Thursday, November 2, 2023

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भरडधान्य फराळ निर्मिती प्रशिक्षण संपन्‍न

जगभर २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. आंतरराष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषणामध्ये भरडधान्यांना असणारे महत्व लक्षात घेऊन त्यांचे नामकरण " श्री अन्न" असे करण्यात आले आहे. याच अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठाअंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालय आणि उमेद, माहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, परभणी यांचे संयुक्त विद्येमाने अन्न विज्ञान आणि पोषण विभागात जिल्ह्यातील महिला स्वयंसहायता समूहास दिनांक ३० ऑक्‍टोबर रोजी श्री अन्न फराळ निर्मिती यावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते.

कार्यक्रमात प्रमुख अतिथी प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर यांनी व्यक्तीच्या दैनंदिन आहारात भरडधान्य जसे की, ज्वारी, बाजरी, नाचणी, राळे, भगर इत्यादींचा समावेश असणे अतिशय आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. प्रशिक्षणार्थीना दिवाळी सणानिमित्त भरडधान्याचे विविध पदार्थ तयार करून त्यांची विक्री केल्यास महिला प्रशिक्षणार्थीना आर्थिक लाभ मिळण्याची संधी असून त्यासाठी शासनाद्वारे निश्चित प्रयत्न केले जातील असेही त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विशद केले.

प्रशिक्षणा दरम्यान विविध भरडधान्य पाककृती जसे की, शाही चकली, शाही शेव, शाही शंकरपाळे, शाही खस्ता पुरी, शाही मठरी, शाही लाडू आणि शाही चिवडा यासारखा दिवाळीचा शाही (पौष्टिक) फराळ निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. याचबरोबर प्रशिक्षणार्थींना या पदार्थासाठी विक्री करण्यासाठी आकर्षक पॅकींग कौशल्यातही पारंगत करण्यात आले. सदरील प्रशिक्षण हे ‘सण आला दिवाळीचा- फराळ शाही मिलेटस’ या घोषवाक्यावर आधारित घेण्यात आलेले असून दैनंदिन आहारातील भरडधान्याचा ग्रामीण विभागातही प्रचार होण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील डॉ. जया बंगाळे यांनी स्पष्ट केले.

प्रशिक्षणादरम्यान परिचित करून देण्यात आलेल्या विविध फराळांची माहिती पुस्तिका प्रशिक्षणार्थीना देण्यात आली. या कार्यक्रमाचा लाभ ऐकून ४० महिलांनी घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि कार्यक्रमासाठी आवश्यक ते मार्गदर्शन डॉ. वीणा भालेराव विभाग, प्रमुख अन्न विज्ञान आणि पोषण विभाग यांनी केले. तसेच डॉ. कल्पना लहाडे आणि  डॉ. अश्विनी बिडवे शिक्षण सहयोगी यांनी या प्रशिक्षण कार्क्रमात शिकवल्या जाणाऱ्या पाककृतींची निवड आणि त्यांचे प्रशिक्षण देण्याचे काम पहिले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील पदव्युत्तर तसेच आचार्य पदवीचे विद्यार्थ्यांचेही सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी श्री दिपक दहे, जिल्हा अभियान व्यवस्थापक उमेद, श्री धंनजय भिसे, जिल्हा व्यवस्थापक विपणन, श्री विठ्ठल मुळे, जिल्हा व्यवस्थापक उपजिविका, परभणी यांची विशेष उपस्थिती होती.