Saturday, December 17, 2016

कापसाची फरदड न घेण्याचे वनामकृविचे आवाहन

वनामकृविचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांचा सल्‍ला
शेंदरी बोंडअळी ही कपाशीवरील अतिशय घातक कीड असुन बी. टी. कपाशीमुळे या बोंडअळीचे यशस्वीरीत्या व्यवस्थापन होईल असा विश्वास होता. पण मागील गेल्‍या चार ते पाच वर्षाचा अनुभव लक्षात घेता हा विश्वास खोटा निघाला. आजच्या घडीला शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव बी टी कपाशीवर मोठया प्रमाणात जवळपास ७५-८० टक्के आढळुन येत आहे.
प्रादुर्भावाची प्रमुख कारणे :
Ø  कपाशीच्या फरदडीखाली क्षेत्रात वाढ झाल्यामुळे किडीच्या जीवनक्रमात खंड पडलेला नाही.
Ø  हंगाम संपल्यानंतर कपाशीच्या पऱ्हाटया अवशेष शेतात किंवा शेताजवळ तसेच रचून ठेवणे वेळेवर विल्हेवाट लावणे.
Ø  बीटी जनुकास प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यामुळे बीटी कपाशीवर या बोंडअळीचा प्रादुर्भाव होत आहे.
Ø आश्रय पिकाच्या ओळी लावणे.
Ø योग्यवेळी शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव कांही भागात लवकरच दिसुन आला होता शेतकऱ्यांचे व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झालेले आहे.
उपाययोजना :
Ø  कपाशीचे फरदड घेऊ नये. वेळेवर कपाशीची वेचणी करून डिसेंबरनंतर शेतामध्ये कपाशीचे पीक घेऊ नये.
Ø  हंगाम संपल्यानंतर शेतामध्ये जनावरे किंवा शेळया, मेंढया, चरण्यासाठी सोडाव्यात.
Ø शेतातील प्रादुर्भावग्रस्त पिकांचे अवशेष वेचून जाळून टाकावेत.
Ø  हंगामात संपल्यावर ताबडतोब पऱ्हाटीचा वापर करावा किंवा बंदोबस्त करावा. शेतात किंवा शेताजवळ पऱ्हाटी रचून ठेवू नये.
Ø येत्या खरीप हंगामात कमी कालावधीचे वाण निवडावेत.
Ø शेतामध्ये कामगंध सापळे लावून नियमित निरीक्षण करावे.
सध्या बीटी कपाशीवरील शेंदरी बोंडबळीचा प्रादुर्भाव ही धोक्याची घंटा आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या चांगल्या पाऊसामुळे जमिनीमध्ये मोठया प्रमाणावर ओल आहे. त्यामुळे बरेचसे शेतकरी मोठया प्रमाणावर कपाशीचे फरदड (पुर्नबहार) चांगल्या दराच्या अपेक्षेने घेत आहेत. याचा परिणाम येत्या खरीप हंगामात या शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव लवकर मोठया प्रमाणात होण्याची शक्यता आहे. तसेच यापुढे फरदड ठेवलेल्या कपाशीची येणारी बोंडे मोठया प्रमाणावर किडीकीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच जागरूक होऊन शेतकऱ्यांनी फरदड घेण्याचे टाळावे असे वाहन वनामकृविचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, विभाग प्रमुख डॉ. पी. आर. झंवर प्रा. बी. व्ही. भेदे यांनी केले आहे.