वनामकृवित आयोजित पत्रकार परिषदेत कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि यांची माहिती
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, भारतीय बीज तंत्रज्ञान संस्था, नवी दिल्ली, आणि राष्ट्रीय बियाणे संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वाराणसी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच भारत सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण विभाग, कृषि मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने १२ व्या राष्ट्रीय बियाणे परिषदेचे आयोजन दिनांक ११ ते १३ डिसेंबर दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल ताज विवांतरा येथे करण्यात आले आहे. परभणी कृषि विद्यापीठास प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय बियाणे परिषदेचे यजमान पद भूषवीत आहे, अशी माहिती दिनांक ८ डिसेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी दिली.
शेती नियोजनामध्ये जमीन, हवामान, बियाणे, पेरणी, आंतरमशागत, पाणी व खत व्यवस्थापन, पीक संरक्षण, पीक काढणी, मळणी, साठवण व विक्री हे महत्त्वाचे घटक असुन अधिक उत्पादनाच्या दृष्टीने दर्जेदार बियाणे हे अत्यंत महत्वाचा मुलभुत निविष्ठा आहे. बियाणे शुद्ध व दर्जेदार असल्याशिवाय इतर बाबींवर केलेल्या खर्चाचा पुरेसा मोबदला मिळत नाही. आज आपल्यासमोर बियाण्याशी संबंधित अनेक प्रश्न आहेत, यामध्ये शुद्ध व दर्जेदार बियाणे निर्मिती व उपलब्धता, बियाणे बदल दर, बियाणे प्रक्रिया व साठवण पद्धती व व्यवस्था, बियाणे उद्योगातील प्रश्न व त्यांचे इतर राज्यात होणारे स्थलांतर, बियाणे संदर्भातील कायदे व नियमन इत्यादी बाबी महत्वाच्या असून त्यावर सखोल चर्चा करणे व पुढील दिशा ठरवणे आवश्यक आहे. बीजोत्पादक, बियाणे उद्योजक आणि सामान्य शेतकरी यांच्या दृष्टीने बियाणे व उपलब्धता यावर विचार करण्याची गरज आहे. आज तंत्रज्ञान फार पुढे गेले आहे त्याचा शुद्ध व दर्जेदार बियाणे उत्पादन, प्रक्रिया व साठवणूक, हाताळणी आणि पुढे सुयोग्य वापर व उत्पादन वाढ यासाठी संशोधन संस्था, बियाणे महामंडळ, बिजोत्पादन संस्था, उत्पादक, बियाणे उद्योजक यांच्यात योग्य समन्वय, चर्चा व एक निश्चित धोरण ठरवणे ही काळाची गरज आहे. हाच दृष्टीकोन समोर ठेवून भारतीय कृषि अनुसंधान, नवी दिल्ली, राष्ट्रीय बियाणे संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वाराणसी किंवा देशातील कृषि विद्यापीठे यासाठी कार्यरत आहेत. यादृष्टीने ही राष्ट्रीय बियाणे परिषद अत्यंत महत्वाची व दिशादर्शक ठरणार असल्याचे कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी दिली.
सदर १२ व्या राष्ट्रीय बियाणे परिषदेसाठी देशभरातील कृषि संशोधक, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, सार्वजनिक बियाणे महामंडळाचे प्रतिनिधी, खाजगी बियाणे उद्योजक, बिजोत्पादक शेतकरी, विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. सदरील राष्ट्रीय बियाणे परिषदेचे उद्घाटन दिनांक ११ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० वाजता असुन प्रमुख पाहुणे केंद्रीय कृषिमंत्री मा. ना. श्री. नरेंद्रजी तोमर यांचे हस्ते होणार आहे. कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून राज्याचे कृषिमंत्री मा. ना. श्री. धनंजयजी मुंढे, यांना आमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी कृषि व शेतकरी कल्याण विभागाचे सचिव श्री. मनोज अहुजा, विशेष सचिव श्री. राकेश रंजन, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक, आयसीएआरचे माजी महासंचालक डॉ. मंगला राय, कृषि व शेतकरी कल्याण विभागाचे सहसचिव (बियाणे) श्री. पंकज यादव, अतिरिक्त मुख्यसचिव श्री. अनुप कुमार, पद्मश्री बीजमाता श्रीमती राहीबाई पोपरे, कृषी आयुक्त (भारत सरकार) डॉ. पी. के. सिंग, सोनीपत (हरियाणा) येथील प्रगतीशील शेतकरी पद्मश्री श्री कंवल सिंह चौहान, कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष तथा माजी कुलगुरू डॉ. सी. डी. मायी, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण, नवी दिल्लीचे अध्यक्ष श्री. अजय राणा, महिको ग्रुप, मुंबईचे अध्यक्ष श्री. राजू बारवाले, स्वागताध्यक्ष कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि, भारतीय बीज तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष डॉ. एच.एस. गुप्ता, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, वाराणसी येथील राष्ट्रीय बियाणे संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक श्री. मनोज कुमार आदींची उपस्थित लाभणार आहेत.
तीन दिवसीय सदर परिषदेस देशाचे व राज्याचे माननीय कृषि मंत्री, आजी व माजी सचिव, कृषि संशोधन व शिक्षण विभाग, भारत सरकार व महासंचालक, भाकृअप, नवी दिल्ली, पद्मभूषण शास्त्रज्ञ, पद्मश्री शेतकरी, विविध विद्यापीठांचे आजी व माजी कुलगुरू, नामांकित शास्त्रज्ञ, बियाणे उद्योजक, शेतकरी, विद्यार्थी यांची उपस्थिती लाभणार आहे. परिषदेमध्ये एकूण सहा तांत्रिक सत्रांमध्ये व तीन समूह चर्चा सत्रांमध्ये बियाणे विषयक विविध विषयांवर संशोधन व तंत्रज्ञाना संबंधी शास्त्रज्ञांचे सादरीकरण व चर्चा होणार आहे. यात शास्त्रज्ञ, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, सार्वजनिक बियाणे महामंडळाचे प्रतिनिधी, खाजगी बियाणे उद्योजक, बिजोत्पादक शेतकरी, विद्यार्थी सहभागी होणार आहेत. परिषदेमध्ये दिनांक १२ डिसेंबर रोजी भारतीय बीज तंत्रज्ञान संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या श्री. अमीर सिंह जीवन गौरव पुरस्काराचे वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात येणार आहे. परिषदेचा समारोप समारंभ दिनांक १३ डिसेंबर रोजी संपन्न होणार असून यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मभूषण भाकृअपचे माजी सचिव डॉ. आर. एस. परोडा उपस्थित राहणार आहे.
सदरील १२ व्या राष्ट्रीय बियाणे परिषदेचे आयोजन वनामकृविच्या वतीने कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि, यांचा अध्यक्षतेखाली करण्यात येत असून या परिषदेचे निमंत्रक संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर व आयोजन सचिव डॉ. के.एस. बेग आहेत. विद्यापीठस्तरावर विविध समित्यांचे गठन करण्यात आले असुन विविध समित्यांचे अध्यक्ष, सदस्य या परिषदेच्या आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.
सदर
पत्रकार परिषदेस संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, शिक्षण संचालक
डॉ उदय खोडके, कुलसचिव श्री पी के काळे, विद्यापीठ नियंत्रक श्री प्रविण निर्मल, विद्यापीठ अभियंता
श्री दीपक कशाळकर, डॉ के एस बेग आदींची प्रमुख उपस्थिती होती.