Monday, December 1, 2025

वनामकृविच्या चाकूर येथील पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन संस्थेच्या नवप्रवेशीत विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात पार पडला

आपल्या महाविद्यालयाचे नाव उंचावण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील रहा... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन संस्था, चाकूर येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ दिनांक १ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषवले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांमध्ये विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ बाबासाहेब ठोंबरे, डॉ. अच्युत भरोसे, डॉ. दिनेशसिंह चौहान आणि धेनू टेक सोल्युशन्स प्रा. लि., पुणे यांचे संचालक श्री. संतोष खवळे, रूरल हॉस्पिटल, चाकूरचे मेडिकल सुपरिटेंडंट डॉ. जितेन जैस्वाल आणि आयसीटीसी कौन्सलर श्री. रामदास पुंडकरे यांची विशेष उपस्थिती लाभली.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी अध्यक्षीय समारोप करताना विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले, कोणत्याही परिस्थितीत कधीही हार मानू नका. चांगले व्यक्तिमत्व जोपासा आणि आपल्या महाविद्यालयाचे नाव उंचावण्यासाठी सदैव प्रयत्नशील रहा. त्यांच्या मार्गदर्शनामुळे संपूर्ण कार्यक्रम अधिक दिमाखदार आणि अर्थपूर्ण बनला. त्यांनी कृषि व्यवसाय व्यवस्थापन आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र असल्याचे सांगितले आणि नव्या पिढीने तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि शाश्वत शेती यांचा समन्वय साधून भारताला कृषिक्षेत्रात जागतिक महासत्ता बनवावे, असे आवाहन केले. त्यांनी नवागत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि संस्थेला अधिक उंची गाठण्याचा विश्वास व्यक्त केला.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकतेकडे वाटचाल करण्याबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आजच्या स्पर्धात्मक युगात नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे उद्योजक व्हा. स्वतःच्या कल्पनांना व्यवसायात रूपांतरित करण्याची क्षमता विकसित करा, जोखीम घेण्याची तयारी ठेवा आणि सतत शिका. तसेच त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सुरू झालेल्या ड्युअल डिग्री प्रोग्रामची माहिती दिली आणि सांगितले, विद्यार्थ्यांना आता एकाच वेळी दोन वेगवेगळ्या विषयांच्या पदवी घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे, ज्यामुळे आवडीच्या आणि करिअरसाठी उपयुक्त दोन क्षेत्रांचा समन्वय साधता येईल.

श्री संतोष खवळे यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आरोग्याची काळजी घ्या, लोकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा, आर्थिक नियोजन शिका आणि आपल्या आवडी-निवडी ओळखून त्यांचा पाठपुरावा करा. यामुळे यशस्वी व समाधानी आयुष्य घडेल.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे यांनी केले. कार्यक्रमात नवागत विद्यार्थ्यांमधून उत्कृष्ट सादरीकरण व आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी मिस्टर फ्रेशर २०२५” हा किताब जगन्नाथ केंद्रे यांना तर मिस फ्रेशर २०२५” हा किताब बसवचैतन्या यांना प्रदान करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमातील उत्कृष्ट सहभागाबद्दल अभिजित कुलकर्णी व धारणा मदस्वार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

याच कार्यक्रमात १ डिसेंबर हा जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृतीसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले. रूरल हॉस्पिटलचे डॉ. जितेन जैस्वाल व श्री. रामदास पुंडकरे यांनी एचआयव्ही/एड्स प्रतिबंध, सुरक्षित जीवनशैली आणि तरुणाईची जबाबदारी यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी यानिमित्त रिबन लावून व शपथ घेऊन सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी जयेश बोरसे व संस्कृती महाजन यांनी अत्यंत सुरेख आणि तरल पद्धतीने केले.

डॉ. संतोष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. ज्योती झिरमिरे, श्रीमती पूजा डांगे, श्री. अभिषेक राठोड, श्री. सुधाकर मोरे, श्री. कृष्णकुमार कुलकर्णी, डॉ. श्रीकांत पंड्या, श्री. आशिष महेंद्रकर, श्री. पितांबर पिरंगे, श्री. सादिकमिया हरणमारे, श्री. कैलास शिंदे, श्री. निखिल सूर्यवंशी, श्री. शिवानंद चिकाळे, श्री. विष्णू कांबळे, श्री. वाजिद शेख, सौ. सुनीता जाधव, सौ. रुख्मिणी गवळी, श्रीमती चांदबी सय्यद यांच्यासह संपूर्ण प्राध्यापक वर्ग, कर्मचारी वर्ग व विद्यार्थ्यांनी अविरत परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.