Monday, January 22, 2018

कृषि विद्यापीठातील सर्व पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी सामा‍ईक प्रवेश परीक्षा अनिवार्य

महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या सर्व पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या प्रवेशास सन 2018 - 19 या शैक्षणिक वर्षापासुन सामाईक प्रवेश परीक्षा अनिवार्य केली आहे. राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठांतर्गत कृषी, उद्यानविद्या, वनशास्‍त्र, सामाजिक विज्ञान (गृहविज्ञान), कृषी अभियांत्रीकी, अन्‍नतंत्र, कृ‍षी जैवतंत्रज्ञान, मत्‍स्‍य विज्ञान, पशुसंवर्धन व व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन या पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने आयो‍जीत केलेली एमएचटी - सीईटी (MHT-CET) ही सामाईक प्रवेश परीक्षा सन 2018 - 19 या शैक्षणिक वर्षापासुन अनिवाय केली आहे. प्रवेश इच्‍छुक विद्यार्थ्‍यांनी राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने आयोजित केलेली एमएचटी-सीईटी (MHT-CET) किंवा JEE/NEET/AIEEA-UG (भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्‍ली यांच्‍या मार्फत घेण्‍यात येणारी परीक्षा All India Entrance Examination Test for Admission) यापैकी कोणतीही एक सामाईक प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक राहील.
   सदरिल सामाईक प्रवेश परीक्षांमध्‍ये प्राप्‍त झालेल्‍या गुणाच्‍या 70 टक्के गुण व पात्रता परिक्षेमध्‍ये (म्‍हणजे इयत्‍ता 12 विज्ञान परीक्षेमध्‍ये) प्राप्‍त झालेल्‍या गुणाच्‍या एकुण 30 टक्के गुण तसेच कृषी परिषदेच्‍या सद्यस्थितीतील तरतुदी / नियमानुसार इतर अधिभार यांच्‍या आधारावर उमेदवाराची गुणवत्‍ता निश्चित करण्‍यात येईल. प्रवेश प्रक्रियेबाबत इतर नियम व कार्यपध्‍दती प्रचलीत पध्‍दतीप्रमाणे असतील. राज्‍य सामाईक परीक्षेचे वेळापत्रक व माहितीपुस्‍तीका www.dtemaharashtra.gov.in/mhtcet2018 या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे तरी इच्‍छुक उमेदवारांनी सदरील संकेतस्‍थळावर सामा‍ईक प्रवेश परीक्षेकरिता अर्ज दाखल करण्‍याचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) डॉ विलास पाटील यांनी केले आहे.