Sunday, August 13, 2023

कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञांनी केले शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन

तीन दिवसात हिंगोली जिल्‍हयातील आठ गांवातील शेतकरी बांधवाच्‍या प्रक्षेत्राची पाहणी 

वसुंधरा फाउंडेशन व नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील शास्‍त्रज्ञांचे शेतकऱ्यांच्या बांधावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे दिनांक ९ ते ११ ऑगस्‍ट दरम्‍यान हिंगोली जिल्‍हयात आयोजन करण्‍यात आले होते. दिनांक ९ ऑगस्ट रोजी हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातील वाकोडी, माळधामणी व बोल्डावाडी तर दिनांक १० ऑगस्ट रोजी हिंगोली तालुक्यातील भिंगी, आंबाळा, चिंचाळा, तर दिनांक ११ ऑगस्ट रोजी सेनगाव तालुक्यातील भगवती, वरखेडा या गावांमध्ये विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी पीक पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यात विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे आणि सहाय्यक किटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.  या प्रक्षेत्र भेटी दरम्‍यान सोयाबीनवर ब-याच ठिकाणी  पिवळा मोझॅक म्हणजेच केवडा या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो असुन शेतकऱ्यांनी वेळीच या रोगाला ओळखून त्याचे व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. यात प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून त्यांना जाळून किंवा जमिनीत पुरून नष्ट करणे गरजेचे आहे, तसेच रोगाचा प्रसार करणा-या पांढ-या माशीचे व्यवस्थापन शिफारस केलेल्या किटकनाशकाची फवारणी करून करणे गरजेचे आहे.

सोयाबीनची वाढ कमी झाली असल्यास, वाढीसाठी १९:१९:१९ या विद्राव्य खताची व ग्रेड-२ चे माइक्रोन्युट्रीएंट ची फवारणी करण्याचा सल्‍ला विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी दिला. सोयाबीनमधील अन्नद्रव्यांचा कमतरतेमुळे होणारा पिवळेपणा (क्लोरासीस), पाने खाणाऱ्या अळ्या, चक्री भुंगा व खोड माशीच्या व्यवस्थापन विषयीही सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना, ज्यामध्ये विविध पिकांमधील मधील तण नियंत्रण, हळद पिकाची बेडवरील लागवड, कंदमाशी नियंत्रण, हुमणी नियंत्रण करण्यासाठी उपाय व विविध पिकांतील खत व्यवस्थापन, त्याच बरोबर कापूस पिकावरील रसशोषक किड,लाल्या रोग, बोंडअळी अशा विविध प्रकारच्या किडींचे व रोगांचे व्यवस्थापन करण्याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

शेतकऱ्यांना कीटकनाशके फवारणी करतांना एकापेक्षा जास्त कीटकनाशके मिसळून फवारण्या करू नये तसेच फवारणी करतांना किटकनाशकामुळे मानवी आरोग्यावर आणि पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी योग्य काळजी घेऊनच फवारणी करावी असे सांगितले. विद्यापीठामध्ये उपलब्ध विविध जैविक निविष्ठांचा वापर करण्‍याचा सल्‍ला दिला. शेती विषयक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांविषयी माहिती घेण्यासाठी विद्यापीठाचे विविध प्रसार माध्यमे जसे की विविध मोबाईल ॲप्लिकेशन, फेसबुक, यूट्यूब चैनल, ब्लॉग द्वारे विद्यापीठाशी संपर्कात राहावे आणि अधिक माहिती करिता विद्यापीठाची कृषी वाहिनी क्रमांक ०२४५२-२२९००० या संपर्क करण्‍याचे आवाहन करण्‍यात आले. कार्यक्रमात गोदा फार्मचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री.नितीन चव्हाण, वसुंधरा फाउंडेशन, संचालक श्री.गोविंद पाटील व वसुंधरा फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.दिनेश मंगीराज व टीम वसुंधरा फाउंडेशन उपस्थित होते.