वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा सल्ला
मराठवाडयात यावर्षी मोसमी पावसाने जुन महिन्याच्या पहिल्या
पंधरवाडयातच हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला होता, परंतु ब-याचशा भागात पेरणी
योग्य पाऊस न झाल्यामुळे अजुनही पेरण्या झालेल्या नाहीत. अजुनही पेरणीचा
हंगाम गेलेला नाही. १५ जुलैपर्यंत साधारणत: मुग, उडीद, ज्वार वगळता सर्वच पीकांची
पेरणी करू शकतो तर १६ ते ३१ जुलै दरम्यान पेरणी झाल्यास संकरित बाजरी, सुर्यफुल,
आंतरपीक पध्दतीत तुर व सोयाबीन, बाजरी व तुर, एरंडी व धने या पीक पध्दतीची पेरणी
करता येते.
ज्या ठिकाणी पेरणी झालेली
आहे व पावसाचा खंड पडला आहे, अशा परिस्थितीत सतत कोळपणी करून तणांचा बंदोबस्त
होऊन जमिनीतील ओलावा टिकवुन ठेवण्यासाठी मदत होईल. तण नियंत्रण केल्यामुळे
तणांमधुन होणारे बाष्पोत्सर्जन कमी होईल व उपलब्ध ओलावा पीकांना मिळेल. तसेच पिकावर
पोटॅशियम नायट्रेट (१३.००.४५) खत १.० ते १.५ टक्के (१०० ते १५० ग्रॅम प्रति १०
लिटर पाण्यात मिसळुन) याप्रमाणे फवारणी केल्यास पिकातील
बाष्पोत्सर्जन कमी होईल व त्यामुळे भारी जमिनीतील पीके पुढे ८ ते १० दिवस तग
धरू शकतील. ज्या ठिकाणी शक्य असेल तेथे तुषार सिंचनाने पिकास पाणी द्यावे.
ब-याचशा ठिकाणी १५ जुन दरम्यान
पेरणी झालेलया सोयाबीनवर उंटअळीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन यासाठी २५ ईसी क्वीनॉलफॉस
किंवा २० र्इसी क्लोरपायरीफॉस किंवा ४० ईसी ट्रासझोफॉस २० मिली १० लिटर पाण्यात
मिसळुन फवारणी करावी. तसेच कपाशी पिकावर तुडतुडे या रसशोषण किडींचा प्रादुर्भाव
दिसुन येत असुन या किडीच्या नियंत्रणासाठी अॅसिफेट ७५ टक्के २० ग्रॅम किंवा
असिटामाप्रिड २० टक्के २ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
जमिनीच्या मगदुराप्रमाणे
पीकांची निवड करावी. हलक्या जमिनीत कापुस लावु नये. त्या ठिकाणी बाजरी,
सुर्यफुल, कुलथी, मटकी, कारळ यासारखी पीके घ्यावीत. मध्यम ते भारी जमिनीत कापुस,
सोयाबीन, तुर, एरंडी ही पीके घ्यावीत. आंतरपीक पध्दतीचा अवलंब करावा उदा. तुर व
सोयाबीन (२:४), बाजरी व तुर (४:२), तुर व ज्वार (२:४).
रूंद-वरंबा सरी पध्दतीने सोयाबीन पीकाची पेरणी
करावी. म्हणजे पडलेल्या पाऊसाचे पाणी जमिनीत साठवता येईल व त्याचा पीकाला
दिर्घकाळ उपयोग होईल. असे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कृषि
तंत्रज्ञान माहिती केंद्राचे कृषि विद्यावेत्ता डॉ यु एन आळसे व प्रा डि डि पटाईत
यांनी केले आहे.