Friday, December 19, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाद्वारा सेंद्रिय शेतीस चालना देण्यासाठी बैलचलित आधुनिक अवजारांचे वाटप

 बैलचलित सुधारित शेती अवजारांमुळे खर्चात २५ टक्के बचत शक्य – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पांतर्गत (पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण योजना) विकसित करण्यात आलेल्या बैलचलित सुधारित शेती अवजारे व यंत्रांचे वाटप दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी मौजे इट, तालुका गेवराई, जिल्हा बीड येथे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दीपक पाटील, बीडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री सुभाष साळवे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री उद्धव गर्जे, पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण योजनाचे प्रभारी अधिकारी डॉ. दयानंद टेकाळे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. हनुमान गरुड, कृषी अभियंता डॉ. सुरपाम यांची प्रमुख उपस्थिती होती.

सदर अवजारे मौजे इट येथील गुगळादेवी शेतकरी गट, सह्याद्री महिला शेतकरी गट तसेच प्रगतशील शेतकरी श्री. रामप्रसाद डोईफोडे यांना सेंद्रिय शेतीस चालना देण्यासाठी तसेच शेतीतील विविध मशागतीच्या कामांसाठी वापराच्या उद्देशाने देण्यात आली.

वाटप करण्यात आलेल्या अवजारांमध्ये क्रीडा टोकन यंत्र, धसकटे गोळा करण्याचे अवजार, तीन फाळीचे खत कोळपे, बहुउपयोगी अवजार, सौरऊर्जाचलित फवारणी यंत्र, कापूस खत व बी टोकन यंत्र, हळद व आल्याचे काढणी अवजार, सुधारित आंतरमशागत अवजारे, बैलगाडीचे जू  इत्यादी अवजारांचा समावेश होता.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सेंद्रिय शेतीला चालना देण्यात येत असून, विद्यापीठाने विकसित केलेली बैलचलित सुधारित शेती अवजारे व यंत्रांचा वापर केल्यास मशागतीवरील खर्च लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. पशुसंवर्धन यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या अवजारांचा योग्य वापर केल्यास शेतकऱ्यांना शेतीतील मशागतीचा खर्च २० ते २५ टक्क्यांनी घटविता येईल, तसेच उत्पादनातही २० ते २५ टक्के वाढ साधता येईल, असे त्यांनी प्रतिपादन केले.

या प्रसंगी डॉ. राकेश अहिरे व डॉ. हनुमान गरुड यांनीही शेतकऱ्यांना बैलचलित सुधारित शेती अवजारे व यंत्रांचा वापराबाबत मार्गदर्शन केले.

प्रास्ताविकात डॉ. दयानंद टेकाळे यांनी शेतकऱ्यांनी सदर अवजारांचा काटेकोर वापर करून बियाणे, खते, औषधे व मजुरीवरील खर्च कमी करावा तसेच बैलचलित अवजारे वापरून सेंद्रिय व नैसर्गिक शेती अधिक प्रभावीपणे करावी, असे सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पशुसंवर्धन यांत्रिकीकरण योजनेचे पशुशास्त्रज्ञ डॉ. संदेश देशमुख, इंजि. अजय वाघमारे, दीपक यंदे व मंगेश खाडे यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमास मौजे इट येथील सह्याद्री महिला शेतकरी गट व गुगळादेवी शेतकरी बचत गटाचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी डॉ. संदेश देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले.