Tuesday, November 16, 2021

तुरीवरील किडींचे फुलोरा अवस्थेपासूनच व्यवस्थापन करा

वनामकृविच्‍या किटकशास्‍त्रज्ञांचा सल्‍ला

तुरीमध्ये फुलोरा व शेंगा भरणे या अतिशय संवेदनशील अवस्था असून यावर मारूका, शेंगा पोखरणारी अळी व शेंग माशी या किडींचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास ७० टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते. पिकाचे नुकसान शेवटी पीक काढणी झाल्यावर उत्पादनात घट दिसून येते. नॆसर्गिक वातावरणात क्रायसोपा, भक्षक कोळी, ढालकिडा या मित्र कीटकांची संख्या वाढत असते. त्यामुळे थेट रासायनिक किटकनाशकाची फवारणी न करता एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा म्हणजे मशागतीय, यांत्रिकीय, जैविक पध्दतींचा अवलंब करावा. या पध्दती कमी खर्चिक व पर्यावरणपूरक असुन मित्रकीटकांना व मानवी आरोग्याला हानी होत नाही. पीक ५० टक्के फुलोऱ्यात आल्यापासून जैविक कीटकनाशकाचा व किडींच्या सर्वेक्षणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा. जर किडींनी आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास तेव्हाच लेबलक्लेमनुसार रासायनिक किटकनाशकाची फवारणी केली पाहीजे. शेतकरी बांधवानी पिकाचे संरक्षण करण्यासाठी सुरवातीपासून एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करणे गरजेचे आहे.किडींच्या वेळीच व्यवस्थापनासाठी शेतकरी बांधवाना किडींची ओळख, जीवनक्रम माहीत असणे आवश्यक आहे.

पाने व फुले जाळी करणारी अळी - या किडीला मारूका व ठिपक्याची शेंगा पोखरणारी अळी या नावाने सुध्दा ओळखले जाते. या किडीचा प्रौढ मादी पतंग पिवळसर रंगाची असते. ती उभट आकाराची अंडी पुंजक्यात शक्यतो झाडाच्या शेंडयावर घालते. अळी १४ मि.मि. लांबीची हिरवट पांढरी व दोन्ही बाजुस काळे ठिपके असलेली असते.अळी अवस्था १२ ते १४ दिवसांची असून पतंग अवस्था ६ ते ७ दिवसात पूर्ण होते. या किडीचा जीवनक्रम २६ ते ३१ दिवसात पूर्ण होतो. या किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने पिक फुलोऱ्यात येण्याच्या कालावधीत जास्त आद्रता व मध्यम तापमान वेळी आढळून येतो. ही अनुकूलता सप्टेंबर ते ऑक्टोम्बरमध्ये मिळाल्याने किडीचा प्रादुर्भाव जास्त होऊ शकतो. ही अळी पाने फुले कळया व शेंगा यांचा एकत्र गुच्छ तयार करुन त्यात लपुन बसते आणि उदर्निवाह करते. वाढ होणारे कोवळे शेंडे, पाने एकमेकांना चिकटल्याने खोडाची वाढ खुंटते, तेथील फुले निस्तेज दिसतात व शेंगाची वाढ होत नाही अशाप्रकारे ५ ते २५ टक्केपर्यंत उत्पादनात घट होऊ शकते.

