सोयाबीनची उगवणक्षमता तपासणी व
बीजप्रक्रिया
मागील हंगामातील सप्टेंबर व आक्टोबर
महिन्यात सोयाबीन पीक काढणीच्या काळात झालेल्या वादळी पाऊस व अतिवृष्टीमुळे
सोयाबीन बियाणे उत्पादन घटले असुन सोयाबीनच्या बियाण्याच्य गुणवत्तेवर मोठा
परिणाम झाला आहे. येत्या हंगामात सोयाबीन बियाणाची कमतरता पडण्याची दाट शक्यता
आहे. तथापी सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पीक असुन पेरलेल्या वाणाचे गुणधर्म व त्यापासुन
उत्पादीत सोयाबीन बियाणे यामध्ये अधिक तफावत आढळत नाही. सोयाबीन पीकाच्या
लागवडीमध्ये वापरण्यात येणारे बियाणे हे सरळ वाण असल्याने बियाणे प्रत्येक
वर्षी बदलण्याची गरज नसते. एकदा प्रमाणित बियाणे पेरल्यानंतर त्यापासुन उत्पादीत
बियाणे सतत तीन वर्षापर्यंत वापरता येते. यासाठी शेतक-यांनी विविध कंपनीचे बाजारात
विक्रीसाठी आलेले बियाण्याचा आग्रह न धरता स्वत:कडील बियाणे वापरावे. याच बरोबर
आपल्या घरचे बियाणे वापरल्यामुळे बियाणे खर्चात बचत करता येईल. यासाठी
शेतक-यांनी खरीप हंगामासाठी आपल्या शेतामध्ये गेल्यावर्षी प्रमाणित बियाण्यांपासुन
घेतलेल्या सोयाबीनच्या उत्पादनातुन स्वत:कडील बियाणे पेरणीसाठी वापरावे.
सोयाबीन पिकाच्या पेरणीसाठी प्रती हेक्टरी ७५ कि. ग्रॅ. बियाणे म्हणजेच एकरी ३०
कि. ग्रॅ. बियाणे लागते, याप्रमाणे आपल्या क्षेत्रानुसार बियाणे पेरणीपुर्वी
उपलब्ध करून स्वच्छ करून ठेवावे.
उगवणशक्ती तपासणी
सोयाबीन पिकाच्या बियाण्यात
अंकुर हे आवरणालगतच असुन ते अतिशय नाजुक असते. बाहेरून होणा-या आघातामुळे बियाण्यास
नुकसान होऊन त्याची उगवणक्षमता कमी होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे
सोयाबीनचे बियाणे असणारे पोते उंचीवरून फेकु नयेत किंवा बियाणे आपटणार नाही याची
काळजी घ्यावी. येत्या हंगामामध्ये आपण मागील वर्षी उत्पादीत घरचे बियाणे
वापरणार असल्यास त्याची उगवणक्षमता तपासणे आवश्यक आहे. याकरीता घरच्याघरी
उगवणशक्ती तपासता येते. यासाठी आपण जे सोयाबीन बियाणे म्हणुन वापरणार आहोत त्यातुन
काडीकचरा निवडुन बिया मोजुन घ्याव्यात. हे बियाणे ओले कापड किंवा रद्दीपेपरमध्ये
चार ते पाच दिवसांसाठी गुंडाळुन ठेवावे. बियाणे ठेवलेल्या कापडवरती किंवा पेपरवर १
ते २ दिवसाआड नियमितपणे पाणी हलके शिंपडावे. बियाणे उगवण्यासाठी सोयाबीन पीकात ४
ते ५ दिवस लागतात. पाच दिवसांनंतर बियाणे अंकूरलयास ठेवलेले कापड किंवा पेपर काढुन
त्यातील उगवण झालेल्या सोयाबीनच्या बियाण्यांची संख्या मोजावी. सोयाबीन
पिकासाठी उगवणशक्ती किमान ७० टक्के असावी. म्हणजेच अंकूरण्यासाठी टाकलेल्या १००
पैकी किमान ७० बियांची उगवण होणे आवश्यक आहे. घरचे बियाणे वापरताना अशा प्रकारे
उगवणक्षमता तपासणीतुन योग्य असलेले बियाणेच पेरणीसाठी वापरावे.
सोयाबीन बीजप्रक्रिया
कोणत्याही पिकासाठी बीजप्रक्रिया
प्रामुख्याने किड व रोगांचा प्रादुर्भाव कमी करणे व अन्नद्रव्यांची उपलब्धता
वाढविण्यासाठी केली जाते. सोयाबीन पिकांत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी
करण्यासाठी बावीस्टीन 3 ग्रॅम किंवा थायरम 4.5 ग्रॅम प्रती कि. ग्रॅ. बियाणे
याप्रमाणे बियाण्यास हलक्या हाताने चोळावे.
अन्नद्रव्यांची उपलब्धता
वाढविण्यासाठी नत्र स्थिरीकरण करणारे रायझोबीयम व स्फुरद विद्राव्य करणारे
पीएसबी या जीवाणुसंवर्धकांची बीजप्रक्रिया करावी. जीवाणुसंवर्धकांची बीजप्रक्रिया
करण्यासाठी रायझोबीयम जापोनिकम व पीएसबी हे जीवाणूसंवर्धके प्रती १० कि. ग्रॅ.
बियाण्यास २५० ग्रॅम याप्रमाणात वापरावे. सदरील प्रक्रिया करण्यासाठी गुळाचे पाण्यात
द्रावण तयार करावे. याकरीता एक लिटर गरम पाण्यासाठी साधारणत: २५० ग्रॅम गुळ टाकुन
चिकट द्रावण तयार करावे जेणे करून यामाध्यमामूळे जिवाणु संवर्धक बियाण्यावर
चिकटेल. गुळाचे द्रावण तयार झाल्यानंतर बियाणे पोत्यावर सावलीत पातळ थरामध्ये
पसरवुन त्यावर गुळाचे द्रावण हलके शिंपडावे व नंतर रायझोबीयम जपोनिकम व पीएसबी हे
जिवाणु संवर्धन २५० ग्रॅम प्रती १० किलो बियाण्यास याप्रमाणात शिंपडुन हलक्या
हाताने चोळुन बियाणे सावलीत वाळवावे. बुरशीनाशक व जीवाणु संवर्धके या दोन्हींची
बीजप्रक्रीया करतांना बुरशीनाशकांची प्रक्रिया अगोदर करून जीवाणु संवर्धकाची
बीजप्रक्रिया करावी. अशाप्रकारे बीजप्रक्रीया पेरणीच्या पुर्वी तीन ते चार तास
अगोदर करावी.
सौजन्य
डॉ. आनंद गोरे
व्यवस्थापक
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठ, परभणी
मोबाईल क्र ७५८८०८२८७४