वनामकृवित विस्तार शिक्षण परिषदेची विसावी बैठक संपन्न
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातुन केलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे प्राप्त होणा-या
पाऊसाच्या पाण्याचा कार्यक्षमरित्या वापराबाबत कृषि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी
शेतक-यांना मार्गदर्शन करावे. अनिश्चित पाऊसमानासाठी आपत्कालीन पीक नियोजनाच्या
विद्यापीठाच्या शिफारसी विविध माध्यमाव्दारे जास्तीस जास्त शेतक-यांपर्यत
पोहचवाव्यात, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या आगामी वर्षातील कृषि विस्ताराची
दिशा निश्चित करण्यासाठी विस्तार शिक्षण संचालनालयच्या वतीने दि १६ जुलै रोजी
आयोजीत विस्तार शिक्षण परिषदेच्या विसाव्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते
बोलत होते. या बैठकीस शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, परिषदेचे सदस्य प्रगतशील शेतकरी श्री कांतरावजी देशमुख, प्रगतशील शेतकरी श्री उध्दवरावजी खेडेकर, कुलसचिव
डॉ दिनकर जाधव, हिंगोलीचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री
एस के पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु पुढे म्हणाले की, सद्याची परिस्थिती पाहाता भविष्यात जनावरांचा चा-याचा प्रश्न
गंभीर होऊ शकतो, त्या अनुषंगाने शेतक-यांना चारापिक
लागवडीबाबत मार्गदर्शन करावे. विद्यापीठात शेतक-यांना उपयुक्त तंत्रज्ञानावर
आधारीत प्रशिक्षण कार्यक्रमाचे वार्षिक वेळापत्रक तयार करून जास्तीत जास्त
शेतक-यापर्यंत पोहचवुन त्यांचा सहभाग वाढवावा. आंतरपिक पध्दत, रूंद वरंबा व सरी पध्दत, द्रव्यरूप खत व्यवस्थापनाबाबत
मार्गदर्शन करण्याची आवश्यकताही त्यांनी दिला.
प्रगतशील शेतकरी श्री उध्दवरावजी खेडेकर यांनी भाषणात शेतकरी एकाच जमिनीत सतत
एकचएक पीक घेत असुन मातीतील काही अन्नद्रव्याची कमतरता निर्माण होत असुन त्यांना
पीक फेरपालटीबाबत विद्यापीठाने मार्गदर्शन करावे असे मत मत व्यक्त केले. शिक्षण
संचालक डॉ अशोक ढवण यांनी विद्यापीठाच्या विभागीय कृषी विस्तार केंद्राची
बळकटीकरणाची आवश्यकता असल्याचे सांगितले तर कुलसचिव डॉ दिनकर जाधव आपल्या
भाषणात म्हणाले की, प्रत्येक जिल्हातील विविध पीकात
यशस्वी शेतक-यांच्या यशोगाथा तयार करून त्यांची यादी विद्यापीठाने प्रसिध्द
करावी जेणेकरून इतर शेतकरी त्यांच्याशी संपर्क करू शकतील. याप्रसंगी श्री
कांतराव देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु यांना वसंतराव नाईक कृषी पुरस्काराने
सन्माननित करण्यात आल्याबाबत विस्तार शिक्षण संचालनालयाच्या वतीने सत्कार
करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी
भोसले यांनी गत वर्षीच्या विद्यापीठाच्या विस्तार कार्याची माहिती दिली तर
सुत्रसंचालन मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ पी आर देशमुख यांनी केले. बैठकीत
डॉ यु एन आळसे, डॉ एस बी पवार, प्रा अरूण गुट्टे, डॉ व्ही जी टाकणखार, डॉ निर्मल यांनी विस्तार कार्याची माहिती दिली तर प्राचार्य डॉ विलास
पाटील, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य
डॉ पी एन सत्वधर, प्राचार्य डॉ डि एन गोखले, डॉ हेमांगिनी संरबेकर आदीसह मराठवाडयातील सर्व कृषि विज्ञान केंद्राचे
प्रतिनिधी, विभागीय कृषि विस्तार केंद्राचे प्रभारी अधिकारी,
विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी चर्चेत सहभाग नोंदविला.