शेतावर गहू, हरभरा , कापूस, हळद लागवड व व्यवस्थापन, सिंचन व निचरा, ट्रॅक्टर व बैलचलीत औजारे, पॉवर टिलर  या विषयावर चर्चा झाली. श्री शिवम कछवे यांचे शेतावर तुरीची लागवड, पिकामधील अंतर, आंतर पिक पद्धती आणि तुरीचे व्यवस्थापन यावर चर्चा झाली. प्रक्षेत्र भेटी दरम्‍यान गावातील तरुण शेतक-यांनी मोठया संख्‍येने सहभाग नोंदविला.







ध्येय प्राप्तीसाठी प्रामाणिक प्रयत्नांची जोड हवी ........ प्राचार्य डॉ. उदय खोडके

वनामकृवितील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात नुतन प्रवेशित विद्यार्थीचा अभिमुखता कार्यक्रम संपन्‍न

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून ते ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची जोड देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील बी. टेक. (कृषी अभियांत्रिकी) व एम. टेक. (कृषी अभियांत्रिकी) या अभ्यासक्रमात नव्याने प्रवेश घेतलेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी स्वागत व अभिमुखता कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते, कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते तर व्यासपीठावर विभाग प्रमुख डॉ. स्मिता खोडके, डॉ. स्मिता सोळंकी, प्रा. विवेकानंद भोसले, डॉ. हरीश आवारी, डॉ. संदिपान पायाल, डॉ. सुभाष विखे आदीं उपस्थिती होती.

सध्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढत असून कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कृषी यांत्रिकीकरण, स्वयंचलित औजारे, कृषी प्रक्रिया, सौर उर्जा चलित उपकरणे व पद्धती, ड्रोन तंत्रज्ञान, रोबोटिक, जीआयएस, रिमोट सेन्सिंग, संरक्षित शेती, पोली हाउस व हरित गृहे, संगणक तंत्रज्ञानाचा वापर, मशीन लर्निंग यांचा वापर व अवलंब करणे अनिवार्य झालेले आहे. विकसित देशात या क्षेत्रात खूप प्रगती होत असून भारतात सुद्धा कृषी विकासास चालना देण्यासाठी कृषी अभियांत्रिकी हि विद्याशाखा मोलाचे योगदान देऊ शकते. कृषि यांत्रिकीकरणाव्‍दारे  कृषी क्षेत्रातील मजूर टंचाई व  हवामान बदल, यासारख्या प्रश्नावर मात करणे सुलभ होईल असेही ते पुढे म्हणाले.  

कार्यक्रमात नवीन विद्यार्थांनी आपली ओळख करून दिली व जीवनातील त्यांचे ध्येय काय याबाबत माहिती दिली. पालकांनी सुद्धा यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयातील विभाग प्रमुख, प्राध्यापक यांनी त्यांच्या विभागातील शैक्षणिक सुविधांचा व प्रयोगशाळा यांची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. राष्ट्रीय सेवा योजना, वसतीगृह नियमावली, प्रशिक्षण कार्यक्रम, क्रीडा तसेच सांस्कृतिक उपक्रम, आणि नोकरीच्या संधी याविषयी विविध कक्षाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण विभागाचे प्रभारी अधिकारी प्रा. विवेकानंद भोसले यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी दत्तात्रय पवार आणि आकांक्षा डहाळे यांनी केले, तर आभार विश्वजीत तिकटे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. पंडित मुंडे, डॉ. रवींद्र शिंदे, डॉ. प्रमोदिनी मोरे, डॉ.विशाल इंगळे, प्रा मधुकर मोरे, प्रा दत्तात्रय पाटील, डॉ. शाम गरुड, श्री मंगेश राऊत, दीपक राऊत, एस. के शिवणकर, सुधा सालगुडे, राजकुमार ढगे, श्री.बेडवल, श्री. मनोहर, श्री. शिराळे आदीसह अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठया संख्‍येने उपस्थित होते.


