Saturday, March 14, 2020

सन २०२२ मध्‍ये वनामकृविचे नविन कापूस संकरित वाण बी टी स्वरुपात उपलब्ध होणार

वनामकृवि व महाबीज मध्‍ये सामंजस्‍य करार 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ ने प्रसारित केलेले कपाशीचे एनएचएच २५० व एनएचएच ७१५ हे दोन संकरित वाण बीजी २ स्वरुपात संस्करीत होणार आहेत. या बाबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी (वनामकृवि) व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला (महाबीज) यांचे दरम्यान सामंजस्य करार दि. ११ मार्च रोजी अकोला येथे पार पडला. या करारावर वनामकृवि चे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर व महाबीजचे महाव्यवस्थापक गुणनियंत्रण डॉ. प्रफुल्ल लहाने यांनी स्वाक्षरी केली. यावेळी कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण, महाबीजचे व्यवस्थापकीये संचालक श्री अनिल भंडारी, अकोला कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खर्चे, कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग, महाबीजचे महाव्यवस्थापक उत्पादन श्री पांडुरंग फुंडकर, श्री खिस्ते, नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. दिनेश पाटील, डॉ. शिवाजी तेलंग, प्रा. अरुण गायकवाड आदींची उपस्थिती होती.
मागील हंगामामध्ये वनामकृवि व महाबीज यांच्या सामंजस्य करारातून तयार झालेला एनएचएच ४४ हा बीटी वाण शेतकऱ्यांना महाबीजद्वारे मराठवाड्यामध्ये वितरीत करण्यात आला. या वाणास शेतकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला असून या वाणाने शेतकऱ्यांना चांगले उत्पादन दिले आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या अन्य भागातून एनएचएच ४४ बीटी या वाणाची उपलब्धता करण्यासाठी महाबीजकडे मागणी वाढत आहे. तसेच विद्यापीठ विकसित अधिक उत्‍पादन देणा-या नविन बीटी वाणांची मागणी होत आहे. या पाश्वभूमीवर विद्यापीठाचे अधिक उत्‍पादन क्षमता असणारे नविन वाणांचे जनुकीय तंत्रज्ञान युक्त (बोलगार्ड २) स्वरुपात संस्करण महाबीजद्वारे करण्यात येणार आहे.
वरील दोन्ही वाण रसशोषण करणाऱ्या किडींना सहनशील आहेत. एनएचएच २५० हा वाण मध्य भारतातील महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश व ओरिसा या राज्यांमध्ये लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला असून एनएचएच ७१५ हा वाण मध्य भारत व दक्षिण भारतातील (कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाना व तमिळनाडू) राज्यांमध्ये लागवडीसाठी सन २०१८ मध्ये प्रसारीत करण्यात आला आहे. हे दोन्ही वाण उत्पादन व धाग्याची गुणधर्म या दोन्ही बाबतीत राष्ट्रीय स्तरावरील संशोधनात सरस आढळून आले आहेत. या वाणांचे बोलगार्ड २ स्वरूपातील बियाणे २०२२ हंगामातील शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकेल असे यावेळी सांगण्यात आले.