Saturday, December 23, 2023

नैसर्गिक संसाधनांचा वापर काळजीपुर्वक करणे काळाची गरज ...... कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि

वनामकृवित मृदाशास्‍त्रज्ञाच्‍या राज्‍यस्‍तरीय परिसंवाद संपन्‍न 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात भारतीय मृद विज्ञान संस्था शाखा परभणी च्या वतीने दिनांक २१ आणि २२ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील मृदशास्त्रज्ञांचा परिसंवादाचे आयोजन करण्‍यात आले होते, परिसंवादाच्‍या समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि हे होते. व्यासपीठावर विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ उदय खोडके, माजी संचालक शिक्षण डॉ विलास पाटील, बारामती येथील राष्‍ट्रीय अजैविक ताण व्‍यवस्‍थापन संस्‍थेचे संचालक डॉ. स्वामी रेड्डी, दापोली कृषी विद्यापीठाचे विभाग प्रमुख डॉ एस बी दोडके, राहुरी कृषी विद्यापीठातील विभाग प्रमुख डॉ. बी एस कांबळे, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ सय्यद इस्माईल, आयो‍जक विभाग प्रमुख डॉ प्रवीण वैद्य, आयोजन सचिव डॉ अनिल धमक आदींची उपस्थिती होती.

समारोपीय भाषणात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, देश अन्‍नधान्य उत्‍पन्‍नात स्‍वयंपूर्ण झाला असला तरी मागील काही वर्षापासुन धान्‍य उत्‍पादनात स्थिरता आली आहे. भविष्यकाळात जमिनीचे आरोग्य, सुपीकता व उत्पादन क्षमता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती पावले वेळीच उचलणे गरजेचे आहे. शेतीच्‍या दृष्‍टीने पाणी आणि जमिन हे महत्‍वाचे नैसर्गिक साधनसंपत्‍ती असुन या वापर काळजीपुर्वक करणे प्रत्‍येकाची जबाबदारी आहे. मातीचे आरोग्‍य आबाधीत राखण्‍याच्‍या दृष्‍टीकोनातुन मृदाशास्‍त्रज्ञांनी संशोधनात भर दयावा. शेतीत अधिकाधिक उत्‍पादनापेक्षा शाश्‍वत उत्‍पादन आपले लक्ष असले पाहिजे.

प्रास्ताविक डॉ प्रवीण वैद्य यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. ए एन पुरी यांनी केले तर आभार डॉ. सुरेश वाईकर यांनी मानले. दोन दिवशीय परिसंवादात १४७ पेक्षा जास्‍त शास्‍त्रज्ञ व पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांनी सहभाग घेतला, अन्‍न सुरक्षा आणि कृषी शाश्‍वततेसाठी मातीचे आरोग्‍य पुर्नेजीवन  यावर चर्चा करण्‍यात आली, या आधारे करण्‍यात आलेल्‍या शिफारसींचे समारोपीय कार्यक्रमात वाचन करण्‍यात आले. मृदा आरोग्‍य करिता दिर्घकालीन धोरण निश्‍चित करून धोरणकर्ते, शेतकरी, शास्त्रज्ञ आणि विस्तार कार्यकर्ते यांनी एकत्रित कार्य करण्‍याची गरज असल्‍याचा मृदाशास्त्रज्ञांचा कल या परिसंवादात दिसला. परिसंवादात भित्‍तीपत्रकाव्‍दारे शास्‍त्रज्ञांनी संशोधनात्‍मक लेखांचे सादरीकरण केले, यातील उत्‍कृष्‍ट सादरीकरणास तीन विजेत्यांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते  गौरोविण्यात आले. परिसंवाद यशस्‍वीतेकरिता मदा विज्ञान व रसायन शास्‍त्र विभागातील प्राध्‍यापक, अधिकारी व विद्यार्थ्‍यी यांनी परिश्रम घेतले.