Saturday, November 27, 2021

क्रॉपसॅप अंतर्गत मध्यहंगामी विभागीय ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि किटकशास्त्र विभाग व कृषि विभाग (महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प - क्रॉपसॅप २०२१-२२ अंतर्गत मध्यहंगामी पिकांतील किड व रोग व्‍यवस्‍थापनावर ऑनलाईन प्रशिक्षणाचे दि २६ नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणाच्‍या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर हे होते तर विभागीय कृषि सहसंचालक (औरंगाबाद) डॉ.दिनकर जाधव, विभागीय कृषि सहसंचालक (लातुर) श्री. साहेबराव दिवेकर, क्रॉपसॅप प्रकल्पाचे राज्यस्तरीय सकाणू समिती सदस्य तथा कृषि किटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संजीव बंटेवाड, समन्वय अधिकारी डॉ. अनंत लाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करताना डॉ. देवराव देवसरकर यांनी अचूक किड रोग सर्वेक्षण योग्य वेळी करणे आणि त्यानुसार विद्यापीठाकडुन व कृषि विभागाकडुन व्यवस्थापनाबाबत वेळोवेळी किड रोग नियोजनाचा योग्य सल्ला देण्यात यावा असे सांगितले. मार्गदर्शनात डॉ. दिनकर जाधव यांनी रब्बी हंगामात सर्वांनी जबाबदारीने काम करून कृषि अधिकारी व क्षेत्रीय कर्मचा-यांनी किड व रोग हॉटस्पॉट ओळखून व प्रत्‍यक्ष बांधावर जाउन शेतक-यांना वेळीच सल्ला देण्‍याचे आवाहन केले तर श्री. साहेबराव दिवेकर यांनी आपल्या मार्गदर्शनात कृषि अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी यांना किड सर्वेक्षण हंगामाच्या सुरुवातीपासुन १०० टक्के अचुक किड-रोग सर्वेक्षण करुन वेळोवेळी शेतकरी बांधवांना सल्ला देण्यात यावा जेणे करुन उत्पादनात वाढ होईल, असे सांगितले. 

तांत्रिक सत्रामध्ये डॉ. अनंत लाड यांनी हरभरा पिकावरील किडींचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले तर डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी मका व ज्वारी लष्करी अळीचे व्यवस्थापन, डॉ. डॉ. प्रशांत सोनटक्के यांनी हरभरा पिकावरील रोग व्यवस्थापन, डॉ. संजोग बोकन यांनी हरभरा व ज्वारी वरील किडींचे सर्वेक्षण याबाबत मार्गदर्शन केले. तसेच क्रॉपसॅप प्रपत्र नोंदणी व प्रात्याक्षिक याबाबत डॉ. राजरतन खंदारे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात डॉ. संजीव बंटेवाड यांनी कीड सर्वेक्षणाचे महत्व विषद करून कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी कीड व रोग सर्वेक्षणाचे काम जबाबदारीने करण्‍याचे आवाहन केले. सुत्रसंचालन डॉ अनंत लाड यांनी केले तर आभार डॉ. संजोग बोकन यांनी मानले. सदरिल प्रशिक्षण मराठवाडयातील लातुर व औरंगाबाद विभागातील जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी व कृषि पर्यवेक्षक यांच्याकरिता आयोजित करण्‍यात आले होते.  प्रशिक्षणास लातुर व औरंगाबाद विभागातील ३०० हुन अधिक कृषि विभागातील अधिका-यांची ऑनलाईन उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. राजरतन खंदारे, श्री. दिपक लाड यांनी परिश्रम घेतले.