वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाअंतर्गत असलेल्या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान
महाविद्यालयात ऊर्जासंवर्धन सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम दिनांक १९
डिसेंबर २०२५रोजी उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम महाविद्यालयीन जिमखाना, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) तसेच महाऊर्जा, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त
विद्यमाने आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके हे होते. यावेळी भाषणात त्यांनी सांगितले की,
ऊर्जासंवर्धन म्हणजे उपलब्ध ऊर्जा संसाधनांचा सुयोग्य, काटकसरीने व कार्यक्षमतेने वापर करणे होय. ऊर्जा बचत ही केवळ आर्थिक गरज
नसून पर्यावरण संरक्षण, आर्थिक शाश्वतता तसेच भावी
पिढ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. दैनंदिन जीवनात ऊर्जा
कार्यक्षम उपकरणांचा वापर करणे, अनावश्यक वीज वापर टाळणे
तसेच नवीकरणीय ऊर्जास्रोतांचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
ऊर्जा ऑडीटर
श्री. केदार खमीतकर यांनी ऊर्जासंवर्धन विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी ऊर्जेचा
इतिहास, औद्योगिकीकरणानंतर
वाढलेला ऊर्जावापर, आधुनिक जीवनशैलीमुळे वाढणारी ऊर्जा गरज
तसेच भविष्यातील संभाव्य ऊर्जासंकट याविषयी माहिती दिली. १९८० नंतर जागतिक
ऊर्जावापर सुमारे ४५ टक्क्यांनी वाढलेला असून २०३० पर्यंत तो ७० टक्क्यांपेक्षा
अधिक वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. एलईडी दिवे, ऊर्जा कार्यक्षम (स्टार रेटिंग) उपकरणे, सौरऊर्जेचा
वापर तसेच विद्युत उपकरणांची नियमित देखभाल केल्यास मोठ्या प्रमाणात ऊर्जा बचत
शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाऊर्जाचे
जिल्हा व्यवस्थापक श्री. प्रशांत गायकवाड यांनी महाऊर्जाच्या विविध योजना तसेच
शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ऊर्जा बचत उपक्रमांची माहिती दिली. तसेच श्री.
किरण खमीरकर व श्री. संदेश सुरोसे यांचीही उपस्थिती लाभली.
राष्ट्रीय
सेवा योजनेचे कार्यक्रम समन्वयक
डॉ. सुभाष विखे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
करून आभार मानले. कार्यक्रमास डॉ. गजानन वसू,
डॉ. अनिकेत वायकर, श्री. प्रमोद राठोड व
विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी
ऊर्जासंवर्धनाची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.


.jpeg)
.jpeg)