Monday, March 21, 2016

शेतीक्षेत्रासाठी येणारे वर्ष आव्हानात्मक असुन योग्य नियोजनाची गरज....कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु

मराठवाडयातील कृषि विज्ञान केंद्राच्‍या दोन दिवसीय वार्षिक कृति आराखडा कार्यशाळेचे आयोजन

मागील दोन ते तीन वर्षाच्‍या पार्श्‍वभुमीवर येणारे वर्ष शेतीक्षेत्रासाठी आव्‍हानात्‍मक असुन योग्‍य नियोजनाची गरज आहे. येणा-या हंगामात चांगल्‍या पाऊसमानाचे भाकित आहे, परंतु कोणत्‍याही परिस्थितीस तोंड देण्‍यासाठी शेतक-यांना मार्गदर्शनासाठी कृषि तंत्रज्ञानाबाबतच्‍या विविध पर्यायसह कृषि विस्‍तारकांनी व कृषि तज्ञांनी तयार रहावे. पाऊसमान चांगला राहील्‍यास पडणा-या पाऊसाच्‍या पाण्‍याचे योग्‍य उपयोग करण्‍यासाठी योग्‍य नियोजनाची जोड द्यावी लागेल, यासाठी विहीर व कुपनलिका पुनर्भरणावर भरा दयावा, कृषि विस्‍तारासाठी मराठवाडयातील सर्व कृषि विज्ञान केंद्रांनी मागील वर्षीच्‍या अनुभवाच्‍या आधारे पुढील वर्षीचा वार्षिक कृति आराखडा निश्‍चित करावा, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वनामकृविचे विस्‍तार शिक्षण संचालनालय व हैद्राबाद येथील कृषि तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्‍थेचे झोन-५ यांच्‍या संयुक्‍त विद्यामाने दिनांक २१ व २२ मार्च रोजी दोन दिवसीय वार्षिक कृति आराखडा कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले असुन कार्यशाळेच्‍या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्‍हणुन हैद्राबाद येथील कृषि तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्‍थेचे मुख्‍य शास्त्रज्ञ डॉ के दत्‍तात्री हे उपस्थित होते तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, गतवर्षी सोयाबीन पिकात रूंद वरंबा व सरी पध्‍दती अवलंब करतांना बीबीएफ यंत्राचे जुळवणुकीत शेतक-यांना अनेक तांत्रिक अडचणी आल्‍या, यासाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात यावे. कापुस पिकांत गुलाबी बोंडअळीचे आव्‍हान असुन अति घन पध्‍दतीने देशी किंवा सरळ वाणाची लागवड तंत्रज्ञानाच्‍या प्रसार करावा लागेल, यावर्षी सोयाबीनमध्‍ये विद्यापीठ विकसित एमएयुएस-१६२ व एमएयुएस-१५८ व तुर पिकांतील बीडीएन-७११ हे कमी पाण्‍यावर चांगले उत्‍पादन देणारा वाण ठरला असुन सुधारित बियाणे बदल गुणोत्‍तर वाढविण्‍याची गरज आहे. तेलबियामध्‍ये भुईमुग व तीळ पिक लागवडीस प्रोत्‍साहन द्यावे लागेल. मराठवाडा विभागात फळपिकांमध्‍ये केळी, मोसंबी व आंबा हे मुख्‍य पिक असुन मोसंबी सारखे पिक हलक्‍या व मध्‍यम जमिनीत किफायतीशीर नाही, याबाबत शेतक-यांना मार्गदर्शनाची गरज आहे. पिकनिहाय शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन कृषि विज्ञान केंद्रांनी करण्‍याचा सल्‍लाही यावेळी त्‍यांनी दिला.
मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ के दत्‍तात्री आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, सन २०१६ हे वर्ष दाळवर्गीय पिकांचे आंतरराष्‍ट्रीय वर्ष साजरा करण्‍यात येत असुन दाळवर्गीय पिकांच्‍या अधिक उत्‍पादन देणा-या वाणाचा प्रसारावर भरा द्यावा, दुष्‍काळस्थितीत उपयुक्‍त कमी खर्चाच्‍या तंत्रज्ञान प्रात्‍यक्षिके घ्‍यावीत. शेतीपुरक जोड व्‍यवसाय जसे दुग्‍ध व्‍यवसाय, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग आदींच्‍या कृषि विज्ञान केंद्रानी प्रसारासाठी पुढाकार घ्‍यावा. केंद्र शासन व राज्‍य शासनाच्‍या विविध कृषि विषयक योजनाची माहिती शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.लक्‍या  ये ुईमुग व तीळ पिकांवर  संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, विद्यापीठाने विकसित केलेले कुपनलिका व विहिर पुनर्भरण तंत्रज्ञान अत्‍यंत उपयुक्‍त असुन त्‍याचा प्रसार मराठवाडा विभागात होण्‍यासाठी कृषि विज्ञान केंद्रानी प्रयत्‍न करावा तसेच सौरऊर्जा वरील फवारणी यंत्राचाही प्रसार करावा.
प्रास्‍ताविकात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी विद्यापीठाने राबविलेल्‍या गतवर्षी विविध विस्‍तार कार्यक्रमाची माहिती देऊन बदलत्‍या हवामानात उपयुक्‍त तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍यासाठी कृषि विज्ञान केंद्रांनी नियोजन करण्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांनी केले. कार्यशाळेत मराठवाडा विभागातील अकरा कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्‍वयकासह विशेष विषयतज्ञ मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यशाळेत विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी उपस्थितांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. 
मार्गदर्शन करतांना मुख्य शास्त्रज्ञ डॉ के दत्तात्री