Friday, March 7, 2014

मराठवाडयात येत्या चार दिवस तुरळक ठिकाणी वादळी वा-यासह पाऊसाची शक्यता

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषि हवामानशास्त्र विभागाच्‍या ग्रामिण कृषी मौसम सेवा प्रकल्‍पामार्फत प्राप्‍त माहितीनुसार येत्‍या सोमवार पर्यंत मराठवाडयात तुरळक ठिकाणी पुन्‍हा वादळी वा-यासह पाऊस पडण्‍याची शक्‍यता वर्तवली असुन कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहणार आहे, तसेच हवेतील आद्रतेच्‍या प्रमाणात वाढ होणार आहे. याचे कारण म्‍हणजे पश्चिमीवात (ईस्‍ट्रलीझ) प्रकारचे वारे लक्षव्‍दीप व दक्षिण गुजरात या भुप्रदेशावर निर्माण झाले असुन मालदीप बेटे व लक्षव्‍दीप समुह यावर भूपृष्‍ठापासुन सुमारे 900 मीटर उंचीवर हवामान द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. भूपृष्‍ठापासुन दीड ते दोन कि. मी. उंचीवर अरबी समुद्रामध्‍ये महाराष्‍ट्राच्‍या समुद्रतटीय प्रदेशावर अशीच हवामान द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती येत्‍या दोन दिवसात अशीच राहण्‍याची शक्‍यता आहे. याचाच परिणाम म्‍हणुन येत्‍या 11 मार्चपर्यंत मराठवाडयातील सर्व जिल्‍हयात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विशेषत: जालना, बीड, लातुर व उस्‍मानाबाद जिल्‍हयात तुरळक ठिकाणी गारा पडण्‍याची शक्‍यता आहे, अशी माहिती ग्रामिण कृषी हवामान विभागाचे मुख्‍य प्रकल्‍प समन्‍वयक प्रा. प्रल्‍हाद जायभाये यांनी दिली असुन यास कृषि हवामान विभागाचे प्रभारी अधिकारी डॉ बी. व्‍ही. आसेवार यांनी यास दुजोरा दिला आहे.
    ग्रामिण कृ‍षी मौसम सेवा मार्फत मागील आठवडयात वर्तविण्‍यात आलेल्‍या अंदाजाप्रमाणे बुधवार व गुरूवार रोजी नांदेड, जालना व बीड जिल्‍हयात अनेक ठिकाणी गारा पडल्‍या. बीड जिल्‍हातील परळी तालुक्‍यातील प्रगतीशील शेतकरी कृषिभुषण नाथाराव कराड यांनी सांगीतले की प्रकल्‍पाच्‍या संदेशाप्रमाणे इंजेगाव व परिसरात भारी स्‍वरूपात गारपीट होऊन फळपिकांसह रब्‍बी पिकांचे मोठी हानी झाली आहे. याच प्रमाणे प्रतिक्रीय नांदेड जिल्‍हयातील लोहा तालुकयातील रिसनगांवचे शेतकरी महादेव शिंदे यांनी व्‍यक्‍त केली.