Thursday, December 1, 2016

मन, बुध्‍दी व शक्‍तीच्‍या विकासासाठी खेळांची आवश्‍यकता....कुलगुरू मा. प्रा. डॉ. पंडित विद्यासागर

वनामकृवित आयोजित विसाव्‍या महाराष्‍ट्र राज्‍य आंतर विद्यापीठ क्रीडा स्‍पर्धेची शानदार सांगता

क्रीडा महोत्‍सवातील सर्वसाधारण विजेतेपद मान्‍यवरांच्‍या हस्‍ते स्‍वीकारतांना मुंबई विद्यापीठ, मुंबई चा संघ

जीवनात खेळास अनन्‍य साधारण महत्‍व असुन व्‍यक्‍तीचे मन, बुध्‍दी व शक्‍तीचा विकास व इतर अनेक क्षमतांचा विकास होतो. प्रत्‍येकांनी एकातरी खेळाची आवड जोपासावी, असे प्रतिपादन नांदेड येथील स्‍वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे दिनांक २७  नोव्‍हेंबर ते डिसेंबर दरम्‍यान आयोजित करण्‍यात आलेल्‍या विसाव्‍या महाराष्‍ट्र राज्‍य आंतर विद्यापीठ क्रीडा स्‍पर्धच्‍या समारोपीय व बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन आमदार मा. डॉ. राहुल पाटील, महापौर मा. सौ. संगिताताई वडकर, जिल्‍हा पोलिस अधिक्षक श्रीमती नियती ठाकर हे होते तर अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा. प्रा. डॉ. पंडित विद्यासागर पुढे म्‍हणाले की, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने क्रीडा स्‍पर्धेचे सुत्रबध्‍द नियोजन केले असुन एड्रस जनजागृतीचे कार्य क्रीडा महोत्‍सवाच्‍या माध्‍यमातुन केले आहे.

आमदार मा. डॉ. राहुल पाटील आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, भारत देश तरूणांना देश आहे, या तरूण शक्‍तीचा चांगल्‍या कार्यासाठी उपयोग होणे आवश्‍यक आहे. पाच दिवस क्रीडा महोत्‍सवामुळे परभणी जिल्‍हयाचे वातावरण क्रीडामय झाले. मराठवाडा विभागातील चांगले खेळाडु निर्माण होण्‍यासाठी क्रीडा क्षेत्रातील मुलभुत सुविधांचा विकास करून क्रीडा हब झाले पाहिजे.

सर्व विद्यापीठातील सर्व खेळाडुंनी शिस्‍तबध्‍दरित्‍या उत्‍कृष्‍ट खेळाचे प्रदर्शन केल्‍याचे प्रतिपादन अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले तर जिल्‍हा पोलिस अधिक्षक श्रीमती नियती ठाकर यांनी खेळातील हार-जीत महत्‍वाची नसुन सक्रिय सहभाग महत्‍वाचे असल्‍याचे सांगितले. 

विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी प्रास्‍ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राचार्या प्रा. विशाला पटणम, डॉ बाबासाहेब ठोंबरे, डॉ आशा आर्या व डॉ नंदु भुते यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक खिल्‍लारे यांनी केले. या प्रसंगी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विजयी संघाना पारितोषिके वितरित करण्‍यात आली.


सर्वसाधारण विजेतेपद मुंबई विद्यापीठ यांनी पटकाविले तर उपविजेतेपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पटकाविले. तसेच महिला सर्वसाधारण विजेतेपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पटकाविले तर पुरूष सर्वसाधारण विजेतेपद मुंबई विद्यापीठाने पटकाविले. उत्‍कृष्‍ट शिस्‍तपालन संघ म्‍हणुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची तर उत्‍कृष्‍ट पथ संचलनाचा बहुमान महात्‍मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांनी प्राप्‍त केला. एड्रस जनजागृती प्रभातफेरी मध्‍ये उत्‍कृष्‍ट कामगिरी करणारा संघ म्‍हणुन महाराष्‍ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठ, नाशिकची निवड करण्‍यात आली.

यावेळी प्रा उत्‍तम केंद्रे, संघ व्‍यवस्‍थापक प्रा. अमिता कांबळे, प्रा. भारत भुजबळ तसेच डॉ शामसुंदर वांगीकर यांनी क्रीडा महोत्‍सवाच्‍या उत्‍कृष्‍ट नियोजनाबाबत प्रतिक्रीया व्‍यक्‍त केल्‍या. मुंबई विद्यापीठाची खेळाडु तन्‍वी दाभाडे व नागपुरचे ओंकार थोरात या खेळाडुनी मनोगत व्‍यक्‍त केले. यावेळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते डॉ प्रमोद पाब्रेकर व डॉ दिपक माने लिखित क्रीडा महोत्‍सवाच्‍या आयोजनाची मार्गदर्शिकेचे विमोचन करण्‍यात आले. पुढील वर्षीचे क्रीडा महोत्‍सवाचे आयोजक म्‍हणुन डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली यास घोषित करण्‍यात येऊन क्रीडा महोत्‍सवाचा ध्‍वज विद्यापीठाचे विद्यार्थी कल्‍याण संचालक डॉ नितीन गोखले यांना सुपूर्त करण्‍यात आला.

स्‍पर्धेनिमित्‍त एड्स विषयी प्रबोधनपर प्रदर्शनीचे आयोजन करण्‍यात आले होते तसेच शहरात एड्स जनजागृती रॅलीचेही आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी जिल्‍हाधिकारी मा. राहुलरंजन महिवाल यांची उपस्थिती होती. रॅलीमध्‍ये विद्यार्थ्‍यांनी एड्रस जनजागृती आधारीत पथनाटय सादर केले तसेच गोंधळ कलेच्‍या माध्‍यमातुन प्रबोधन करण्‍यात आले.  
स्‍पर्धेत राज्‍यातील २० विद्यापीठातील दोन हजार पेक्षा जास्‍त विद्यार्थी व विद्यार्थीनी विविध क्रीडा प्रकारांत सहभागी झाले असुन यात कबड्डी, बास्‍केटबॉल, व्‍हॉलीबॉल, खो-खो व मैदानी स्‍पर्धा या खेळांचा समावेश होता.