Sunday, August 15, 2021

शेतकरी व विद्यार्थी यांच्‍या कल्‍याणाकरिता आपले सर्वोत्‍कृष्‍ट योगदान दया ....... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवित ७५ वा स्‍वातंत्र्य दिन साजरा

सन २०२१-२०२२ हे वर्ष देशाच्‍या स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सवी वर्ष व परभणी कृषि विद्यापीठाचा सुवर्ण महोत्‍सवी वर्ष असुन यावर्षात विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, प्राध्‍यापक व विस्‍तारकांनी शेतकरी बांधव व विद्यार्थी यांच्‍या कल्‍याणाकरिता आपले उत्‍कृष्‍ट योगदान देण्‍यासाठी कटिबध्‍द व्‍हावे, असा सल्‍ला कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी दिला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात देशाच्‍या ७५ व्‍या स्‍वातंत्र्य दिनानिमित्‍त मुख्‍य प्रागंणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आलेयावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखलेसंशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकरविस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदमविद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराजप्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माइलप्राचार्य डॉ उदय खोडके, डॉ गिरीधारी वाघमारेविद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, कोरोना रोगाच्‍या प्रादुर्भाव परिस्थितीत ही कृषि विद्यापीठाचे शिक्षणसंशोधन व विस्‍तार शिक्षणाचे कार्य अविरत चालु होते. विद्यापीठाच्‍या दर्जेदार बियाणास शेतकरी व शेतकरी बियाणे उत्‍पादक कंपन्‍या यांच्‍यात मोठी मागणी असुन गेल्‍या वर्षी अवकाळी पाऊसामुळे विद्यापीठ बीजोत्‍पादनाचे अपेक्षित लक्ष पुर्ण होऊ शकले नाही, परंतु यावर्षी दहा हजार क्विंटल बीजोत्‍पादनाचे लक्ष असुन पुरेसा प्रमाणात बियाणे उपलब्‍ध होईल, अशी अपेक्षा आहे. विद्यापीठ विकसित इतर निविष्‍ठांचीही मागणी वाढत आहे, गेल्‍या वर्षी बॉयोमिक्‍सची ३ कोटी रूपये चा महसुल प्राप्‍त झाला, यावर्षी ५ कोटी रूपयेचे लक्ष आहे. गेल्‍या दोन ते तीन वर्षात विद्यापीठ निविष्‍ठांची विकेंद्रीत स्‍वरूपात विक्री करण्‍यात येत आहे. न‍िविष्‍ठांचे उत्‍पादनही केवळ परभणी मुख्‍यालयी न करीता मराठवाडयातील विद्यापीठांतर्गत असलेले कृषि विज्ञान केंद्रे, महाविद्यालये, संशोधन केंद्रे आदी ठिकाणी करण्‍यात येऊन विक्री करण्‍यात येत आहे, प्रत्‍येक जिल्‍हयातील शेतक-यापर्यंत पोहचण्‍याचा विद्यापीठाचा प्रयत्‍न आहे. विद्यापीठ निर्मित निविष्‍ठांची शेतकरी बांधवात वाढती मागणी म्‍हणजेच शास्‍त्रज्ञांच्‍या संशोधनातील अथक प्रयत्‍नातुन निर्माण केलेल्‍या तंत्रज्ञानावरील विश्‍वास आहे, याबाबत विद्यापीठास सार्थ अभिमान आहे. कृषि तंत्रज्ञान विस्‍तार करिता ऑनलाईन कार्यशाळाव्‍याख्‍याने व प्रशिक्षण कार्यक्रमाव्‍दारे विद्यापीठाशी संपुर्ण महाराष्‍ट्रातुन आज लाखो शेतकरी व कृषि विस्‍तारकांशी जोडले गेले आहेत. हरित विद्यापीठ, स्‍वच्‍छ विद्यापीठ उपक्रमामुळे विद्यापीठ परिसर सुंदर दिसत असुन यात प्रत्‍येकाचे योगदान महत्‍वाचे आहेअसे ते म्‍हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री उदय वाईकर यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापकशास्‍त्रज्ञअधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 

वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयाची कु. सिध्‍दी देसाई हिला रासेयोचा सर्वोत्‍कृष्‍ट स्‍वयंसेवक पुरस्‍कार

