Friday, March 11, 2016

बचत गट समुहांनी कंपन्या स्थापन करून सक्षम बनावे...... कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु

औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्रात जागतिक महिला दिनानिमित्‍त शेतकरी महिला मेळावा संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्र व कृषि विभागाचा आत्‍मा प्रकल्‍प यांचे संयुक्‍त वतीने दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्‍त शेतकरी महिला मेळाव्‍याचे आयोजन औरंगाबाद कृषि विज्ञान केंद्रात करण्‍यात आले होते. मेळावे उदघाटन कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते झाले, तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन विभागीय आयुक्‍त मा डॉ उमाकांत दांगट हे उपस्थित होते. विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसलेडॉ प्रजा तल्‍हार, प्रा विजया नलावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनपर भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, कर्नाटक, गुजराज, तेलंगण राज्‍यात गेली 25 वर्षापुर्वीच बचत गटांची स्‍थापन होऊन या बचत गटांचा समुह संगणकाशी जोडुन वाटचाल करत आहेत. बचत गट निर्मीत मालाची बाजारात मोठी मागणी आली तरी ती पुर्ण करण्‍याची क्षमता महाराष्‍ट्रातही बचत गटांनी निर्माण करायला हवी, त्‍यासाठी अनेक बचत गट समुहाची एक कंपनी कार्यान्वित व्‍हावी, ही काळाची गरज आहे. बचत गटांच्‍या माध्‍यमातुन ग्रामीण अर्थकारण सुधारण्‍याची ताकद महिलांमध्‍ये असुन यासाठी अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे प्रतिपादन विभागीय आयुक्‍त मा डॉ उमाकांत दांगट यांनी आपल्‍या भाषणात केले. विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले आपल्‍या भाषणात विद्यापीठाच्‍या उमेद अभियानाचे उदिष्‍ट सांगुन दुष्‍काळ परिस्थितीत देखील महिलांनी घरच्‍यांचा मनोबल वाढविण्‍याचे कार्य करण्‍याचा सल्‍ला दिला.

मेहनत म्‍हणजे नफा व दुर्लक्ष म्‍हणजे तोटा हा मुलमंत्र डॉ प्रजा तल्‍हार यांनी दिला तर घराचे घरपण टिकवुन गृहलक्ष्‍मी ही धनलक्ष्‍मी व्‍हावी, यासाठी प्रयत्‍न करा, असे आवाहन प्रा विजया नलावडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक कार्यक्रम समन्‍वयक डॉ एस बी पवार यांनी केले. सुत्रसंचालन प्रा दिप्‍ती पाटगांवकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा गीता यादव यांनी केले. कार्यक्रमास महिला शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होत्‍या. यावेळी महिला बचत गटांच्‍या विविध पदार्थाच्‍या समावेश असलेल्‍या प्रदर्शनीचे आयोजन करण्‍यात आले होते.