शेंगा पोखरणारी अळी - तुर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या कीडीमध्ये हिरवी अळी किंवा घाटे अळी ही भयंकर नुकसानकारक कीड आहे. ही किड बहुभक्षी असून जवळपास २०० पिकांवर (तुर, कापूस, सोयाबीन,भेंडी, टोमॅटो,हरभरा इ.) पिकावर प्रादुर्भाव दिसून येतो. या किडीचा जीवनक्रम चार अवस्थेत म्हणजेच अंडी, अळी, कोष व पतंग अशा प्रकारे पुर्ण होतो. अळी रंगाने हिरवट पिवळसर असुन अंगावर तुरळक समांतर रेषा असतात. पुर्ण वाढ झालेली अळी साधारणपणे ४ सें.मी. लांब  असते. या अळीच्या वर्षातुन ७ ते ९ पिढया तयार होतात. एक मादी सरासरी ८०० अंडी कोवळी पाने, देठे किंवा कळया, फुले तसेच शेंगावर सुध्दा घालते. ४ ते ७ दिवसांनी या अंडयातुन अळया बाहेर पडतात व १४ ते १६ दिवसांपर्यंत पुर्ण वाढ होवुन त्या झाडाच्या बुंध्याजवळ जमिनीत मातीच्या वेष्ठणात कोषावस्थेत जातात. कोषातुन पतंग बाहेर पडतात अशाप्रकारे अळीचा जिवनक्रम पुर्ण होतो. हया किडीचा जीवनक्रम - आठवडयात पुर्ण होतो. अंडयातून बाहेर निघालेल्या प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्या अगोदर तुरीची कोवळी पाने खाते, पिक फुलोऱ्यात आल्यावर कळयावर उपजिवीका करते. नंतर शेंगा लागल्यावर शेंगांना छिद्र पाडून अर्धे शरीर बाहेर व अर्धे शरीर आत ठेवून आतील दाणे खाते. तसेच मोठया अळया शेंगाना छिद्रे करुन आतील दाणे पोखरुन खातात. अशा प्रकारे एक अळी ३० ते ४० शेंगाना नुकसान पोहचवुन अळी अवस्था पुर्ण करते. ढगाळ  वातावरणात  या  कीडींची संख्या वाढून जास्त प्रादुर्भाव असल्यास २५ ते ७० टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते.

शेंगमाशी या कीडीची मादी शेंगाच्या सालीच्या आत अंडी घालते. अंडी पांढ­या रंगाची, लांब गोलाकार असतात. बारीकअळी, गुळगुळीत व पांढ­या रंगाची असुन तिला नसतात. तिचा तोंंडाकडील भाग निनमुळता असताते.ही अंडी 3 ते 7 दिवसात उबवुन अळी बाहेर पडते. ही अळी अवस्था १० ते १८ दिवसात पुर्ण होवून शेंगेतच कोषावस्थेत जात. कोषावरण तपकिरी रंगाचे असुन लांब गोलाकृती असतो. कोषावरणाच्या आत कोष असुन, सुरुवातीस हा कोष पिवळसर पांढरा असुन नंतर तपकिरी रंगाचा होतो. कोषावसथेच्या ते दिवसांत माशी शेंगेतुन बाहेर पडते. अशा प्रकारे शेंगमाशीचा जीवनक्रम ते आठवडयात पुर्ण होतो.  सुरुवातीस शेंगमाशीच्या प्रादुर्भावाचे कोणतेही लक्षण शेंगेवर दिसत नाही. परंतु जेव्हा वाढ झालेली अळी कोषावस्थेत जाण्यापूर्वी शेंगेला छिद्र पाडते व त्या छिद्रातुन माशी बाहेर पडते तेव्हा नुकसानीचा प्रकार लक्षात येतो. अळी शेंगेत प्रवेश करुन अर्धवट दाणे खाते तसेच दाण्यावर नागमोडी खाचा तयार होतात. यामुळे बुरशीची वाढ होते व दाणे कुजतात.


एकात्मिक कीड व्यवस्थापन : वातावरणाशी समन्वय साधुन एकमेकास पुरक अशा सर्व तंत्रज्ञानाचा वापर करुन कीडीची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवणे त्यामध्ये मशागतीय, यांत्रिक, जैविकव कमीत कमी रासायनिक कीटकनाशकांचा वापर तसेच फुलोरा अवस्थेपासूनच किडींचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