महाराष्‍ट्र शासनाचा राष्‍ट्रीय सेवा योजने अंतर्गत सन २०२० – २१ साठीचा सर्वोत्‍कृष्‍ट स्‍वयंसेवक पुरस्‍कारासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्याल याची विद्यार्थीनी कु. सिध्‍दी भारतराव देसाई हिची निवड झाली असुन याबाबत विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते स्‍वातंत्रदिनी दिनांक १५ ऑगस्‍ट रोजी सत्‍कार करण्‍यात आला. कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी कु. सिध्‍दी देसाई हिचे अभिनंदन केले. यावेळी शिक्षण संचालक डॉ डॉ धर्मराज गोखलेकुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुखप्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, श्रीमती संध्‍याताई देसाई, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी  अनंत लाडडॉ अनुराधा लाड आदींची उपस्थिती होती.

स्‍वातंत्र्य दिनी माननीय कुलगुरू यांच्‍या हस्‍ते वृक्षारोपण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात देशाच्‍या ७४ व्‍या स्‍वातंत्र्य दिनानिमित्‍त मुख्‍य प्रागंणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते दिनांक १५ ऑगस्‍ट रोजी ध्‍वजारोहण करण्‍यात आले. स्‍वातंत्र्य दिनाचे औचित्‍य साधुन दिनांक १५ ऑगस्‍ट रोजी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते हरित विद्यापीठ, स्‍वच्‍छ विद्यापीठ उपक्रमांतर्गत वडाच्‍या झाडाची लागवड करून वृक्षारोपण करण्‍यात आले. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखलेसंशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकरविस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माइल , प्राचार्या डॉ जया बंगाळेप्राचार्य डॉ उदय खोडके, डॉ गिरीधारी वाघमारे, वृक्ष लागवड अधिकारी डॉ हिराकांत काळपांडे, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींसह विविध विभागाचे प्रमुख, प्राध्‍यापक व कर्मचारी उपस्थित होते.

Saturday, August 14, 2021

ग्रामीण महिलांकरिता उपयुक्त गृहविज्ञान तंत्रज्ञानाबाबत ऑडियो कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन

शास्त्रज्ञांनी ग्रामीण महिलांशी साधला संवाद

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प गृहविज्ञान, रिलायन्स फाउंडेशन ग्रुप आणि महिला आर्थिक विकास महामंडळ, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परभणी जिल्ह्यातील मिरखेल आणि नांदखेडा या गावच्या महिलासाठी नुकतेच दोन दिवसीय ऑडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पच्या शास्त्रज्ञांनी ग्रामीण महिलांकरिता उपयुक्त गृहविज्ञान तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ऑडिओ कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते.

मौजे मिरखेल तालुका पूर्णा येथील महिलांनी प्रकल्पाच्या शास्त्रज्ञांशी संवाद साधला. प्रकल्पाद्वारे महिलांसाठी श्रम व वेळ बचतीची शेती कामांमधील अनेक साधने विकसित केलेली आहेत, यांच्या वापराबाबत डॉ. जयश्री रोडगे यांनी मार्गदर्शन केले तर वस्त्र व परिधान अभीकल्पना विभागाच्या मार्फत शेती कामांमध्ये विशेषतः पीकावर कीटकनाशक, रोगनाशक तसेच तणनाशकांची फवारणी करताना विविध प्रकारचे वस्त्र यांमध्ये कोट घरच्या घरी कसा तयार करावा आणि त्याचा आवर्जून फवारणी करताना वापर करावा याबाबत प्रकल्पाच्या घटक सामन्विका डॉ. सुनिता काळे यांनी मार्गदर्शन केले. कोरोना काळात विविध व्यवसायातील समस्या आणि त्याचे निराकरण यावर बोलताना डॉ शंकर पुरी यांनी टिकाऊ वस्तू किंवा दिर्घकाळ टिकणा–या वस्तूंमध्ये गुंतवणूक करून आपला व्यवसाय उभारावा असे स्पष्ट केले. मिरखेल येथून सहभागी झालेल्या महिलांमधून पार्वती विष्णू घोंगडे यांनी कोरोना मधील आहार व काळजी कशी घ्यावी, मीना कनकुटे यांनी बचत गटांमध्ये रोजगार निर्मितीच्या नवीन संधी, छाया कनकुटे  यांनी आहार कसा असावा तर ज्योती चौरे यांनी महिलांचे काबाडकष्ट कमी करण्यासाठी उपाययोजना याबाबत शास्त्रज्ञांनी त्यांचे शंका समाधान केले.

