
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या
अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयातील विभागप्रमुख तथा कॉमन इन्क्यूबेटर सेंटरचे प्रमुख प्रा.
हेमंत देशपांडे हे ३४ वर्षांच्या सेवेनंतर नियत
वयोमानानुसार दिनांक ३० जून रोजी विद्यापीठ सेवेतून निवृत्त झाले आहेत.
या निमीत्ताने महाविद्यालयात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. इन्द्र मणि यांनी
ऑनलाईन माध्यमातून सहभाग घेत, प्रा. देशपांडे
यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी प्रा. देशपांडे यांच्या नेतृत्वगुणांचे आणि अन्नतंत्रज्ञान
महाविद्यालयाच्या विकासात दिलेल्या मोलाच्या योगदानाचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्यासह डॉ. पांडुरंग
सत्वधर, डॉ. ए. आर. सावते, डॉ. विजया पवार, श्री शिवाजी महाविद्यालयातील सूक्ष्म जीवशास्त्र विभागाच्या
प्रमुख प्रा. डॉ. मंजिरी भाटे - देशपांडे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या हस्ते
प्रा. देशपांडे यांना महाविद्यालयाच्या वतीने ‘सन्मानपत्र’ प्रदान करण्यात आले. तसेच
डॉ. आसेवार यांनीही प्रा. देशपांडे यांच्या कार्याची प्रशंसा केली आणि विद्यार्थ्यांमध्ये
संशोधन व नवोन्मेषाची प्रेरणा निर्माण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाची सुरुवात सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर
यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी प्रा. देशपांडे यांच्या तीन दशकांहून अधिक काळाच्या
सेवेत त्यांच्या शैक्षणिक, प्रशासकीय
व विस्तार कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या योगदानाचा गौरव केला.
आपल्या निरोपपर भाषणात प्रा. देशपांडे भावुक होत सहकारी, विद्यार्थी आणि प्रशासनाचे मन:पूर्वक आभार
मानले. “संस्था ही व्यक्तीपेक्षा मोठी असते. मला खूप काही मिळालं, पण मीही मनापासून देण्याचा प्रयत्न केला,” असे त्यांनी नम्रपणे नमूद केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. प्रीती ठाकूर
यांनी केले. संपूर्ण अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या
कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी केला.
या सन्मान समारंभास सर्व प्राध्यापक, शैक्षणिक व अशैक्षणिक कर्मचारी, पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी. विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित
होते.