वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या (पं. नांदेड) महिला
शास्त्रज्ञांनी गोदा फॉर्म, कळमनुरी (जि. हिंगोली) यांच्या वतीने दिनांक ५ ऑगस्ट रोजी आयोजित शेतकरी
मेळाव्यात सहभागी होत जैविक, नैसर्गिक आणि शाश्वत
शेतीसंदर्भात थेट शेतकऱ्यांपर्यंत जाऊन सखोल मार्गदर्शन केले.
सदर मेळाव्याचे आयोजन गिरामवाडी व सांडस (ता. कळमनुरी) येथे करण्यात आले
होते. विशेष म्हणजे, शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना त्यांच्या कामावर जाण्यापूर्वीच भेट दिली आणि
शेतपातळीवरच विविध विषयांवर संवाद साधला.
या मेळाव्याचे आयोजन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या
मार्गदर्शनाखाली तसेच संचालक संशोधन डॉ. के. एस. बेग यांच्या नेतृत्वाखाली करण्यात
आले. यामध्ये डॉ. आनंद गोरे आणि महिला शास्त्रज्ञा डॉ. मीनाक्षी पाटील, डॉ. पतिता गौरखेडे
व प्रा. प्रितम भुतडा यांनी सक्रीय सहभाग घेतला. सांडस गावच्या उपसरपंच सौ. वनिता
जाधव या मान्यवर पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
प्रा. प्रितम भुतडा यांनी जैविक पद्धतीने हळद लागवड कशी करावी, यावर सविस्तर
माहिती दिली. डॉ. गौरखेडे यांनी सेंद्रिय खतांचे नियोजन, तर
डॉ. पाटील यांनी हळदीमधील जैविक रोग नियंत्रण व बायोमिक्सच्या वापराचे तंत्र समजावून
सांगितले.
या कार्यक्रमात जैविक हळद लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात
उपस्थिती होती. गोदा फॉर्मचे श्री दिग्विजय काटकर यांनी जैविक घटकांचा वापर
केल्यास हळदीला उत्तम बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमात
मार्गदर्शक घडीपत्रिकांचे वाटपही करण्यात आले. विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी
केलेला हा थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा उपक्रम खरोखरच अनुकरणीय ठरला आहे.