Thursday, March 19, 2020

मौजे वर्णा येथे शेतक-यांच्‍या प्रक्षेत्रावरील गव्हावरील रोगाची कृषि तज्ञांकडून पाहणी

परभणी परिसरात पहिल्‍यांदाच गव्‍हाच्‍या ओंबीवरील बुरशीजन्‍य करपा रोगाची शक्‍यता, तज्ञाचे मत
परभणी जिल्‍हयातील जिंतूर तालुक्‍यातील मौजे वर्णा येथे शेतक-यांच्‍या प्रक्षेत्रावरील गहु पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्‍याचे शेतक-यांनी रोगग्रस्‍त पिकांचे अवशेष वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात कृषि शास्‍त्रज्ञांना दाखविले. कृषि तज्ञांचे पथकानी दिनांक 19 मार्च रोजी सदरिल पिकांची पाहणी केली. या पथकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. डि. बी. देवसरकर, वनस्पती रोगशास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. के. टी. आपेट, विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. यु. एन. आळसे, वनस्‍पती रोग शास्‍त्रज्ञ डॉ. एम. एस. दडके आदीसह देशपातळीवरील कर्नाल (हरियाणा) येथील गहू संशोधन संचालनालयाचे डॉ. विकास गुप्ता, गहू पैदासकार डॉ. रविंद्र कुमार, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील निफाड येथील गहू संशोधन केंद्र, गहू पैदासकार डॉ. एस. एस. दोडके, वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. भानुदास गमे, जिंतूर तालुका कृषी अधिकारी श्री. एस पी.काळे आदीचा समावेश होता.
या तज्ञ चमुने संयुक्तपणे गहू प्रक्षेत्राला भेट देऊन पाहणी केली असता गहु पिकांच्‍या जीडब्ल्यू-४९६, एमएसीएस-६२६५एमएसीएस-२४९६ व जीके-७७७७ या वाणांची पेरणी केलेली होती. या सर्वच क्षेत्रांवर तपकिरी तांबेरा, मावा, खोडकीड आणि ओंबी वरील बुरशीजन्य करपा आढळून आला. यातील ओंबीवरील बुरशीजन्य करपा हा परभणी परिसरात पहिल्यांदाच आढळून आल्याचे तज्ञांचे मत असुन डॉ. देवसरकर व डॉ. रविंद्र कुमार यांनी असे सांगितले की सकृतदर्शनी जरी ओंबी वरील करपा रोग दिसत असला तरी नमुन्यांची तपासणी केल्यानंतर त्याचे निदान निश्चित होईल. डॉ.आपेट, डॉ.दडके व डॉ.गमे यांच्या मतानुसार तांबेरा, मावा, खोडकिडा व ओंबीवरील करपा यांचा संयुक्त परीणाम म्हणून ओंब्या वरून खाली वाळत गेलेल्या आहेत. तसेच पानातील हरीतद्रव्य कमी झाल्यामुळे असा परिणाम झाल्याचे दिसून येते. सर्व तज्ञांचे यावर एकमत झाले.
यावेळी डॉ. यु.एन. आळसे व श्री. एस.पी.काळे यांनी खबरदारीच्या उपाय योजना म्हणून गव्हाची काढणी झाल्यानंतर गव्हाचे काड जमा करून खड्यात टाकावे किंवा या वर्षासाठी जाळून बुरशीचे अवशेष नष्ट करावेत व जमिनीची खोल नांगरट करावी. पुढील हंगामात घरचे बियाणे वापरू नये तसेच पिकांची फेरपालट करावी असा सल्ला शेतकऱ्यांना दिला.
यावेळी कृषी मित्र दिलीप अंभोरे, प्रदिप अंभोरे तसेच शेतकरी माणिक, विलास, शंकर, विजय दिगंबर, माधवराव, दत्ता, बालाजी (सर्व अंभोरे), राजेश्वर खोकले, ज्ञानेश्वर ढवळे आदींनी संपूर्ण गव्हाचे क्षेत्र फिरुन तज्ञांना माहिती दिली व सहकार्य केले.