मौजे नांदखेडा तालुका परभणी येथील महिलांशी संवाद साधताना मानव विकास व कौटुंबिक अभ्यास या विषयाच्या शास्त्रज्ञा प्रा. नीता गायकवाड यांनी कोरोना महामारी मध्ये कुटुंबाविषयी महिलांची जबाबदारी आणि मानसिक स्वास्थ्य यावर संबोधताना प्रत्येकाने आपल्या जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन  प्राणायाम, ध्यानधारणा करावी  आणि ज्या कार्यामध्ये आनंद मिळतो ते कार्य जास्तीत जास्त करावे व स्वतःला त्यात गुंतवून ठेवावे  असा सल्ला दिला तर शारीरिक स्वास्थ्यासाठी योग्य आहार यावर माहिती देताना अन्नशास्त्र व पोषण विभागाच्या संशोधन सहाय्यक ज्योत्स्ना नेर्लेकर यांनी  प्रकल्पांतर्गत विकसित विविध पोषक पदार्थ बनविण्यासाठी लागणारे साहित्य, पाककृती  व त्याचा स्वास्थ्यासाठी उपयोग याबाबत माहिती देऊन लोह समृध्द आवळा-राजगिरा मिक्स टॉफीज यांचे सेवन करण्याचे आवाहन केले  

नांदखेडा येथील महिला अनिता पेरके, पार्वतीबाई, त्रिवेणी वटाणे, अश्विनी आदने, दिपाली वल्लमवाड,  अनिता देशमुख, शालुबाई पूरणवाड आणि सविता वाटाणे यांनी शास्त्रज्ञांशी संवाद साधतांना दररोज आहार कसा असावा तसेच विविध आरोग्याच्या समस्या आणि मानसिक स्वास्थ्याच्या समस्या याबरोबरच उद्योगव्यवसायाबाबत प्रश्न विचारून समाधान करून घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ. शंकर पुरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीततेसाठी रिलायन्स फाउंडेशन ग्रुपचे राज्य समन्वयक दीपक केकान जिल्हा समन्वयक मनोज काळे, प्रोग्राम सपोर्टर रामजी राऊत, माविम परभणीच्या जिल्हा समन्वयक नीता अंभोरे आणि प्रकल्पातील संशोधन सहाय्यक शीतल मोरे, रुपाली पतंगे, मनीषा क–हाळे, धनश्री चव्हाण आणि रामा शिंदे यांचे सहकार्य लाभले.










Tuesday, August 10, 2021

सोयाबीन पिकात किडी व रोगाचा प्रादुर्भाव

नामकृवितील शास्‍त्रज्ञ व कृषि विभागातील अधिकारी यांनी केली संयुक्‍तपणे पिक पाहणी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि कृषि विभाग यांच्‍या पथकानी दिनांक ९ ऑगस्‍ट रोजी जिल्‍हयातील मौजे राहटी व कात्‍नेश्‍वर शिवारातील शेतक-यांच्‍या सोयाबीन पिकांची पाहणी केली. या पथकात विद्यापीठातील सोयाबीन पैदासकार डॉ. शिवाजी मेहत्रे, कृषि विद्यावेत्‍ता डॉ. गजानन गडदे, मृदा शास्‍त्रज्ञ डॉ. रामप्रसाद खंदारे, वनस्‍पती रोग शास्‍त्रज्ञ डॉ. विक्रम घोळवे, किटक शास्‍त्रज्ञ डॉ. राजेंद्र जाधव तसेच कृषि विभागाचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. संतोष आळसे व तालुका कृषि अधिकारी परभणी श्री. प्रभाकर बनसावडे आदीचा समावेश होता. या पथकांनी सोयाबीन पिकांची पाहणी केली असता काही ठिकाणी कीड व रोगाचा प्रादुर्भाव दिसुन आला.

