Thursday, July 2, 2015

सेंद्रीय शेतीतील विविध पध्‍दतीचे शास्‍त्रीय मानके निश्चित व्‍हावीत....... कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृवित सेंद्रीय शेती संशोधन प्रकल्‍प कार्यान्वित

राज्‍यात स्‍थानिक परिस्थितीनुसार अनेक शेतकरी सेंद्रीय शेतीच्‍या विविध पध्‍दती वापर आहेत, परंतु त्‍याचे संशोधनात्‍मक प्रमाणिकरण नाही, त्‍यासाठी सेंद्रीय शेतीच्‍या विविध पध्‍दतीचे संशोधन करून शास्‍त्रीय मानके निश्चित करा व योग्‍य त्‍या तंत्रज्ञान शिफारशी विद्यापीठाच्‍या वतीने शेतक-यांना दया, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्‍या जयंतीचे औचित्‍त साधुन विद्यापीठातंर्गत सेंद्रीय शेती संशोधन प्रकल्‍पाच्‍या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंग्री संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, कुल‍सचिव डॉ. दिनकर जाधव, आत्‍माचे प्रकल्‍प संचालक श्री एम. एल. चपळे, आत्‍माचे उपसंचालक श्री अशोक काळे, विद्यापीठ अभियंता अब्‍दुल रहिम, प्राचार्य डॉ. उदय खोडके, डॉ. बी. व्‍ही. आसेवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. सेंद्रीय उत्‍पादनाची मागणीही असुन सेंद्रीय शेतीचे महत्‍व वाढले आहे, त्‍यासाठी सेंद्रीय शेतीच्‍या तांत्रिक शिफारसी व तंत्रज्ञानाची मागणी शेतक-यांमध्‍ये वाढत आहे. विद्यापीठस्‍तरावर सेंद्रीय शेतीवर एकात्मिक संशोधन कार्य स्‍वतंत्र प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन व्‍हावे यासाठी कुलगुरु मा डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू यांच्‍या संकल्‍पनेतुन व संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली विद्यापीठांतर्गत सेंद्रीय शेती संशोधन प्रकल्‍प १ जुलै रोजी कार्यान्‍वीत करण्‍यात आला. या प्रकल्‍पात सेंद्रिय शेतीवर आधारित विविध पिके व विषयांवर टप्‍याटप्‍प्‍याने संशोधन विस्‍तार व प्रशिक्षण कार्य हाती घेण्‍यात येणार असुन यासाठी स्‍वतंत्र प्रक्षेत्र, कार्यालय, शास्‍त्रज्ञ व कर्मचारी विद्यापीठाच्‍या वतीने उपलब्‍ध करुन देण्‍यात आले आहे.
कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू पुढे म्‍हणाले की, सेंद्रीय शेतीही व्‍यापक कल्‍पना असुन विविध ठिकाणी शेतकरी बांधव अनेक पध्‍दतीचा अवलंब करीत आहेत. या प्रकल्‍पांतर्गत शास्‍त्रीय दृष्‍टीने संशोधन प्रयोग राबविण्‍यात येणार असुन विविध सेंद्रीय निविष्‍ठांचा शास्‍त्रीयदृष्‍टया वापरावर संशोधन होईल. तसेच अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन, किड व रोग व्‍यवस्‍थापन या बाबीसह हवामान आधारीत सल्‍लाही सेंद्रीय शेतीमध्‍ये महत्‍वपुर्ण ठरेल. या प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन महत्‍वाच्‍या तांत्रीक शिफारशी शेतक-यांना देता येतील तसेच शासनस्‍तरावर सेंद्रीय शेतीचे धोरण ठरविण्‍यास मदत होईल.
      संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात भविष्‍यात सेंद्रीय निर्यातक्षम फळे व कृषि उत्‍पादन घेण्‍यासाठी आवश्‍यक ते संशोधन या प्रकल्‍पात घेण्‍यात येईल, असे सांगितले तर  विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांना सेंद्रीय शेतीबाबत तंत्रज्ञान शिफारशी उपलब्‍ध करुन देता येतील तसेच शेतक-यांच्‍या पारंपारीक ज्ञानाचा संशोधनात उपयोग करता येईल. कुलसचिव डॉ. दिनकर जाधव यांनी कोरडवाहु शेतीमध्‍ये सेंद्रीय शेतीची सांगड घालणे गरजेचे आहे असे सांगीतले. आत्‍माचे प्रकल्‍प संचालक यांनी सेंद्रीय शेती माध्‍यमातुन शेतक-यांना आवश्‍यक तंत्रज्ञान उपलब्‍ध होईल, अशी आशा व्‍यक्‍त केली तर  प्रकल्‍प उपसंचालक श्री अशोक काळे यांनी शेतक-यांचा सहभाग सेंद्रीय शेती संशोधनात घ्‍यावा असे मत व्‍यक्‍त केले.
प्रास्‍ताविकात कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍पाचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ यांनी सेंद्रीय शेती प्रकल्‍पाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद गोरे यांनी केले तर डॉ. मेघा सुर्यवंशी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास विविध संशोधन केंद्राचे अधिकारी, शास्‍त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्‍येने उपस्थितीत होते. या प्रकल्‍पाचे मुख्‍य प्रवर्तक म्‍हणुन डॉ. बी. व्‍ही. आसेवार राहणार असुन डॉ. आनंद गोरे हे प्रकल्‍प प्रमुख म्‍हणुन काम पाहणार आहेत. तसेच कृषिविद्या, किटकशास्‍त्र, वनस्‍पती विकृ‍तीशास्‍त्र, मृदा व रसायनशास्‍त्र या विभागाचे विभाग प्रमुख सल्‍लागार व मार्गदर्शक म्‍हणुन राहणार आहेत.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने नागरिकांना आवाहन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात मराठवाडयातील शेतक-यांच्‍या दृष्‍टीने विविध संशोधन कार्य करित आहे. त्‍यासाठी विद्यापीठाच्‍या प्रक्षेत्रावर विविध संशोधन प्रात्‍यक्षिके घेतली जातात, परंतु विद्यापीठात परिसरात वावरत असतांना अनेक नागरिकांकडुन जाणते किंवा अजाणतेने या संशोधन प्रक्षेत्राचे मोठे नुकसान होते, त्‍यामुळे संशोधनाच्‍या दृष्‍टीने मोठी हानी होते, तरी विद्यापीठाच्‍या वतीने सर्वांना आवाहन करण्‍यात येते की, विद्यापीठ परिसरात वावरत असतांना संशोधन प्रक्षेत्रास कोणतेही हानी होउन नये याची दक्षता घ्‍यावी.