Thursday, December 18, 2025

वनामकृवि येथे ‘अविष्कार संशोधन महोत्सव २०२५–२६’ चे आयोजन

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न 


महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचे माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे माननीय कुलपती श्री आचार्य देवव्रत यांच्या निर्देशानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठ, परभणी येथे अविष्कार संशोधन महोत्सव २०२५–२६ चे आयोजन दि. १२ ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे. या संशोधन महोत्सवात महाराष्ट्रातील कृषि  व अकृषि  अशा एकूण २५ विद्यापीठांतील संशोधक विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभाग नोंदविणार आहेत.

या महोत्सवासाठी सुमारे ६०० संशोधक विद्यार्थी व ६०० संशोधक विद्यार्थिनी, तसेच २०० संघ व्यवस्थापक/संचालक विद्यार्थी कल्याण आणि १०० परीक्षक अशा एकूण १५०० जणांच्या निवास व भोजन व्यवस्थेची आवश्यकता भासणार आहे.

या महोत्सवात संशोधन स्पर्धा, बक्षीस वितरण तसेच इतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. महोत्सवाचे आयोजन यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी लोकभवन कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मान्यतेने विद्यापीठस्तरीय विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. या समित्यांच्या कार्यांचा आढावा घेण्यासाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी समित्यांच्या अध्यक्ष व सचिवांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव श्री संतोष वेणीकर, नियंत्रक श्री. अनंत कदम तसेच विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम उपस्थित होते.

माननीय कुलगुरूंनी प्रत्येक समितीच्या कार्याचा सविस्तर आढावा घेत कार्यक्रमाचे आयोजन अतिशय उच्च दर्जाचे व शिस्तबद्ध होण्यासाठी महत्त्वपूर्ण आणि मार्गदर्शक सूचना दिल्या. विद्यापीठात बाहेरून येणाऱ्या सर्व मान्यवर, शास्त्रज्ञ, विद्यार्थी व पाहुण्यांच्या सोयी, काळजी व सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व आवश्यक उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच विद्यापीठाच्या संशोधनात्मक कार्याची व पायाभूत सुविधांची ओळख होण्यासाठी संशोधन केंद्रे व परिक्षेत्रांना भेटी आयोजित करण्याचेही त्यांनी विशेषतः सूचित केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी हा संशोधन महोत्सव विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण, बुद्धीला चालना देणारा-सर्जनशील व उपयुक्त संशोधनाला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा ठरणार असून त्यांच्या संशोधन क्षमतेला योग्य दिशा व प्रोत्साहन देणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. त्यामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या महोत्सवात सहभाग नोंदवून आपले संशोधन कार्य प्रभावीपणे सादर करावे, असे आवाहन केले.

या बैठकीचे आयोजन विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी केले. बैठकीदरम्यान त्यांनी विविध समित्यांच्या सदस्यांना नियोजनबद्ध, समन्वयपूर्ण व संपूर्णतः समर्पण भावनेने कार्य करून उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले तसेच प्रत्येक समितीची जबाबदारी महत्त्वाची असल्याचे सांगितले. या बैठकीस सर्व समित्यांचे अध्यक्ष आणि सचिव उपस्थित होते.