वनामकृवि शास्त्रज्ञ व प्राध्यापकांशी अमेरिकेतील शास्त्रज्ञ वरीष्ठ प्राध्यापक डॉ धर्मेद्र सारस्वत यांनी साधला संवाद
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ व प्राध्यापकांशी अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातील कृषि आणि जीवशास्त्रीय अभियांत्रिकीचे शास्त्रज्ञ वरीष्ठ प्राध्यापक डॉ धर्मेद्र सारस्वत यांनी दिनांक १२ डिसेंबर रोजी संवाद साधला. संवाद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि हे होते तर अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातील कृषि आणि जीवशास्त्रीय अभियांत्रिकीचे वरीष्ठ प्राध्यापक डॉ धर्मेद्र सारस्वत, आयआयटी मुंबईचे प्रा. ईश्वर राजशेखर, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य (कृषी महाविद्यालय) डॉ सय्यद ईस्माईल, प्राचार्य (कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय) डॉ उदय खोडके, प्राचार्य (अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय) डॉ राजेश्वर क्षीरसागर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय मार्गदर्शनात कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, देश-विदेशातील कृषि क्षेत्राशी संबंधित नामांकित संस्थेतील शास्त्रज्ञ व प्राध्यापक आणि परभणी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक व विद्यार्थी यांचात कृषि संशोधनाबाबत सातत्याने विचारांची देवाणघेवाण होणे आवश्यक आहे, यामुळे विद्यापीठातील संशोधनास दिशा मिळेल. याकरिता परभणी कृषी विद्यापीठ देश-विदेशातील विविध नामांकित संस्थेशी सामंजस्य करार करून प्रशिक्षणाच्या माध्यमातुन विविध विषयात शास्त्रज्ञ व विद्यार्थी यांच्या कौशल्य विकासावर भर दिला जात आहे. तसेच दुस-या बाजुने विद्यापीठ शास्त्रज्ञ शेतकरी बांधवाशी जास्तीत जास्त संवाद साधत आहेत.
अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठाचे वरीष्ठ प्राध्यापक डॉ धर्मेद्र सारस्वत म्हणाले की, अनेक भारतीय शास्त्रज्ञ विदेशात कृषी संशोधनात योगदान देत आहेत. भारतीय शेती पुढे अनेक आव्हाने आहेत, अमेरिकेतील व इतर देशातील कृषी संशोधन क्षेत्रातील ज्ञान व तंत्रज्ञान भारतीय शेतीस उपयुक्त ठरू शकते. याकरिता देशविदेशातील संशोधन संस्थेशी परभणी कृषी विद्यापीठाची नाळ जोडण्याची आवश्यकता असल्याचे सांगुन त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात कश्या प्रकारे राबविता येईल यावर मार्गदर्शन केले.
संशोधन क्षेत्रात आयआयटी मुंबई जास्तीत जास्त तळागाळातील संस्था व व्यक्तीशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करित असल्याचे आयआयटी मुंबईचे प्रा. ईश्वर राजशेखर यांनी सांगितले. कार्यक्रमात विविध महाविद्यालयातील पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रमातील विद्यार्थी संशोधनावर सविस्तर चर्चा करण्यात आली, याबाबत सुधारणेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी डॉ धर्मेद्र सारस्वत व प्रा. ईश्वर राजशेखर यांनी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयास भेट देऊन प्रयोगशाळा अद्यावत करणे आणि नवीन विषयावर संशोधन करण्याच्या सूचना दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्याचा परिचय प्राचार्य डॉ उदय खोडके यांनी करून दिला तर सुत्रसंचालन डॉ सचिन मोरे यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.