विद्यापीठ विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांशी जोडणारे माध्यम… माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
मोठे यश मिळवायचे असेल, तर सुखाच्या क्षेत्रातून (Comfort
Zone) बाहेर पडणे अत्यावश्यक… डॉ. सिंधू शेरॉन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात शिक्षण संचालनालयाच्या वतीने
‘ग्लोबल अॅग्रीकल्चर एज्युकेशन कनेक्ट’ या विषयावरील विशेष संवाद सत्राचे आयोजन
दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. या संवादात्मक सत्रासाठी
ऑस्ट्रेलियातील वेस्टर्न सिडनी विद्यापीठाच्या संशोधन कार्यक्रम समन्वयक डॉ. सिंधू
शेरॉन या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ.
भगवान आसेवार आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांची उपस्थिती होती.
माननीय कुलगुरूंनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की विद्यार्थ्यांनी भीती न
बाळगता आत्मविश्वासाने पुढे जात राहावे. दृढ निश्चयाने कार्य केल्यास अनेक संधी
आपोआप उपलब्ध होत जातात. तुम्ही हवे तेवढे मोठे यश मिळवू शकता—तुमच्यासाठी कोणतीही
मर्यादा नाही, असे ते म्हणाले. पूर्वी या विद्यापीठात मोजक्या मुली
शिक्षण घेत असत; परंतु आज ५० टक्क्यांहून अधिक मुली येथे
प्रवेश घेत आहेत आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्राविण्य मिळवत आहेत. तसेच सध्या
देशभरातून अनेक विद्यार्थी या विद्यापीठात प्रवेश घेत आहेत. हे विद्यार्थी
अभ्यासाबरोबरच क्रीडा, संस्कृती आणि इतर गुणांनीही समृद्ध
आहेत. त्यांच्या गुणांना वाव देण्याचे महत्त्वाचे कार्य विद्यापीठ प्रभावीपणे पार
पाडत आहे. विद्यार्थी विकास, प्रक्षेत्र विकास आणि शेतकरी
कल्याण या सर्वच क्षेत्रांत विद्यापीठाचे उल्लेखनीय योगदान आहे. विद्यार्थ्यांना
आंतरराष्ट्रीय दर्जाचे शास्त्रज्ञ बनवण्यासाठी डॉ. सिंधू शेरॉन यांचे मार्गदर्शन
नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. सिडनी विद्यापीठात पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात
उतरवण्याचा त्यांचा अनुभव या विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि
दिशादर्शक ठरेल.
प्रभावी विद्यार्थी घडवण्यासाठी आणि त्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी
विद्यापीठात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांची व्याख्याने, प्रशिक्षण कार्यक्रम आणि विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यापीठाने
सिडनी विद्यापीठासह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांशी सामंजस्य करार केले
असून, यामुळे विद्यार्थ्यांचा शास्त्रीय दृष्टिकोन विकसित
होण्यास मोठी मदत होत आहे. याच माध्यमातून विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय
परिषदांमध्ये सहभागी होऊन आपले ज्ञान वाढवतात; त्यांचे आकलन
विस्तारते, अडचणी कमी होतात आणि जग अधिक जवळचे, अधिक समजण्यासारखे वाटू लागते.
पुढे माननीय कुलगुरूंनी नमूद केले की विद्यापीठ विद्यार्थी आणि
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ यांच्यात दुवा निर्माण करणारे एक महत्वाचे
माध्यम म्हणून कार्य करते. विद्यार्थ्यांनी अशा प्रत्येक ओळखीचे ‘सोनं’ करून
त्यातून जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी
केले. शेवटी, विद्यार्थ्यांनी मनात भीती न बाळगता सकारात्मक
दृष्टिकोन ठेवावा, कठोर परिश्रम करावेत आणि आपले जीवन यशस्वी
घडवावे, असा मौल्यवान संदेश त्यांनी दिला.
शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी या संवाद सत्राचे महत्त्व अधोरेखित
करताना सांगितले की, जागतिक स्तरावरील कृषि शिक्षणातील
नव्या घडामोडी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, संशोधनातील उदयोन्मुख प्रवाह आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या
आंतरराष्ट्रीय संधी यांची सखोल माहिती मिळवण्यासाठी असे सत्र अत्यंत उपयुक्त
ठरतात. त्यांनी विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवरील स्पर्धा, कौशल्यविकास
आणि संशोधन संस्कृती आत्मसात करून कृषि क्षेत्रात नवी उंची गाठावी असे आवाहनही
केले.
डॉ. सिंधू शेरॉन यांनी संधी कशा मिळवाव्यात आणि त्या संधींचे सोने कसे करावे
याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. राज्याबाहेर किंवा देशाबाहेर शिक्षण घेण्यासाठी
अथवा नोकरीसाठी जाण्याच्या प्रक्रियेत आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण बाबी त्यांनी
विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या. बर्याचदा विद्यार्थ्यांना भाषा हा मोठा अडथळा
वाटतो, परंतु प्रत्यक्षात भाषा ही कधीच खरी अडचण नसते, कारण
जगभर भारतीयांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे, असे त्यांनी
स्पष्ट केले.
वेस्टर्न सिडनी विद्यापीठाच्या कार्यपद्धतीचा उल्लेख करताना डॉ. शेरॉन
म्हणाल्या की, शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) पूर्ण करण्यामध्ये
हे विद्यापीठ जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकावर आहे. येथील शास्त्रज्ञांमधून
दरवर्षी एक उत्कृष्ट शास्त्रज्ञ निवडला जातो. यापूर्वी या मानासाठी प्रामुख्याने
इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल्या शास्त्रज्ञांची निवड होत असे. परंतु दृढ निश्चय,
जिद्द आणि सततच्या परिश्रमाच्या जोरावर त्यांनी २०२२ मध्ये 'वेस्टर्न सिडनी विद्यापीठातील उत्कृष्ट शास्त्रज्ञ' हा
पहिला क्रमांक मिळवला, असे त्यांनी सांगितले.
सिडनी विद्यापीठात भारतीय सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. तेथील राहणीमान, दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी
उपलब्ध असलेल्या विविध सोयी–सुविधांची माहितीही त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
विद्यार्थ्यांमध्ये परदेशातील अन्नाविषयी भीती वाटते; मात्र
जगभर भारतीय अन्न, मसाले आणि खाद्यपदार्थ सहज उपलब्ध असतात,
तसेच सुरक्षित वाहतूक व्यवस्था आणि उत्तम निवास सुविधाही प्रत्येक
ठिकाणी मिळतात. विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळवायचे असेल, तर सुखाच्या
क्षेत्रातून (Comfort Zone) बाहेर पडणे अत्यावश्यक असल्याचे
त्यांनी विशेषत्वाने नमूद केले. योग्य वेळेचे नियोजन आणि सुयोग्य व्यवस्थापन
केल्यास यश नक्की मिळते, असे नमूद केले. यावेळी त्यांनी
सिडनी विद्यापीठातील शिक्षण पद्धतीची सविस्तर माहिती देत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी
मार्गदर्शन केले.
विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील सिंपोजियम हॉलमध्ये आयोजित या सत्रास सहयोगी
अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. प्रविण वैद्य, डॉ. विश्वनाथ खंदारे
यांची प्रमुख उपस्थिती होती. या संवादाचे डॉ वीणा भालेराव यांनी सूत्रसंचालन करून आभार
मानले. यावेळी विविध विभागाचे प्रमुख, प्राध्यापक, संशोधक आणि
विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद
दिला.




.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)