प्रभारीफेरी प्रसंगी |
मराठवाडयातील शेतक-यांना सद्य दुष्काळस्थितीस धैर्याने तोंड
देण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कुलगुरु मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू
यांच्या संकल्पनेतून व विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली
‘उमेद’ उपक्रम राबविण्यात येत असुन कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या वतीने दि.
७ फेब्रुवारी रोजी मौजे उजळअंबा (ता.जि.परभणी) येथे ‘उमेद’
उपक्रमांतर्गत तंत्रज्ञान प्रसार व उमेद निर्मीती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
होते. विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे, डॉ. धीरज कदम, मंडळ कृषि अधिकारी डी.टी.सामाले,
मुख्याध्यापक जे.बी. देवकते आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. आनंद गोरे म्हणाले की, सद्यस्थितीत रब्बी हंगामात हलक्या कोळपण्या करुन भेगा बुजवणे,
संरक्षित सिंचन देणे, एक आड एक सरी पध्दतीने पाणी देणे,
आच्छादनाचा वापर, खते जमिनीतुन न देता पोटॅशियम नायट्रेट 0.5 टक्के किंवा म्युरेट
ऑफ पोटॅश या खतांची फवारणी करावी. सदयस्थित
रब्बी पिकांमध्ये कीड व्यवस्थापनाबाबत शास्त्रज्ञ डॉ. धिरज कदम यांनी मागर्शन
केले. रब्बी ज्वार पिकामध्ये मावा किडींच्या नियंत्रणासाठी डायमिथेाएट 10
मि.ली. किंवा इमीडाक्लोप्रिड 7.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी
करावी. तसेच हरभरा पिकात घाटेअळीसाठी प्राथमिक अवस्थेत निंबोळी अर्काची फवारणी
करावी. त्यानंतर क्विनॉलफॉस किंवा क्लोरोपायरीफॉस 20 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळुन फवारणी करावी. अधिक प्रादुर्भाव आढळुन आल्यास इमामेक्टीन बेंनझाएट 4
मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करण्याचा सल्ला त्यांनी दिला. मंडळ
कृषी अधिकारी डी.टी.सामाले यांनी शेतक-यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे
आवाहन केले.
याप्रसंगी गटचर्चेच्या माध्यमातुन शेतक-यांशी संवाद साधुन
विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे रब्बी
हंगामातील पेरा कमी असुन रब्बी पिकांचे व्यवस्थापन, फळबागेचे व्यवस्थापन,
चारापिकांचे नियोजन यावर तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. दिर्घकालीन उपायांमध्ये
मृद व जलसंधारण, विहिर पुर्नभरण, कुपनलीका
पुर्नभरण, शेततळे, योग्य पीक पध्दती, कृषि जोडधंदे व एकात्मिक शेती पध्दतीचा
अवलंब गटशेतीच्या माध्यमातुन करावा असे विद्यापीठातर्फे आवाहन करण्यात आले.
प्रारंभी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थीच्या सहकार्याने
गावात प्रभातफेरी काढुन शेतक-यामध्ये उमेद निर्मीतीसाठी जागर करण्यात आला. कार्यक्रमास
सरपंच राम मोगले, मोगले विष्णु, रामराव गोरे, तानाजी
कांबळे, साहेबराव गिरी आदीचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधीर जाधव
यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल मांडवगडे, इंद्रजीत खटींग, दगडोबा
पाटील, एम. डी. गायकवाड, जी. आर. खान, विलास
गिरी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थिती होते.