Wednesday, December 6, 2023

आत्मनिर्भर भारताच्या निर्मीतीसाठी एकात्मिक प्रयत्नांची गरज..... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि राष्ट्रीय कर्तव्य अभियान व ग्राम विकास गतिविधी (महाराष्ट्र राज्य) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक डिसेंबर रोजी एक दिवसीय नैसर्गिक शेती ते आत्मनिर्भर ग्राम अभ्यास सत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि हे होते तर विशेष अतिथी म्हणुन ग्राम विकास गतिविधीचे क्षेत्र प्रमुख मा.श्री. विनय कानडे उपस्थित होते. व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, सेंद्रीय शेती प्रकल्‍पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे, परभणी आत्माचे प्रकल्प संचालक श्री. दौलत चव्हाण, दे-आसरा फाउंडेशन, पुणेचे श्री. प्रकाश आगाशे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, राष्ट्रीय कर्तव्य अभियानाचे संयोजक श्री. विजय वरुडकर, गो-संवर्धन विभाग प्रमुख श्री. रमाकांत जोशी, कृषि यंत्र व शक्ती विभागाच्‍या विभाग प्रमुख डॉ. स्मिता सोंलकी आदींची उपस्थिती होती.

अध्यक्षीय मार्गदर्शनात कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि म्‍हणाले की, आपले पुर्वीचे ग्रामीण जीवनाची संरचना ही अतिशय योग्य होती, पुर्वीचे शिक्षण हे मातृभाषेतून होते. आपले मानवी जीवन व जीवनशैली ही निसर्गाला अनुसरून होती. नैसर्गिक शेती ही आज मानवी आरोग्य, जमिनीचे आरोग्य तसेच पर्यावरणाचा संतुलन राखण्यासाठी काळाची गरज आहे. नैसर्गिक शेतीला केंद्र व राज्य सरकार प्रोत्साहन देत आहे. नैसर्गिक साधनसामग्रीचा ­हास होत असून या साधनसामग्रीचे संवर्धन करून ते पुढील पिढीला सुरक्षितपणे हस्तांतरीत करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. शेतकरी बंधु-भगिनी यांनी नैसर्गिक शेतीकडे शाश्वत शेती म्हणून बघावे. नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून सकस अन्नधान्य उत्पादन व आत्मनिर्भर भावी पिढी निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आणि म्हणूनच आत्मनिर्भर भारताच्या निर्माणासाठी सर्वांनी एकत्र यावे व पुढील पन्नास वर्षाचा नियोजन आराखडा तयार करावा. शास्त्रज्ञांनी नैसर्गिक शेतीमध्ये शास्त्रीय दृष्टीकोनातून मार्गदर्शन करावे. आज शेतीमधे कमीत कमी रसायनांचा वापर व रसायने रहीत शेती असा प्रवास टप्याटप्याने करणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे संतुलन व नैसर्गिक साधन सामुग्रीचे संवर्धन करण्यासाठी शेतीमध्ये जास्तीत जास्त किंवा आधिकतम पीक उत्पादन पातळीपेक्षा समतोल उत्पादन पातळी हे आपले भावी काळात उद्दीष्ट असले पाहिजे. शास्त्रज्ञांनी मानवी राहणीमान, आहार, स्वास्थ याबाबतचा निर्देशांक नव्याने विकसित करण्याची गरज आहे. नैसर्गिक शेती उत्पादनाचा किंवा विषमुक्त अन्नाचा मानवी आरोग्यावर व अन्नधान्य गरजेवर काय परिणाम होतो याचा अभ्यास करावा, असे आवाहन त्‍यांनी केले.

डॉ. धर्मराज गोखले म्‍हणाले की, नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून आत्मनिर्भर ग्राम विकसित करता येतील. यासाठी एकात्मीक पीक व्यवस्थापण, शेतीपुरक उद्योग, विविध विकास विभागांचा सहयोग यावर भर देणे गरजेचे आहे. तर प्रमुख पाहुणे श्री. विनय कानडे यांनी सांगितले की, प्रत्येक ग्राम हे गावक­यांच्या व शेतक­यांच्या गरजा पूर्ण करण्यासठी आत्मनिर्भर झाले पाहिजे. यासाठी विविध उपक्रम राबवून एकात्मीक दृष्टीकोन समोर ठेवून काम करणे गरजेचे आहे.

श्री. प्रकाश आगाशे यांनी शेतकरी बंधु-भगिनी व उद्योजक यांनी बाजारपेठ व बाजारपेठ व्यवस्थापणासाठी पुढे येणे व तांत्रिक मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे, असे सांगितले.

 

श्री. विजय वरुडकर यांनी सोशल रिस्पॉनसीबीलीटी (राष्ट्रीय कर्तव्य अभियान, महाराष्ट्र) या संस्थेच्या विविध उपक्रमाबद्दल, भावी नियोजनाबद्दल माहिती दिली तसेच कृषि विद्यापीठाच्या सहाय्याने आत्मनिर्भर ग्राम चळवळ मोठ्या स्तरावर राबविण्याचा मानस व्यक्त केला.

प्रास्ताविकात डॉ. आनंद गोरे यांनी नैसर्गिक शेती ही एक व्यापक संकल्पना असून नैसर्गिक शेतीमध्ये दीर्घकालीन व्यवस्थापन गरजेचे असल्‍याचे सांगितले. तांत्रिक सत्रात डॉ. आनंद गोरे यांनी नैसर्गिक शेती संकल्पनेवर, श्री. दौलत चव्हाण यांनी कृषी विभागाच्या योजना यावर, डॉ. एल. एन. जावळे यांनी ज्वार लागवड तंत्रज्ञान यावर, डॉ. पी. व्ही. पडघन यांनी चारा पीक व्यवस्थापन यावर, श्री. विकास कदम यांनी बाजारपेठ व्यवस्थापन यावर, श्री. परमेश्वर स्वामी यांनी गोवंश संवर्धन व कल्याण व ग्रामविकास यावर, श्री. अजेगांवकर यांनी सिंचनव्यवस्था यावर, श्री. शिवप्रसाद कोरे यांनी गो-कृपा अमृत यावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रम सत्रामध्ये प्रगतशील शेतकरी कृषिभुषण श्री. कांतरावजी देशमुख झरीकर, श्री. नरेश शिंदे, श्री. कमल किशोर अग्रवाल, आदी उपस्थित होते. याप्रसंगी यशस्वी नैसर्गिक शेती करणा­या शेतकरी बांधवानी आपले अनुभव व्यक्त केले व त्यांचा सत्कार करण्यात आला. सदर अभ्यास सत्रामध्ये शेतकरी बंधु-भगिनी, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनीधी, सरपंच, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी, विद्यार्थी, कृषि विद्यापीठाचे अधिकारी / कर्मचारी व सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. प्रितम भुतडा यांनी तर आभार प्रदर्शन श्री. रमाकांत जोशी व तांत्रिक सत्राचे आभार प्रदर्शन सौ. शैलजा भोसले यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. रमाकांत जोशी, डॉ. राजगोपाल कालाणी, श्री. आशीष लोया, श्री. वैष्णव, श्री. कदम, डॉ.सौ. मिनाक्षी पाटील, डॉ.सौ. श्रध्दा धुरगुडे, श्री. रघुनाथ थोरात, श्री. सतिश कटारे, श्री. सुनिल जावळे, श्री. भागवत वाघ, श्री. सचिन रणेर, श्री. नागेश सावंत, श्री. किशोर ढगे, श्री. भिकुलाल मगरे, श्री. दत्ता खटींग, श्री. अजय कटारे यांनी परिश्रम घेतले.