या पाहणी दरम्‍यान अनेक ठिकाणी जस्त व लोह ची कमतरता आढळुन आली व त्यामुळे सोयाबिनची पाने पिवळसर दिसत आहेत.  जुलै महिन्यामध्ये झालेली अतिवृष्टी व त्यानंतर पाऊसाचा पडलेला खंड, वाढलेले तापमान त्याच बरोबर दिवस व रात्र यामधिल तापमानाची तफावत यामुळे सोयाबीन पिकावर मावा, तुडतुडे व पांढरीमाशी यांचा प्रार्दुभाव सुरु झालेला दिसुन येत आहे. पुढे असेच वातावरण राहील्यास रसशोषण करणा−या किडींचा मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव होवुन सोयाबीन माझॅक व पिवळा मोझॅक या विषाणुजन्य रोगांचा  प्रसारण होण्याची शक्यता असल्‍याचे शंका व्‍यक्‍त केली. काही भागात सध्या सोयाबीन पिकावर खोडमाशी, चक्रीभुंगा व पाने खाणा−या अळया या किडींचा देखिल प्रादुर्भाव दिसुन येत आहे. सोयाबीन पिकांवरील कीड व रोग प्रादुर्भाव पाहता विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी पुढील उपाय योजना करण्‍याचा सल्‍ला दिला आहे.

उपाययोजना :

सोयाबीन पिकातील जस्त व लोहाची कमतरता कमी करण्यासाठी चिलेटेड झिंक व लोह यांची प्रत्येकी ५० ग्रॅम प्रति दहा लीटर पाण्यामध्ये घेवुन फवारणी करावी किंवा विद्राव्य सुक्ष्मअन्नद्रव्ये ग्रेड-२ ची ५० मिली प्रति दहा लीटर पाणी या प्रमाणात फवारणी घ्यावी.

मावा, तुडतुडे, पांढरी माशी यांसारख्या रसशोषणा−या  किडी व खोडमाशी, चक्रीभुंगा व पाने खाणा−या अळयांच्या नियंत्रणासाठी सोयाबीन पीकात एकरी १५ पिवळे व ५ निळे चिकट सापळे लावावे, इंग्रजी टि आकाराचे २० पक्षी थांबे उभारावे, एकरी चार कामगंध सापळे लावावे तसेच प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर आढळुन आल्यास संयुक्त किटकनाशक थायमिथोक्झाम १२.६० टक्केधिक लँबडा सायहॅलोथ्रीन ९.५० टक्के झेडसी (२.५ मिली) किंवा बिटासायफ्लुथ्रीन ८.४९ टक्के अधिक इमिडाक्लोप्रीड १९.८१ टक्के (७ मिली) यांची प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात फवारणी घ्यावी.

बहुतेक ठिकाणी सोयाबीन पीक हे फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे तसेच काही ठिकाणी पानकरपा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भावाची सुरुवात झालेली दिसुन आली व पुढे हा रोग शेंगावर देखिल पसरण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी बांधवांनी टेब्युकोनाझोल २५.९ टक्के १५ ग्रॅम किंवा पायरॅक्लोस्ट्रॉबीन २० टक्के २० ग्रॅम किंवा संयुक्त बुरशीनाशक टेब्युकोनाझोल १० टक्के अधिक सल्फर ६५ टक्के डब्लुजी २५ ग्रॅम प्रती दहा लिटर पाण्यात घेवुन फवारणी करावी.

मागील १० ते १२ दिवसांपासुन मराठवाडयातील  सर्वच जिल्हामध्ये पावसाचा खंड दिसुन येत आहे. तसेच तापमान वाढलेले आहे व जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे तरि पानातुन बाष्पीभवन टाळण्यासाठी पोटॅशिअम नायट्रेट (१३:००:४५) ची १०० ग्रॅम प्रती दहा लीटर पाणी या प्रमाणात फवारणी घ्यावी. 

टिप : शेतक−यांना अवाहन करण्यात येते की त्यांनी किटकनाशके, बुरशीनाशके, विद्राव्य अन्नद्रव्य इ. यांची  एकत्रित फवारणी घेवु नये.