यांत्रिक पध्दती: पाने गुंडाळणाऱ्या अळीची प्रादुर्भावग्रस्त पाने गोळा करून अळीसहीत नष्ट करावीत. शेताच्या बांधावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीची पर्यायी खाद्यतणे कोळशी, रानभेंडी, पेटारी ही तणे वेळोवेळी काढून नष्ट करावीत. तूर पीक कळी लागण्याच्या अवस्थेत आल्यापासून एकरी २ कामगंध सापळे व २ नरसाळे सापळे पिकाच्या वर एक फुटी उंचीवर लावावेत. जेणेकरूनशेंगा पोखरणाऱ्या अळी व मारूकाची आर्थिक नुकसानीची पातळी कळेल.शक्य असल्यास तुरीवरील मोठया अळया वेचुन नष्ट कराव्यात. तुरीच्या झाडाखाली पोते टाकून हलकेसे झाड हलवावे आणि पोत्यावर पडलेल्या अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. शेतामध्ये पक्षी बसण्यासाठी पिकाच्या एक ते दोन फुट उंचीवर पक्षी थांबे हेक्टरी 50 ते 60 ठिकाणी उभारावे. यामुळे पक्ष्यांना आश्रय मिळून ते पिकातील अळयांचे भक्षण करतील.

जैविक पध्दती : पिकास फुलकळी येऊ लागताच प्रतिबंधात्मकउपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरॅक्टिन ३०० पीपीएम ५० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. दुसरी फवारणी शेंगा पोखरणारी हिरवी अळी प्रथम व द्वितीय अवस्थेत असताना एच..एन.पी.व्ही. विषाणूची ५ मि.ली. १० लिटर पाण्यातून फवारणी सायंकाळी करावी म्हणजे त्याची तिव्रता कमी होणार नाही हे औषध अन्नाद्वारे पोटात जावुन अळीच्या शरीरात विषाणुची वाढ होते व त्यामुळे अळया - दिवसात मरतात.

रासायनिक पध्दत : ज्यावेळी इतर व्यवस्थापन पध्दतींचा वापर करुन कीडींची संख्या आर्थीक नुकसान पातळीच्या वर जात असल्यास तेव्हाच शिफारशीनुसार रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी.

शेंगा पोखरणारी अळी - इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ४.४ ग्रॅम किंवा फ्ल्यूबॅडामाईड ३९.३५ एससी २ मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल १८.५ एससी ३ मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ई.सी. ८ मि.ली. प्रति १० लि. पाणी.

शेंगा पोखरणारी अळी (मारूका): नोवॅल्युरोन ५.२५ अधिक इंडोक्झाकार्ब ४.५०एससी १६ मिली किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ ईसी ६.६६ मि.ली. प्रति १० लि. पाणी.

शेंगमाशी: डेल्टामेथ्रीन २.८ इसी१०मिली, लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ई.सी. १० मि.ली.प्रति १० लि. पाणी.


आर्थिक नुकसानीची पातळी

शेंगा पोखरणारी अळी (घाटे अळी) :कामगंध सापळ्यात सलग २ ते ३ दिवस ८ ते १०पतंग प्रति सापळा किंवा फुलोऱ्याच्या वेळी अथवा फुलोऱ्यानंतर 2अळ्या प्रति झाड किंवा १० टक्के कीडग्रस्त शेंगा

ठिपक्याची शेंगा पोखरणारी अळी (मारूका) : -२अळ्या प्रति झाड

शेंगमाशी: ५ टक्के हिरव्या प्रादुर्भावग्रस्त शेंगा


महत्वाचे लक्षात ठेवावे: पीक ५० टक्के फुलोऱ्यात असताना जैविक कीटकनाशकाची फवारणी करावी.  प्रथम व द्वितीय अवस्थेतच शेंगा पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करताना कीटकनाशकाची योग्य मात्रा वापरून दोन कीटकनाशकाचे मिश्रण न करता केवळ एकाच कीटकनाशकाची फवारणी करावी. दुसरी फवारणीकरायची झाल्यास सलग एकाच कीटकनाशकाची फवारणी न करता कीटकनाशक बदलून १५ दिवसाच्या अंतराने करावी. फवारणी करताना हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा. कीटकनाशकाचे प्रमाण नॅपसॅक पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी मात्रा तीनपट वापरावी.

नुकसान टाळण्यासाठी योग्य वेळी व्यवस्थापन करावे असे अवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, कृषि कीटकशास्त्र विभागाचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. संजीव बंटेवाड, डॉ. अनंत लाड, डॉ. संजोग बोकन, डॉ.राजरतन खंदारे यांनी केले आहे.