Saturday, October 26, 2019

परभणी येथील वनामकृवि, हैद्राबाद येथील क्रीडा व पुणे येथील रोहीत कृषि इंडस्‍ट्रीज यांच्‍यात सामंजस्‍य करार

बाजारात लवकरच उपलब्‍ध होणार पाच फणी रूंद सरी वरंबा (बीबीएफ) बी खत पेरणीसह फवारणी व रासणी यंत्र 
हैद्राबाद येथील कृषि कोरडवाहू संशोधन केंद्र (क्रीडा) यांचे मुळ डिझाइन असलेले चार फणी रूंद सरी वरंबा (बीबीएफ) पेरणी यंत्रामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कृषि यंत्र व शक्‍ती विभागाने संशोधनाच्‍या आधारे सुधारणा करून मराठवाडयातील कोरडवाहु शेतीसाठी उपयुक्‍त पाच फणी रूंद सरी वरंबा (बीबीएफ) बी खत पेरणीसह फवारणी व रासणी यंत्र (फोर इन वन) विकसीत केले. सदरिल यंत्र शेतक-यांना उपलब्‍ध होण्‍याच्‍या दृष्‍टीने व्‍यावसा‍यिकरित्‍या तयार करण्‍याचे अधिकार पुणे येथील रोहित कृषि इंडस्ट्रिज यांना देण्‍यात आले. याकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, केंद्रीय कोरडवाहू संशोधन केंद्र, हैद्राबाद (क्रिडा) व रोहीत कृषि इंडस्ट्रीज, पुणे यांच्‍यात दिनांक २३ ऑक्‍टोबर रोजी सामंजस्य करार क्रीडा हैद्राबाद येथे करण्‍यात आला. यावेळी माजी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्वरलु, कुलगुरू मा डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, क्रीडा संस्‍थेचे संचालक डॉ रविंद्र चारी, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ यु एम खोडके, सदरील यंत्र विकसीत करणारे पशुशक्तीचा योग्य वापर योजनाच्‍या संशोधिका डॉ स्मिता सोलंकी, वरिष्ठ संशोधन सहाय्यक अजय वाघमार, शास्‍त्रज्ञ डॉ आय श्रीनिवासन, डॉ आडके, रोहीत कृषि इंडस्ट्रिजचे कार्यकारी संचालक रोहीत कदम, डॉ एम. एस. पेंडके, सचिन कवडे आदींची उपस्थिती होती.
पाच फणी रूंद सरी वरंबा (बीबीएफ) बी खत पेरणीसह फवारणी व रासणी यंत्राचे फायदे
मराठवाडा विभागातील ८७ टक्के क्षेत्र हे पावसावर अवलंबुन असुन हवामान बदलामुळे पावसाचे आगमन, वितरण तसेच निर्गमन यामध्ये बराचसा बदल आढळुन येत आहे. याचा परिणाम कोरडवाहू शेतीवर मागील काही वर्षात दिसुन येत आहे, यासाठी पडणा-या पावसाचे जास्तीत जास्त मुलस्थानी जलसंधारण करून त्याचा पावसाच्या खंड काळात उपयोग करणे जसे आवश्यक आहे तसे अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करणेही आवश्यक आहे. मराठवाडा विभागात मध्यम ते भारी जमिनीचे प्रमाण अधिक आहे. अशा वेळी पडणा-या पावसाचे प्रमाण व तीव्रता तसेच जमिनीचा प्रकार यासर्व बाबी लक्षात घेऊन विविध पिकांची लागवड रूंद वरंबा सरी पध्दत म्‍हणजेच बीबीएफ पध्दतीने केल्यास फायदेशीर ठरते. कोरडवाहू शेतीसाठी रूंद वरंबा सरी पध्दत एक अत्यंत उपयोगी व हवामान बदलानुरूप तंत्रज्ञान ठरले आहे. तसेच तण नियंत्रणाच्या दृष्टीने उगवणपुर्व तणनाशकांचा वापर करणे फायदेशीर ठरते. या पध्‍दती मुळे पावसाचे पाणी स-यांमध्ये मुरते, त्यामुळे मुलस्थानी जलसंवर्धन होऊन त्याचा उभ्या पिकास, तसेच पुढील हंगामातील पिकांस लाभ होतो. विशेषतः पावसाच्या दीर्घकालीन खंड काळात याचा लाभ होतो व त्याची तीव्रता कमी होते. गादी वाफे किंवा वरंब्यामध्ये हवा खेळती राहुन पाणी व हवा यांचे योग्य प्रमाण राखले जाते. त्यामुळे बियाण्याची उगवण चांगली होते व पिकाची पुढील वाढ जोमदारपणे होते. त्यामुळे शेतक-यांच्या उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. तसेच या यंत्राने चार कामे एकाच वेळेस होत असल्याने टॅक्टरच्या सतत शेतामध्ये जाण्यामुळे होणारा माती दबण्याचे प्रमाण कमीत कमी होईल.
या सर्व बाबीं लक्षात घेऊन क्रीडा, हैद्राबाद व वनामकृवि, परभणी यांनी पाच फणी बीबीएफ फवारणी व रासणीसह बीबीएफ; (रूंद वरंबा सरी) विकसित केलेले यंत्र शेतक-यांकरिता विक्रीसाठी उपलब्‍ध होण्‍यासाठी रोहीत कृषि इंडस्ट्रिज सोबत सांमजस्‍य करार केला. यावेळी केंद्रीय कोरडवाहू संशोधन केंद्र, हैद्राबाद येथील विभागातील वैज्ञानिक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.