Tuesday, October 15, 2019

वनामकृविच्‍या विद्यापीठ ग्रंथालयात भारतरत्‍न डॉ ए पी जे अब्दुल कलाम जयंती निमित्‍त ग्रंथ प्रदर्शन संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विद्यापीठ ग्रंथालयात दिनांक 15 ऑक्‍टोबर रोजी भारतरत्‍न डॉ ए पी जे अब्‍दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्‍हणुन साजरी करण्‍यात आली, यानिमित्‍त आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. याप्रसंगी भारतरत्‍न डॉ ए पी जे अब्‍दुल कलाम यांच्‍या प्रतिमेस कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी पुष्‍णहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, वाचनामुळे प्रतिकुल परिस्थितीवर मात करण्‍याचे सामर्थ्‍य प्राप्‍त होऊन जीवनात मोठे यश संपादन करता येते. विद्यार्थ्‍यांनी महाविद्यालयीन जीवनातच वाचनाची आवड निर्माण करायला हवी. प्राध्‍यापकांनीही नियमित ग्रंथाचे वाचन करून आपले अध्‍यायन कौशल्‍य वृध्‍दींगत करावे, असा सल्ला देऊन विद्यार्थ्‍यांना अभ्‍यास करतांना येणारा क्षीण कमी करून स्‍फुर्ती निर्माण करण्‍याकरिता लवकरच विद्यापीठ ग्रंथालयात भारतरत्‍न डॉ ए पी जे अब्‍दुल कलाम यांच्‍या प्रेरणादायी भाषणांचे संग्रहित व्‍हीडिओचे स्‍वतंत्र दालन निर्माण करण्‍याचा मानस त्‍यांनी व्‍यक्‍त केला. 
याप्रसंगी आयोजित ग्रंथ प्रदर्शनास विद्यार्थ्‍यानी मोठा प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी ग्रंथपाल डॉ संतोष कदम, डॉ वंदना जाधव, श्री मोहनकुमार झोरे, गोमटेश बुक एजन्‍सीचे श्री भुषण घोडके आदीसह ग्रंथालयीन कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.