वनामकृवितील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचा सल्ला
मराठवाडयात काही भागात कपाशीची लवकर लागवड झालेल्या पिकास फुले लागली असून त्यावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. सद्या वातावरण ढगाळ असल्याने व कापसाला पाते, फुले लागत असल्याने गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रीय झालेले आढळून येत आहे. मादी पतंग पाते, फुले यावर अंडी घालतात, त्यामुळे कपाशीच्या पिकात कामगंध सापळे लावण्याची ही योग्य वेळ असुन कपाशीच्या पिकात नियमित सर्वेक्षण करुन डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्यात, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या वतीने देण्यात आला.
गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे हेक्टरी पाच या प्रमाणात लावावीत़. पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी घ्यावी अथवा प्रादुर्भाव जास्त असल्यास खालीलपैकी एका रासायनिक कीटकनाशकांची ची फवारणी करावी. फवारणी करिता प्रोफेनोफॉस 50 टक्के 30 मिली किंवा 2.प्रोफेनोफोस 40 टक्के + सायपरमेथ्रीन 4 टक्के (संयुक्त कीटकनाशक) 10 मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारावे. हे प्रमाण साध्या पंपासाठी असून पावर (पेट्रोल) पंपासाठी कीटकनाशकांची मात्रा तीन पट करावी. सदरिल कीटकनाशका सोबत कुठल्याही प्रकारचे इतर कीटक नाशके, बुरशीनाशके, विद्राव्य खते,सूक्ष्म मूलद्रव्ये अथवा रसायने मिसळू नये.