Monday, November 3, 2014

मराठवाडयातील मोसंबीने पटकाविला राष्ट्रीय स्‍तरावर प्रथम व व्दितीय पारितोषिक

जालना जिल्‍हयातील जाफ्राबाद तालुक्‍यातील जवखेडा या गांवचे पंढरीनाथ फदाट पारितोषिक स्‍वीकारतांना 
*****************************************
नागपुर येथे १३ वा राष्‍ट्रीय किसान मेळाव्‍याचे आयोजन राष्‍ट्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्रातर्फे दि ३० व ३१ ऑक्‍टोबर रोजी करण्‍यात आले होते. या मेळाव्‍याचे प्रमुख पाहुणे म्‍हणुन माजी कुलगुरू डॉ चारूदत्‍त मायी होते तर अध्‍यक्षस्थानी भारतीय कृषि संशोधन परिषदेचे उपमहानिर्देशक डॉ एन के कृष्‍णकुमार हे होते. या मेळाव्‍यात मराठवाडयातील मोसंबी उत्‍पादकांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या लिंबुवर्गीय फळपिकावर मराठवाडयाकरिता तंत्रज्ञान अभियान योजनेच्‍या वतीने सहभागी करण्‍यात आले. या मेळाव्‍यात राष्‍ट्रीय स्‍तरावरील लिंबुवर्गीय फळ प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले होते. या प्रदर्शनात मोसबी या फळासाठी जालना जिल्‍हयातील जाफ्राबाद तालुक्‍यातील जवखेडा या गांवचे पंढरीनाथ फदाट यांच्‍या मोसबीने प्रथम तर आंबड तालुक्‍यातील पिंपरखेड गांवचे रविंद्र बाबासाहेब गोल्‍डे यांच्‍या मोसबीने व्दितीय पारितोषिक पटकविला. त्‍यांना मेळाव्‍याच्‍या समारोप कार्यक्रमात डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ एस ए निंबाळकर यांच्‍या हस्‍ते गौरवीण्‍यात आले. या मेळाव्‍यात देशभरातील लिंबुवर्गीय उत्‍पादक शेतक-यांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदवीला होता. या मेळाव्‍यात विविध विषयावर विकसित तंत्रज्ञानावर आधारीत मार्गदर्शन नागपुर येथील राष्‍ट्रीय लिंबुवर्गी फळसंशोधन केंद्राचे डॉ एम एस लदानिया व इतर शास्‍त्रज्ञांनी केले तसेच शेतक-यांच्‍या विविध समस्‍यांचे शंका समाधान करण्‍यात आले. या मेळाव्‍यासाठी मराठवाडयातील २५ शेतक-यांसह वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील लिंबुवर्गीय फळपिकावर मराठवाडयाकरिता तंत्रज्ञान अभियान योजनेचे विषय विशेषज्ञ डॉ एम बी सरकटे, डॉ पी डब्‍ल्‍यु एंगडे, डॉ एस पी जिंतुरकर, डॉ पी ए ठोंबरे, डॉ एन डी देशमुख व प्रा एस एच जेधे यांनी सहभाग घेतला. या पारितोषिक विजेत्‍या शेतक-यांचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी अभिनंदन केले.