Tuesday, July 5, 2016

हुमणी किडीचे वेळीच व्‍यवस्‍थापन करा........ विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले

वनामकृवितर्फे निवळी (खु.) येथे कृषि दिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र व रिलायन्‍स फाऊंडेशन यांच्‍या संयुक्‍त विदयमाने जिंतुर तालुक्‍यातील (जि.परभणी)  निवळी (खु.) येथे कृषि दिनाचे औचित्‍य साधुन शेतक-यांकरिता मार्गदर्शनपर कार्यक्रम ठेवण्‍यात आला होता. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी गावातील प्रतिष्ठित नागरिक व माजी जि. प. सदस्‍य श्री. पुरुषोत्‍तम खिस्‍ते होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले हे उपस्थित होते. कार्यक्रमात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांनी शेतक-यांना हुमणी किड व्‍यवस्‍थापन या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. बी बी भोसले म्‍हणाले कि, सदयस्थितीत हुमणी किडीचे प्रौढ भुंगे जमिनीतुन मोठया प्रमाणात बाहेर निघुन आजुबाजुच्‍या कडुलिंब, बाभुळ व बोरीच्‍या झाडावर जमा होतात व त्‍याच ठिकाणी मिलन करुन परत जमिनीमध्‍ये अंडी दयायला जातात. एक भुंगा ५०-७० अंडी देतो त्‍यामुळे अशा भुंग्‍याचे व्‍यवस्‍थापन केले तर प्रभावी व्‍यवस्‍थापन होईल व भविष्‍यात होणारे नुकसान टाळता येऊ शकते. शेतक-यांनी एकत्रित येऊन अशा भुंग्‍याचे व्‍यवस्‍थापन करावे. त्‍याच बरोबर शेतात झालेल्‍या अळयांचे व्‍यवस्‍थापन करण्‍याकरिता एकात्मिक पध्‍दतींचा अवलंब करावा. ज्‍यामध्‍ये पेरतेवेळी फोरेटचा वापर, मेटारायझियम या जैविक बुरशीचा वापर, प्रकाशसापळयांचा वापर व अशा सर्व गोष्‍टींचा अंतर्भाव केला तरच पुर्णपणे या किडींचा बंदोबस्‍त होऊ शकेल. विविध पिकांमध्‍ये होणारा फवारण्‍यावरील अवाढव्‍य खर्च कमी करावा व कीडींच्‍या प्रभावी व्‍यवस्‍थापनासाठी योग्‍य वेळी, योग्‍य पध्‍दतीने व्‍यवस्‍थापन करण्‍याचा सल्‍ला यावेळी त्‍यांनी दिला.
यावेळी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे प्रा. डी. डी. पटाईत यांनी विदयापीठाचे तंत्रज्ञान, माहिती वाहिनी कार्यक्रम, विविध पिकांचे वाण विषयी शेतक-यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास साधारण १५० शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी रिलायन्‍स फाउंडेशनचे विलास सवने, राम राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले.