वनामकृविच्या
परभणी कृषि महावि़द्यालयात रासेयोच्या
वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता
जिजाऊ जयंती साजरी
राष्ट्र व समाज घडविण्यासाठी देशात
चारित्र्य संपन्न युवक घडवावे लागतील, यासाठी युवक व बालकांवरील संस्कार महत्वाचे
असुन आईच हे संस्कार देऊ शकते. जिजाऊ मातेच्या संस्कारातुन छत्रपती शिवाजी
घडले. व्यक्तीचे जीवन सुंदर करण्यासाठी व्यक्ती चारित्र्य संपन्न, र्निव्यसनी
व प्रामाणिक पाहिजे, असे प्रतिपादन समाज प्रबोधनकार डॉ उध्दव गाडेकर यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्या राष्ट्रीय
सेवा योजनेच्या वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती तसेच राष्ट्रीय
युवक दिनाचे औजित्य साधुन दिनांक 12 जानेवारी रोजी ‘एकविसाव्या शतकात युवकांची
भुमिका’ याविषयावर व्याख्यानाचे आयोजन
करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु हे होते तर विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य
मा. डॉ पी आर शिवपुजे हे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. व्यासपीठावर शिक्षण
संचालक डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, जिमखाना उपाध्यक्ष डॉ सय्यद
इस्माईल आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रबोधनकार डॉ उध्दव गाडेकर पुढे म्हणाले
की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रामगीताच्या माध्यमातुन समाजातील अनेक
समस्यावर उपाय असुन प्रत्येक तरूणांनी ग्रामगीतेचे वाचन करावे. देशाचा विकास
करावयाचा असेल तर प्रत्येक गांव व प्रत्येक व्यक्तीचा विकास करावा लागेल. शेतक-यांच्या
श्रमास प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे. चारित्रसंपन्न राष्ट्रासाठी स्वामी विवेकांनद
व राजमाता जिजाऊ यांच्या विचाराचे समाजात आचरण व्हावे लागेल. परंपरा सोडु नका पण
परिवर्तनाला विसरू नका. जगातील सर्व धर्मात माणुसकीचीच शिकवण दिली जाते.
अध्यक्षीय समारोपात कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु
म्हणाले की, भारत जगातील सर्वात तरूण देश असुन या युवाशक्तीच्या जोरावर भारत
जागतिक महासत्ता होऊ शकतो.
डॉ पी आर शिवपुजे मार्गदर्शनात म्हणाले की, स्वामी विवेकानंद सारख्या व्यक्तींचे आदर्श युवकांनी डोळयासमोर ठेऊन आचरण करावे. ध्येय निश्चिती करून शिस्त व
कठोर परिश्रम केल्यास यश मिळतेच.
याप्रसंगी रासेयोच्या स्वयंसेवक सोनाली उबाळे, शुभदा खरे, पंकज घोडके आदींनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा विजय जाधव यांनी केले. सुत्रसंचालन यांनी डॉ जयकुमार देशमुख यांनी केले तर आभार डॉ पपिता गौरखेडे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रासेयोच्या स्वयंसेवक व स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.