Thursday, November 1, 2018

हवामान बदल व पावसावर आधारित शेती विषयावरील राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाच्‍या वतीने हवामान बदल व पावसावर आधारीत शेती या विषयावरील राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन 23 ते 30 ऑक्टोंबर दरम्यान करण्‍यात आले होते, या प्रशिक्षणाच्‍या समारोप कार्यक्रम दिनांक 30 ऑक्‍टोबर रोजी संपन्‍न झाला. या कार्यक्रमास व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, हैद्राबाद येथील केद्रीय कोरडवाहू संस्थेचे प्रमुख शास्‍त्रज्ञ डॉ के अे गोपीनाथ, प्रशिक्षण संयोजक मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ भगवान आसेवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी संचालक संशोधन डॉ दत्तप्रसाद वासकर आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, दरवर्षी पडणा-या पावसाच्या विषमतेमुळे कोरडवाहू शेतीवर पावसाच्या पाण्याचा ताण पडत आहे. परभणी कृषी विद्यापीठाने विकसित केलेले कृषि तंत्रज्ञान कोरडवाहु शेतीच्‍या दृष्टीने उपयुक्त आहे, त्याचा अवलंब केल्यास ब-याच अंशी दुष्काळ सदृष्य परिस्थितीवर मात करता येईल.  तर प्रमुख शास्‍त्रज्ञ डॉ के अे गोपीनाथ आपल्‍या मनोगतात म्हणाले की, कोरडवाहू तंत्रज्ञान शेतक-यांच्या बांधापर्यंत कृषी अधिका-यांच्या मार्फत गेले पाहिजे, या तंत्रज्ञानांचा वापर करतांना शेतक-यांना येणा-या अडचणींचा अभ्‍यास करून तंत्रज्ञानात सुधारणा करता येईल. अनियमित पाऊसाच्‍या परिस्थितीत रूंद वरंबा व सरी पध्‍दती तंत्रज्ञान सोयाबीन उत्‍पादकांसाठी उपयुक्त आहे. पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी प्रत्येक शेतक-यांनी शेततळे, तसेच विहीर व कुपनलिका पुनर्भरण करण्याची गरज आहे. तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांनी शेतक-यांनी सुधारित पाणी साठवण तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास कोरडवाहू उत्पादनात स्थिरता आणणे शक्य होईल असे सांगितले.
कार्यक्रमात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्राचे वितरण करण्‍यात आले. प्रास्ताविक मुख्यशास्त्रज्ञ डॉ भगवान आसेवार यांनी केले. सुत्रसंचालन डॉ मदन पेंडके यांनी तर आभार डॉ हनवते यांनी मानले. प्रशिक्षण कार्यक्रमास तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा व महाराष्ट्रातील एकूण 20 कृषी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ ए. एस. जाधव, डॉ लोखंडे, परिहार, तुरे, श्रीमती सारीका नारळे, गणेश भोसले, सयद महेबूब, दिपक भूमरे आदींनी पुढाकार घेतला.