Monday, August 9, 2021

रानभाज्‍या महोत्‍सव साजरा

आत्मा परभणी आणि वनामकृवितील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा

परभणी तालुका कृषी अधिकारी आणि पूर्णा तालुका कृषी अधिकारी या दोन तालुक्याचे रानभाज्या महोत्सव कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) परभणी आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 9 ऑगस्ट रोजी साजरा करण्‍यात आला. महोत्‍सवाचे उद्घाटन विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ डी बी देवसरकर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला तर कृषि विद्यावेत्‍ता डॉ गजानन गडदे व आत्‍मा प्रकल्‍प संचालक श्री एस बी आळसे, उपसंचालक आत्‍मा श्री के आर सराफ, परभणी तालुका कृषी अधिकारी श्री प्रभाकर बनसावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र येथे रानभाज्‍या दालन उभारणी करण्यात आले होती. महोत्सवामध्ये शेतकरी गटांनी सहभाग नोंदवला, परभणी तालुक्‍यातील लक्ष्मीदेवी स्वयंसाहाय्यता महिला शेतकरी गट (असोला), राजमाता जिजाऊ महिला स्वयंसहायता शेतकरी बचत गट (परळगव्हान),  ताराराणी महिला शेतकरी स्वयंसहायता बचत गट (परळगव्हाण), एकता स्वयंसहायता शेतकरी बचत गट (भोगाव), श्री चक्रधर स्वामी स्वयंसहाय्यता बचत गट (खानापूर), प्रगतशील शेतकरी बबनराव देशमुख (गावकर) आणि विशाल जावळे (सोला) आदींनी सहभाग नोंदवला तसेच पूर्णा तालुक्यातील ओंकार शेतकरी बचत गट (माखनी) अध्यक्ष जनार्दन आवरगंड, स्वराज्य स्वयंसहाय्यता बचत गट (बरबडी), कातनेश्‍वर येथील प्रगतशील शेतकरी नारायण चापके व विश्वनाथ चापके यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी विभागातील सर्व कर्मचारी अधिकारी आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा परभणी येथील सर्व कर्मचारी व अधिकारी परिश्रम घेतले. 

सद्य परिस्थितीत कपाशीमधील रसशोषण करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन

सतत ढगाळ वातावरणामुळे मावा व तुडतुडे किंडींचा प्रादुर्भाव

मराठवाडयात कपाशी वाढीच्या अवस्थेत असून कपाशी काही ठिकाणी पाते व फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. तसेच मागील काही दिवसापासून पाऊस उघडला असून सतत ढगाळ वातावरण असल्यामुळे कपाशीवर मोठ्या प्रमाणात मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासोबतच काही प्रमाणात तुडतुडे सुद्धा दिसून येत आहेत. माव्यामुळे कपाशीच्या वाढीवर परिणाम होताना दिसून येत आहे. उशिरा लागवड केलेल्या कपाशी दोन ते चार पानावर आहेत त्यावर मावा किडीमुळे फार मोठा परिणाम होऊन त्या ठिकाणी कपाशीची वाढ खुंटते. म्हणून मावा किडीचे वेळीच व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. 

किडींचे व्यवस्थापनकरिता उपाय योजना  - मावा किडीचा प्रसार शेतामध्ये मुंगळ्यांद्वारे होतो, त्यामुळे कपाशीचा शेताच्या आजूबाजूला असलेले मुंगळ्याची वारुळे नष्ट करावीत जेणेकरून मावा किडीचा प्रसार कमी होईल. रसशोषक किडीच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा व्हर्टिसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) १ कि. ग्रॅ किंवा फ्लोनिकॅमिड ५० टक्के ६० ग्रॅम किंवा डायनेटोफ्युरॉन २० टक्के ६० ग्रॅम किंवा बुप्रोफेझीन २५ टक्के ४०० मिली किंवा असिटामाप्रीड २० टक्के ४० ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी. सदरिल प्रमाण सर्व प्रकारच्या पंपाकरिता आहे. या कीटकनाशकासोबत कुठलेही इतर कीटकनाशक, बुरशीनाशक, खते, संप्रेरक मिसळून फवारणी करु नये.

अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राशी संपर्क करावा. संपर्कासाठी दुरध्‍वनी क्रमांक ०२४५२-२२९०००.

संदर्भ - वनामकृवि संदेश क्रमांक - ०५/२०२१ (०५ ऑगस्ट २०२१)