वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषि दिनाचे औजित्य साधुन दिनांक 1 जुलै रोजी पूर्णा तालूक्यातील धानोरा (काळे) येथे महिला शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात आले. अन्न व पोषण विभागाच्या प्रमुख डॉ. आशा आर्या, गृह व्यवस्थापन विभागाच्या प्राध्यापिका डॉ. माधुरी कुलकर्णी, वस्त्रशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. मेधा उमरीकर, मानव विकास विभागाच्या डॉ. वीणा भालेराव, डॉ. इरफाना सिद्दीकी यांनी ग्रामीण महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. गावातील प्रगतीशील शेतकरी श्री. प्रताप काळे, श्री. भूजंगराव काळे, श्री. प्रसाद काळे, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री. मेडेवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. आशा आर्या यांनी महिलांना कृषि उत्पादनांवर आधारीत प्रक्रिया व गृह उद्योगांविषयी विस्तृत माहिती देऊन आर्थिक उन्नती साधण्याकरिता उद्युक्त केले तसेच कोरोना दरम्यान रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्याकरीता शेतामध्ये सहजासहजी उपलब्ध भाज्या व फळांचा उपयोग दैनंदिन आहारात करण्यासाठी प्रोत्साहित केले. डॉ. माधूरी कुलकर्णी यांनी महिलांना स्वत:ला संतूलीत, स्वस्थ राहण्याविषयी, दैनंदिन जीवनात सकारात्मकता वाढीबाबत मार्गदर्शन केले. डॉ. मेधा उमरीकर यांच्या मार्गदर्शनाद्वारे महिलांना विणकाम, भरतकाम, कपड्यावरील बांधणीकाम, वारली पेंटींग आदी कलाकृतींच्या माध्यमातून अर्थार्जनाकरीता कसा उपयोग होऊ शकतो, याविषयी माहिती दिली. डॉ. वीणा भालेराव यांनी मुलींनी शिक्षण घ्यावे यासाठी त्यांच्या मातांनी पूढाकार घ्यावा असे सांगुन सध्याच्या कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामध्ये महिलांनी, वयस्करांनी व मुलांनी घ्यावयाची काळजी याविषयी सांगण्यात आले. डॉ. इरफाना सिद्दीकी यांनी या कोरोना महामारीच्या काळात मास्क वापरण्याचे महत्त्व आणि घरच्या घरी महिलांनी मास्क तयार करण्याच्या विविध पध्दतींचे प्रात्यक्षिक दाखवले.
कार्यक्रम प्राचार्या डॉ. जयश्री झेंड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला तर प्रा डॉ शंकर पूरी, प्रगतशील शेतकरी श्री. प्रताप काळे मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमात कोरोना सहिंतेचे काटेकोरपणे पालन करण्यात येवून उपस्थित महिलांना मास्कचे देखील वाटप करण्यात आले.