वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात संतुलन ठेवून डॉ. उदय खोडके यांनी विद्यापीठाचे प्रभावी कार्य केले... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठावाडा कृषि विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. उदय
खोडके हे नियत वयोमानानुसार रोजी निवृत्त झाले. यानिमित्त त्यांना विद्यापीठाच्या
वतीने दिनांक ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्ती निमित्त निरोप
देण्यात आला. निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र
मणि हे होते. व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ.
भगवान आसेवार, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, माजी शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील, विभाग
प्रमुख डॉ. स्मिता खोडके, सत्कारमूर्तींचे बंधू डॉ. प्रकाश खोडके आदींची उपस्थिती
होती.
अध्यक्षीय भाषणात बोलताना कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि म्हणाले की,
कोणत्याही कार्यामध्ये आपले अस्तित्व महत्त्वाचे आहे हे सिद्ध झाले पाहिजे.
वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात संतुलन ठेवून प्रसन्नचितांनी विद्यापीठाचे प्रभावी कार्य करून डॉ उदय खोडके यांनी ते सिद्ध
केले, ही कौतुकाची बाब आहे. त्यांचे आरोग्यमान उत्कृष्ठ असून त्यांच्याकडे संपूर्ण
चांगले गुण आहेत. हे सर्व गुण नवीन पिढीने अंगीकारावेत. शासकीय सेवेत प्रत्येकाची
रुजू आणि निवृत्तीची तारीख ही ठरलेली असते, परंतु या काळात केलेले कार्य आणि यातून
आपल्या संस्थेला आपण काय दिले, यावर आपले जीवनमान कसे आहे हे कळते. यादृष्टीने डॉ.
खोडके यांचे व्यक्तिमत्व प्रभावी आहे. निवृत्तीनंतर मोठ्या संधी आहेत, त्या
मिळवाव्यात, लिखाणावर भर द्यावा. मराठवाड्याचे शेतकऱ्यांसाठी कार्य करावे.
आरोग्याची ही काळजी करावी. हसतमुख व्यक्तिमत्व सर्वांना आवडते म्हणून हसतमुख राहावे,
जास्त अपेक्षा ठेवू नयेत असाही सल्ला दिला. या निमित्ताने विद्यापीठातील सर्व
अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या परिश्रमाने व कर्तव्याने विद्यापीठास उच्च
शिखरावर घेऊन जाऊ असे आश्वासन म्हणजेच डॉ
खोडके यांचे प्रति आभार व्यक्त होईल. यावेळी कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि यांनी स्पष्ट केले की, सर्वांनी खुश राहून तणावमुक्त आयुष्यमान
जगावे. सर्वानी आपल्या कार्याची दिशा आणि कार्यपद्धती योग्य ठेवून कार्य करावे. यश
नक्कीच मिळेल, आपल्या भाग्यावर विश्वास ठेवावा. ज्यांचे कार्य चांगले त्यांचे
भाग्य उजळते आणि सर्व ठीक होईल यावर विश्वास ठेवावा, असे प्रतिपादन केले.
सत्कारमूर्ती शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांनी त्यांच्या ३७ वर्षाच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा
मिळाल्याचे मत व्यक्त केले. सर्वांनी दिलेले प्रेम याबद्दल तसेच विद्यापीठाद्वारे
मिळालेल्या संधीबद्दल आणि विद्यापीठ प्रशासनाबद्दल कृतघ्नता व्यक्त केली. नवीन
शैक्षणिक धोरण आणि सहाव्या अधिष्ठाता समितीच्या शिफारशी लागू करण्यासाठी माननीय
कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली पुढाकार घेऊन प्रथमतः लागू करण्याचे
भाग्य अधिष्ठाता म्हणून मला लाभले. यापूर्वीही माझ्या कार्याची विद्यापीठ
प्रशासनाद्वारे दखल घेऊन संशोधना तसेच शैक्षणिक कार्यामध्ये कार्य करण्याचे शिफारस
केली जात असे. विद्यापीठाच्या दृष्टीने नवीन पिढी घडवण्यासाठी त्यांच्यात प्रभावी
नेतृत्व गुण वृद्धिंगत करणे महत्त्वाचे आहे. त्यांनी निवृत्तीनंतरच्या इच्छा प्रकट
केल्या आणि विद्यापीठ यशो शिखरावर पोहोचावे यासाठी शुभेच्छा दिल्या
डॉ. स्मिता खोडके यांनी बोलताना मिश्र स्वरूपाचे अनुभव असल्याचे मत व्यक्त
केले. डॉ. खोडके यांच्या वाटचालीची मी खरी साक्षीदार आहे. ते सर्व कार्यासाठी
सक्षम असायचे आणि त्या कार्यात कस लावून कार्य करायचे व यशस्वी व्हायचे. यात त्यांच्या
सहयोगींचे साथ लाभत असे . ते नोकरीसह कौटुंबिक स्तरावर देखील यशस्वी आहेत असे नमूद
केले.
संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी डॉ खोडके हे सर्वाप्रती आदरयुक्त
बोलत असत, त्यांच्यात जिद्द, मेहनत आणि चिकाटी हे सर्व गुण आहेत. ते आपण अंगी
करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे नमूद केले. विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी त्यांच्यासोबत कार्य करताना आलेले
अनुभव विशद केले. माजी शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील यांनी त्यांच्यातील विशेष असलेले
गुणांचे वर्णन केले.
कुलसचिव श्री संतोष वेणीकर म्हणाले की, डॉ. उदय खोडके हे शिस्तप्रिय
अधिकारी आहेत. त्यांच्यासोबत कार्य करण्याची भाग्य लाभले, त्यांनी अभियंत्यांची
आंतरराष्ट्रीय परिषद तसेच विद्यापीठाचे अधिस्वीकृती समितीची भेट यशस्वीरित्या पार
पाडली याबद्दल कौतुक वाटते. त्यांचे कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व आहे. याप्रसंगी त्यांनी विभाग वार
समिती नेमून विद्यापीठ पहिल्या दहा मध्ये आणण्यासाठी या समितीने कार्य करावे आणि
या सर्व समितीचे मुख्य म्हणून निवृत्तीनंतरही डॉ. खोडके सर असावेत अशी अपेक्षा
व्यक्त केली.
डॉ. हरीश आवारी यांनी खोडके सर एक ग्रामीण भागातील असल्यामुळे शेतकरी
समोर ठेवून त्यांनी कार्य केले. त्यांच्यामध्ये सेवाभाव आणि कर्तव्यभाव जास्त आहे.
त्यांचे अभियांत्रिकी क्षेत्रात अतुलनीय असे कार्य आहे असे नमूद केले. त्यांचे
विद्यार्थी डॉ. अनिकेत वाईकर यांनी त्यांना आचार्य पदवी घेत असताना दिलेल्या
मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून अनुभव कथन केले
कार्यक्रमात डॉ. उदय खोडके यांचा जीवन परिचय विभाग प्रमुख डॉ. सचिन मोरे यांनी मांडला. सूत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव यांनी केले तर आभार डॉ. गणपत कोटे यांनी मानले. कार्यक्रमास सर्व महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.