Sunday, March 15, 2020

वनामकृवित देशी देवणी गोवंश संवर्धन कार्यशाळेचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठातील संकरीत गो पैदास प्रकल्पाच्‍या वतीने देशी गोवंशाचे संवर्धन कार्यशाळेचे आयोजन मंगळवार दि. १७ मार्च रोजी  सकाळी १०.०० वाजता करण्यात आलेले असुन कार्यशाळेस कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, देवणी जतन व पैदासकार संस्‍थेचे अध्यक्ष डॉ. भास्कर बोरगावकर आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सदरील कार्यशाळेत देवणी गोवंश संवर्धनाबाबत विविध विषयावर चर्चा करण्यात येणार असुन संबधीत विषयातील विषयतज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तरी कार्यशाळेचा पशुपालकांनी लाभ घेण्‍याचे आवाहन संकरीत गो पैदास प्रकल्पाचे जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिनेशसिंह चौहान यांनी केले आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठातील संकरीत गो पैदास प्रकल्पाच्‍या वतीने संकरीत होलदेव आणि देशी देवणी गोवंशाचे संगोपण, संवर्धन आणि संशोधन केल्या जाते. पशुपालकामध्ये मराठवाडयातील देशी गोवंशाचे संवर्धनाबाबत जागरुकता निर्माण व्हावी या उददेशाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते.  मराठवाडयातील देवणी गोवंश हा व्दिउददेशीय असुन या जातीचे संगोपन दुग्धोत्पादन तसेच शेतीकामासाठी गो-हे तयार करण्यासाठी केल्या जाते.  मराठवाडयातील उत्तम दुग्धोत्पादनक्षमता असलेली, वातावरणाशी समरस झालेली ही देशी गोवंशाची जात असुन अनिर्बंध पैदास तसेच उत्तम वळुची अनुउपलब्धतता यामुळे भविष्यात ही जात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मराठवाडयातील शेतीची एकंदरीत परिस्थिती पाहता ओढकामासाठी पशुधनाचा वापर केल्या जातो, तसेच देशी गोवंशाचे सेंद्रीय शेतीतील महत्व अनन्यसाधारण आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पावर ११८ देवणी गोवंशाचे पशुधन असुन देवणी गोंवशाचा होणारा -हास थांबवण्याचे दृष्टीने या प्रकल्पात जातीवंत देवणी गोवंशाचे संवर्धन व उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने मागील वीस वर्षापासुन प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग या कार्यशाळेचे आयोजन प्रकल्‍पाच्‍या प्रक्षेत्रावर करण्यात आलेले आहे.