Monday, December 12, 2022

महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांनी स्‍वत:तील ऊर्जेचा सकारात्‍मकरित्‍या वापर करावा ....... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वनामकृवितील परभणी कृषी महाविद्यालयात पदवी अभ्‍यासक्रमास नुतन प्रवेशित विद्यार्थ्‍यांच्‍या उदबोधन कार्यक्रमात प्रतिपादन

महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांमध्‍ये मोठी ऊर्जा असते, या ऊर्जेचा सकारात्‍मकरित्‍या वापर केला पाहिजे. शिस्‍त, कठोर परिश्रम आणि सकारात्‍मकता हेच तुम्‍हाला यशापर्यंत घेऊन जाते. परभणी कृषी विद्यापीठाचे अनेक पदवीधर केवळ देशात आणि राज्‍यात विविध पदावर कार्य करित नसुन विदेशातही संशोधन क्षेत्रात विविध नामांकित संस्‍थेत योगदान देत आहेत. यातील अनेक विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असुन अनेक समस्‍यांना तोंड देत त्‍यांनी हे यश संपादन केले आहे. येणा-या काळात देश-विदेशातील नामांकित शास्‍त्रज्ञ व प्राध्‍यापकांशी विद्यापीठाच्‍या विद्यार्थ्‍यांचा जास्‍तीत जास्‍त संवाद आणि विचारांची देवाणघेवाण व्‍हावा, याकरिता विविध संस्‍थेशी विद्यापीठ सामंजस्‍य करार करित असल्‍याचे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालयात आयोजित कृषि पदवी अभ्‍यासक्रमास नुतन प्रवेशित विद्यार्थ्‍यांचा उदबोधन कार्यक्रमात (दिनांक १२ डिसेंबर) ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन नागपुर येथील केंद्रीय कापुस संशोधन केंद्राचे व्‍यवस्‍थापन परिषदेचे सदस्‍य तथा प्रयोगशील शेतकरी मा श्री दादाजी लाड होते. व्‍यासपीठावर अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातील कृषि आणि जीवशास्‍त्रीय अभियांत्रिकीचे वरीष्‍ठ प्राध्‍यापक डॉ धर्मेद्र सारस्‍वत, आयआयटी मुंबईचे प्रा. ईश्‍वर राजशेखर, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, शिक्षण विभागचे प्रभारी डॉ रणजित चव्‍हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात मा दादाजी लाड म्‍हणाले की, भारतात भरपुर सुर्यप्रकाश, समृध्‍द माती आणि मुबलक पाणी उपलब्‍ध आहे. कृषि प्रधान देशात शेतकरी मात्र वैभवशाली झाला नाही. आज चांगले शिक्षण घेणारा युवक शेतीकडे वळत नाही. कृषि हाच देशाचा आत्‍मा आहे, कोरोना काळात देशाची अर्थव्‍यवस्‍थेस शेती क्षेत्रानेच तारले. देशाच्‍या कृषी संस्‍कृतीत कृषी विद्यापीठे हे ज्ञान मंदिरे आहेत, याच ज्ञान मंदिरात आपणास शिक्षण घेण्‍याची संधी प्राप्‍त झाली आहे. आज तंत्रज्ञानधिष्‍ठात शेती करण्‍याकरिता कृषि पदवीधरांनी शेतीकडे वळण्‍याची गरज असल्‍याचे मत मा श्री दादाजी लाड यांनी व्‍यक्‍त केले.

वरीष्‍ठ प्राध्‍यापक डॉ धर्मेद्र सारस्‍वत यांनी विद्यार्थ्‍यांनी महाविद्यालयीन जीवनात आपल्‍या निश्चित केलेल्‍या ध्‍येयावर लक्ष केंद्रीत करण्‍याचा सल्‍ला दिला तर प्रा. ईश्‍वर राजशेखर यांनी विद्यार्थ्‍यांनी मुलभुत ज्ञानाबरोबरच स्‍वत: जास्‍तीत जास्‍त ज्ञान प्राप्‍ती करिता प्रयत्‍न करण्‍याचा सल्‍ला दिला. मार्गदर्शनात शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी परभणी कृषी महाविद्यालयास गौरवशाली परंपरा असुन येथे शिकलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात चांगले कार्य करित आहेत असे म्‍हणाले.

कार्यक्रमात महाविद्यालयातील विविध परिक्षेत उत्‍कृष्‍ट कामगिरी केलेल्‍या विद्यार्थ्‍यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. तसेच नुतन प्रवेशित विद्यार्थी, पालक यांचेही स्‍वागत करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल यांनी केले. सुत्रसंचालन शिक्षण विभागचे प्रभारी डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले तर आभार विभाग प्रमुख (कृषि अभियांत्रिकी) डॉ रावसाहेब भाग्‍यवंत यांनी मानले. महाविद्यालयाच्‍या वतीने नुतन प्रवेशित विद्यार्थ्‍यांना शैक्षणिक नियम विविध विषयाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विभाग प्रमुख, प्राध्‍यापक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठया संख्‍येने उपस्थित होते.